Home नागपूर बौद्धांनी मूलतत्त्ववादी लोकांपासून सावध असावे!

बौद्धांनी मूलतत्त्ववादी लोकांपासून सावध असावे!

213

बौद्ध धम्म हा प्रज्ञावंत आहे.त्याला आपण विवेकवादी ही म्हणतो.पण त्यात बुद्ध पुरुष डॉ बाबासाहेब आंबेडकर एक अत्यंत महत्वाची पुष्टी जोडतात.प्रज्ञेला शीला शिवाय पर्याय नाही.किती ही विद्वान,बुध्दीमानी व्यक्ती असेल अर्थात प्रज्ञावंत,विवेकी पण त्यांच्यात शील नसेल तर त्याची प्रज्ञा फुकाची आहे.शील म्हणजे नितीमत्ता.सदाचार.मानवीय तत्वाचरण. त्यात कोणत्याही आवडंबराला थारा नाही.मुस्लीम बांधव दाढी वाढवितो,फरची टोपी घालतो,किंवा शीख बांधव पगडी बांधतो. हातात कडे घालतो. कमरेला तलवार किंवा कृपाण ठेवतो.त्या मागे ठोक व मौलिक विचार,आचार आहेत.ज्ञान,अध्यात्मिकता आहे.लोककल्याणाचे भाव आहेत.ते त्यांचे आचरण, त्या धर्माच्या गुरूंच्या उपदेशाला धरून आहे. त्यांचे अनुयायी म्हणून ते पालन करतात.त्या पोशाखाने इतरांना कळते की, ही व्यक्ती मुस्लिम आहे कि शिख आहे.अशी ओळख दाखविणारा विशिष्ट पोशाख उपासकांना बौद्ध धम्मात नाही. भगवान बुद्धाने तसे काही सांगितले नाही.

कोणते कपडे घालायचे व कोणते नाही या बाबत बुद्धाचे उपदेश आमच्या तरी वाचण्यात नाहीत.भ.बुद्धाने भिक्खूसाठी चिवर व इतर नियम सांगितलेत. ते विनयपीटकात आहेत.२२७ नियम आहेत. पण उपासकांना ड्रेसकोड दिला नाही की वस्तू बाळगायला सांगितले नाही की, दाढी वाढविण्यासाठी उपदेश केला. तथागत असल्या बाबींना महत्व देत नव्हते.त्यांना आपला उपासक कपडे व दाडी वरून इतरांपेक्षा वेगळा दिसावा असे वाटत नव्हते.बौद्ध धम्म हा सर्व सामान्य जीवन जगण्याचा मार्ग सांगतो त्याला तसेच स्वीकारले पाहिजे.

१४ ऑक्टोबर १९५६ च्या दीक्षा समारंभात पांढरे वस्त्र परिधान करून येण्याचे आवाहन आयोजकांनी केले होते.ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या सुचने नुसार केले होते.त्या मुळे नागपुरात पांढरे कापड इतके विकल्या गेले होते की,अनेकांना पांढरे कपडे मिळाले नाही. व वस्त्र शिवता आले नव्हते.परन्तु हे पांढऱ्या रंगाला शांततेचे प्रतीक समजले म्हणून तसे आवाहन केले होते. परन्तु तसे कपडे घालायला तथागत म्हणत नाहीत.सामान्यजना पेक्षा वेगळे करून दिखावा करणे हे विवेकवादी बौद्ध धम्माची तत्वे नाहीत.कट्टरपंथी धर्मांधता हा मूलतत्त्ववादीपणा आहे. तो बौद्ध उपासकांना लागू नाही.बौद्ध उपासक हा नैसर्गिक स्वरूपाचा सुज्ञ ,पंचशीलवान नागरिक असणे अपेक्षित आहे. बौद्धांनी निळा गुलाल लावला पाहिजे,निळे निळे वातावरण केले पाहिजे, असेही तथागत किंवा डॉ बाबासाहेब म्हणत नाही.

