




सध्या देशात हिंदू खत्र्यात आहे असे सांगून हिंदूंचाच अतोनात छळ सुरु आहे. मुस्लिम द्वेषाच्या चादरीखाली हिंदूंचे होणारे हाल झाकणे सुरु आहे. बोलतांना हिंदूंची काळजी दाखवायची, हिंदूहिताच्या बाता मारायच्या परंतु कृती मात्र हिंदुविरोधी करायची असाच प्रकार राजरोसपणे सुरु आहे. दुःख याचं आहे की, देशातला हिंदूसुद्धा ह्या स्वयंघोषित हिंदुत्ववाद्यांच्या कट-कारस्थानाला बळी पडतोय.
काही दिवसांपूर्वी साध्वी ऋतुंभरा यांनी कानपूरच्या कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “हिंदू समाजाच्या बांधवांनो, तुम्ही दोन मुलं जन्माला घातली आहेत. हम दो हमारे दो.. पण माझी विनंती आहे दोन नाही चार मुलं जन्माला घाला. त्यातली दोन मुलं देशासाठी समर्पित करा. ती मुलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक बनतील. बजरंगदलाचे बजरंगदेव बनतील किंवा विश्व हिंदू परिषदेला समर्पित कार्यकर्ते बनतील” असे ते वक्तव्य आहे.
वरील वक्तव्य करणाऱ्या साध्वी ऋतुंभरा यांना किती मुले आहेत? ह्यांनी धर्मसेवेसाठी आपल्या संपूर्ण आयुष्यात का १०-१५ मुले जन्माला घातली नाहीत? आता हिंदूंनी मुलांना जन्माला घालायचं. त्यांचं पालन पोषण करायचं आणि उत्तम वाढ करून ह्या धर्मांधांच्या हवाली करून टाकायचं? धर्म रक्षणासाठी मुलेच जर हवी आहेत तर तुमच्या साधू आणि साधवींना का कामाला लावत नाही तुम्ही? आम्हाला जर देशालाच मुले अर्पण करायची असतील तर आम्ही त्यांना कलेक्टर, डॉक्टर करू, सैन्यात- पोलिसात भरती करू देशाची सेवा करण्यासाठी. देशात दंगे भडकविण्यासाठी तुमच्या हवाली आम्ही का करायचे?
वरकरणी मुस्लिमांबद्दल द्वेष दाखवून या देशात सद्यस्थितीत हिंदूंचेच अतोनात हाल करणे सुरु आहे. या देशात बहुतांश म्हणजेच ८०% लोकसंख्या हिंदू असल्याने देशातील प्रचंड महागाई चा फटका ह्या ८०% हिंदूंनाच बसतोय. पेट्रोल १२० रु. लिटर झालं त्याचा फटका ८०% हिंदूंनाच बसतो. सिलिंडर १००० रु. झालं त्याचा फटका ८०% हिंदूंनाच बसतोय. देशातल्या बेरोजगारीने ऐतिहासिक उच्चांक गाठलाय. ह्या बेरोजगारीने सर्वात जास्त ८०% हिंदूंची मुलेच बेरोजगार झालीत आणि होत आहेत. साध्वी ऋतुंभरा असा सल्ला नरेंद्रजी मोदींना आणि मोहनजी भागवतांना का देत नाहीत? इकडे महागाई-बेरोजगारीनें सर्वसामान्यांना दोन वेळचं पोट भरणं कठीण झालंय आणि त्यात तुम्ही हिंदूंना असे उरफाटे सल्ले देता? त्यांच्या जखमांवर मीठ चोळता?
हिंदूंना सांगितले जाते मुस्लिम लव्ह-जिहाद करत आहेत. मुस्लिम म्हणजे वाईट, मुस्लिम म्हणजे देशद्रोही आणि भाजपच्या केंद्रीय संघटन मंत्र्यांची भाची मुस्लिमासोबत लग्न करते. १७ फेब्रुवारी २०१९ ला लखनऊ च्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये भाजपचे केंद्रीय संघटन मंत्री रामलाल गुप्तांची भाची श्रेया गुप्ता ने मुस्लिम युवक फैजान करीम सोबत लग्न केले. भाजपाचेच दिग्गज नेता सुब्रमण्यम स्वामींची मुलगी सुहासिनी ने नदीम हैदर सोबत लग्न केले आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी ह्यांची पत्नी सीमा आणि सून सुमाना दोन्ही हिंदू आहेत. भाजपचे मोठे नेते, माजी मंत्री सैय्यद शाहनवाज हुसैन यांच्या पत्नी रेणू ह्या हिंदू आहेत. यावर कोण बोलणार? हा तुमच्या नजरेत लव्ह जिहाद नाही का? केवळ गरिबांवरच तुम्ही लोक मर्दुमकी गाजवणार?
