



🔸१२५ दिव्यांग बांधवांच्या बँक खात्यात ४ लाख १० हजार रुपये जमा
✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)
घुग्घुस(दि.1मे):-स्थानिक स्वराज्य संस्थेने दिव्यांग बांधवांच्या सर्वांगिण विकासासाठी ५ टक्के निधी राखीव ठेवावा.असे शासन आदेश आहेत. पण नगर परिषदेने हा निधी राखीव ठेवला नव्हता. दिव्यांगांचा हक्काचा निधी तत्काळ द्यावा, अशी मागणी भाजपा शिष्टमंडळाने केली. मागणीचे निवेदन मार्च महिन्यात मुख्याधिकाऱ्यांना दिले. निवेदनाची दाखल घेत २० एप्रिलपर्यंत हा निधी दिला जाईल, अशी ग्वाही मुख्याधिकारी यांनी भाजपा शिष्टमंडळाला दिली.
मागील दोन वर्षांपासून घुग्घुस परिसरातील अनेक दिव्यांग बांधवांना शासनाचा ५ टक्के दिव्यांग निधी मिळाला नाही. त्यामुळे संतप्त दिव्यांग बांधवांनी येथील आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांची भेट घेतली व आपल्या व्यथा सांगितल्या. ही समस्या लक्षात घेत आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार व भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या सुचनेनुसार भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे व माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप यांनी अनेक दिव्यांग बांधवासह मुख्याधिकारी अर्शिया जुही यांची भेट घेत चर्चा केली व निवेदन दिले.
त्याअनुषंगाने नगर परिषद घुग्घुसतर्फे घुग्घुस शहरातील १२५ दिव्यांग बांधवांच्या त्यांच्या प्रत्यक्ष बँक खात्यात एकूण ४ लाख १० हजार रुपये इतका अनुदान जमा करण्यात आला. त्यामुळे भाजपाच्या प्रयत्नामुळे दिव्यांग बांधवांना हक्काचा निधी मिळाला आहे.