मुस्लिमांना हिरवा,हिंदूंना भगवा तर बौद्धांना निळा रंग जोडून ही विभागणी देशाला सतत विषमतेत बघणाऱ्यांनी केली आहे.कारण त्यांचे ठोस असे कोणतेही तत्व,विचार व आचार नाहीत.आहे तर लबाडी आणि त्यातून मूठभर पंडे-पुरोहिताचे स्वार्थ.ते टिकवून ठेवण्यासाठी बाकी सर्व देव,धर्म,पोथी-पुराण आहे.अशाचे समर्थन करणारी माणसं व प्रचार यंत्रणा कमालीची आहे.त्यात धर्मनिरपेक्षता वादी जनता सुद्धा वाहत गेली आहे.तेही आपला वेगळा रंग धारण करतात त्यांनाही धम्म आणि धर्मांधता यातील सीमा रेषा कळत नाही.
महाराष्ट्रात बौद्ध विवाह कायद्यासाठी असाच प्रयत्न केला गेला. डॉ बाबासाहेब आंबेडकरांना वेगवेगळ्या धर्माच्या कायद्याला विरोध होता.त्यांना सर्व धर्माच्या लोकांसाठी समान नागरी कायदा हवा होता. तशी नितिनिर्देशक तत्व त्यांनी संविधानाच्या अनुच्छेद ४४ मध्ये केली. सरकारने समान नागरी कायदा करावा, असे निर्देश या कलमाने सरकारला दिले आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रीय भावना वृद्धीगत करण्यासाठी प्रयत्न करीत होते. तर त्यांचे काही अनुयायी बौद्ध कायद्याची मागणी करून समाजाला भावनिक करीत होते.आणि आताही आहेत.वेगळी चूल मांडत आहेत.ही बाब फुटीरतावादी व मूलतत्त्ववादी आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल केले,ते बौद्ध,जैन,शिख यांनाही लागू केले. कारण ते सुधारणावादी होते.म्हणून सनातनी हिंदूंनी विरोध केला होता.डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केले होते , हा कायदा हिंदू नसलेल्या बौद्ध,जैन,शीख यांना लागू होईल.

हिंदू कायदा लागू होईल म्हणजे हिंदुत्व लागू होईल असे नाही.परन्तु मूलतत्ववादी लोक तसा अपप्रचार करतात.काही स्वतःला संविधानतज्ञ म्हणणारे सुमार बुद्धीचे लोक आंबेडकरी समाजात कमी नाहीत.मग काय मेंढरा प्रमाणे त्यांच्या नांदी लागणारे भावनाशील सामान्य जण आहेतच !संविधानात कलम २५ नुसार बौद्ध,जैन,शिख यांना हिंदू समजले नाही. तरी हिंदू समजले, असा अपप्रचार करतात.कलम २५ चा नीट अर्थबोध करून घेत नाहीत व बौद्धांना भडकवितात.आंबेडकरी चळवळीतील आम्ही काही मोजक्या लोकांनी हा विषय सरकार व समाजा पुढे मांडला होता.त्यात माजी न्यायाधीश अनिल वैद्य,सुनिल खोब्रागडे,न्यायाधीश. डी.के.सोनवणे, न्या गुलाबराव अवसारमोल,प्रदीप गायकवाड,मी स्वतः मिलिंद फुलझेले आणि समता सैनिक दल,छाया खोब्रागडे यांची महिला संघटना इत्यादींनी बौद्ध विवाह कायदा डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांविरोधात आहे.हे आम्ही वारंवार बौद्धांना समजवण्याचा प्रयत्न केला.पण समाजातील प्रस्थापितांचे काही चमचे,दलाल हे स्वतःला मोठे आंबेडकरी विचारवंत,कायदेतज्ञ समजत स्वतंत्र बौध्द विवाह कायद्याची महाराष्ट्र सरकार कडे मागणी करीत असतात.हे खंतदायक आहे.त्यांना आम्ही सांगू इच्छितो १९८१ ला मुंबई उच्च न्यायालयाच्या बेबी जगताप प्रकरणात दिलेल्या निकाला नुसार बौद्ध पद्धतीचे विवाह कायदेशीर आहेत.वेगवेगळ्या कायद्याची गरज नाही हे सरकार व जनतेपुढे मांडले. शेवटी ती बौद्ध विवाह कायदा समितीच बरखास्त झाली आहे.बौद्ध विवाह कायदा करणे तर दूरच राहले,आता मोदी सरकारने समान नागरी कायदा करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केला आहे.त्यांचा काय डाव आहे ते कळेल पण डॉ बाबासाहेब आंबेडकर मात्र समान नागरी कायद्याचे पुरस्कर्ते होते.हे तेवढेच खरे.कारण त्यांची दृष्टी भारताला आणि भारतीयांना एक समान कायद्याच्या सूत्रात बांधून नवराष्ट्र निर्मितीचे होते.हे लक्षात घेतले पाहिजे.समजत नसेल तर त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना एकदा बारकाईने भावार्थाने वाचले पाहिजे.असे आमचे आवाहन आहे.

