



✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114
बीड(दि.2मे):- जिल्ह्यात गुन्हेगारांवर, चोरांवर पोलीस प्रशासनाचा काहीच वचक राहिलेला नाही, असंच चित्र दिसतंय. शहरातील एका कॉलनीतील घरांवर चोरट्यांनी मध्यरात्रीतून दगडफेक केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे ज्या कॉलनीवर चोरट्यांनी दगडफेक केली, तेथे एका पोलीस कर्मचाऱ्याचं घरही आहे. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी अशा प्रकारे धुमाकूळ घातला. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. चोरट्यांनी घरे फोडण्याची, मारहाण केल्याच्या घटना सर्रास घडतात. मात्र अशा प्रकारे मध्यरात्रीतून दगडफेक करण्याची घटना फार ऐकिवात नाही. त्यामुळे या मागील नेमकं कारण काय आहे, हे शोधून काढणं पोलिसांसमोर आव्हान आहे. बीड जिल्ह्यात गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याबद्दलची चिंता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी कालच व्यक्त केली. पोलीस आणि प्रशासनाचा गुन्हेगारांवर वचक राहिला नाही, असी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली.
कुठे घडली घटना?
बीड शहरातील शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सदर घटना घडली. या भागात मध्यरात्री एक वाजेनंतर अचानक काही घरांवर दगडफेक सुरु झाली. सुरुवातीला काय घडतंय हे लोकांना कळलंच नाही. नागरिकांनी घराच्या खिडक्या उघडून पाहिल्या असता हा प्रकार लक्षात आला.चोरट्यांनी केलेल्या दगडफेकीत अनेक घरांचं मोठं नुकसान झालं आहे. काही घरांच्या खिडकीच्या काचा फुटल्या तर काही ठिकाणी सीसीटीव्हीची तोडफोड करण्यात आली आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.