पण काही मंडळी बौद्ध विवाह कायद्याचा जनक बनण्यासाठी गुढग्याला बारशिंग बांधून बसलेल्या लोकांनी आता नवीन मागणी सुरु केली आहे.बौद्ध विहार कायदा करा.मुस्लिम जसे मस्जिदचा वाद असेल तर वक्फ बोर्डात जातात.तसा बौद्धांना वेगळा वक्फ बोर्ड करा. धर्मादाय आयुक्त कार्यालयात वाद नको.आश्चर्य आहे? या देशातील नागरिकांना मुंबई विश्वस्त कायदा लागू आहे. तेथे संस्था नोंद करतात. काही वाद झाला तर नागरिक बौद्ध, जैन,शीख,हिंदू,पारशी,ख्रिश्चन सरकारी न्यायालयात म्हणजे धर्मादाय कार्यालयात न्याय मागतात. फक्त मुसलमान वक्फ बोर्डात जातात. हा वेगळेपणा काही राष्ट्रवादी नाही.बौद्ध विहार कायदा मागणाऱ्यांचे म्हणणे असे की,विवाह प्रमाण पत्र मस्जिदच्या काजींचे मान्य होते पण बौद्ध भिक्खूंनी दिलेले मान्य होत नाही. म्हणून बौद्ध विवाह कायदा हवा. असाही प्रचार केला जातो.हे लक्षात घ्यावे की,हिंदूंच्या विवाहाला जन्म,मृत्यू नोंदणी कार्यालय प्रमाणपत्र देते,महानगरपालिका,ग्राम पंचायत प्रमाण पत्र देते त्याच प्रमाणे बौद्धांना सुद्धा ही सरकारी यंत्रणा प्रमाण पत्र देते.हे मुख्य प्रवाह सोडून देऊन आमच्या साठी वेगळा बौद्ध कायदा करा.वेगळा वक्फ बोर्ड करा. अशी मागणी बौद्धांना मुख्य प्रवाहातून वेगळी करणारी आहे.

मूलतत्त्ववादी आहे.दुय्यम दर्जाचे नागरिकत्व स्वीकारणारी आहे. विवेकवाद व राष्ट्रवाद सोडून आहे.बौद्धांना या देशातील नागरिकांना लागू असलेले कायदे व न्यायालय लागू असावे.जसे हिंदू व इतरांना कायदे लागू आहेत तसेच बौद्धांना लागू व्हावे.मुस्लिमांना १९५४ ला वक्फ बोर्ड सरकारने करून दिले. तेही करायला नको होते.त्यांनाही सर्वसामान्य नागरिकांना लागू असलेल्या धर्मादाय कायद्यात न्याय मागू द्यायला हवा.बौद्ध बांधवांनी लक्षात घ्यावे की,मुस्लिमा सारखा वेगळा कायदा व वेगळे वक्फ बोर्ड कराल तर मुख्य प्रवाहाच्या बाहेर फेकल्या जाल.अशी फुटीरतावादी मागणी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा कधी केली नाही. ते राष्ट्रवादी वादी होते.तेंव्हा आपण सतर्क असणे गरजेचे आहे.येवढेच आमचे या निमित्ताने सांगणे आहे.

✒️मिलींद फुलझेले(नागपूर,संपादक दैनिक,बहूजन सौरभ)मो:-७७२१०१०२४७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here