2014 म्हणजे जेव्हापासून हे मोदी सरकार सत्तेत आलं तेव्हापासून ह्यांनी किती मुस्लिमांवर कारवाई केली? दाऊद इब्राहिम ला का भारतात परत आणल्या जात नाही? का त्याची पाळेमुळे खोदून त्याचं साम्राज्य धुळीस मिळविल्या जात नाही? वारंवार हिंदूंच्या विरोधात प्रक्षोभक भाषणे करणाऱ्या ओवेसी वर का कारवाई होत नाही? केंद्र शासनाच्या सर्व कारवाया बघितल्या तर एकटे नवाब मलिक सोडून सर्व हिंदूंवर कारवाया, हिंदूंवरच धाडी, हिंदूंचीच संपत्ती जप्त, हिंदूंवरच दबाव निर्माण करून जबरदस्ती पक्षप्रवेश करवून घ्यायचा हे सगळं उघड उघड सुरू आहे तरी आपल्या केव्हा लक्षात येणार? अनिल देशमुख, अनिल परब, सरनाईक, भावना गवळी, छत्तीसगड च्या दुर्ग जिल्ह्यातील जयंती साहू, पंजाब विधानसभे अगोदर पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांचा साळा भूपिंदर सिंह हनी याच्या घरी छापा मारला.
तमिलनाडु विधानसभा निवडणुकांच्या चार दिवस अगोदर आयकर विभागाने डीएमके प्रमुख एम.के. स्टालिन यांची मुलगी सेंथमराय च्या घरी छापा मारला. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या ठीक एक महिना अगोदर सीबीआयने तृणमूल कांग्रेसचे खासदार आणि ममता बॅनर्जींचे भाचे अभिषेक बनर्जी यांच्या घरी छापा मारला. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या एक महिना आधी, सप्टेंबर 2019 मध्ये, ईडीने महाराष्ट्र राज्य सहकारी बैंकेबद्दल खा. शरद पवार आणि अजीत पवार यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला. आताही उद्धव ठाकरेंना बदनाम करण्यासाठी काय काय केलं जातंय हे बघतोच आहोत. किती खालच्या पातळीवर राजकारण सुरू आहे. म्हणजे मुस्लिमांच्या नावाने खडे फोडायचे, शिव्या द्यायच्या आणि कृती मात्र हिंदूविरोधी करायची असेच गेली 8 वर्षे सुरू आहे. इतर पक्षातील हिंदू नेते हे हिंदू नाहीत काय? इतर पक्षातील नेत्यांमुळे आज देशातील हिंदू महागाई-बेरोजगारीने होरपळला जातोय की केंद्रातील भाजपच्या सरकारमुळे?
राम मंदिर बांधने हा निर्णय न्यायालयाने दिला. बांधायला पैसा जनतेतून जमा केला जातोय म्हणजे पैसा जनता देत आहे तरी हे मिरवतात की आम्हीच राम मंदिर बांधतोय. एकवेळ हे समजून घेतलं तरी मंदिरासाठी घेण्यात आलेल्या जमीन खरेदीत हे लोक घोटाळा करतात. रामभक्तांच्या पैशात भ्रष्टाचार करतात, हा हिंदू धर्म आहे? राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमाला देशातील प्रथम नागरिक राष्ट्रपतींना बोलावलं जात नाही. का ते हिंदू नाहीत? राममंदिराची जी समिती नेमल्या जाते त्यावर एक विशिष्ट जात सोडून इतर कोणत्याही जातीच्या सदस्यांना घेतले जात नाही, का? मंदिरासाठी दान सर्व जातींचे चालते, मंदिरासाठी इतर जातींचे बलिदान चालते पण जेव्हा कमिटी बनवायची तेव्हा इतर जाती चालत नाहीत, का? ते हिंदू नाहीत? राम काय तुमच्या एकट्याची जहागिर आहे? तुम्ही आम्हाला वाटाल तितकाच राम आमच्या वाट्याला येणार अस का? हिंदूंना आणखी किती मूर्ख बनविणार?
सध्या भोंग्याचं आणि हनुमान चालीसेवरच राजकारण गाजत आहे. महाराष्ट्रात हनुमान चालीसा म्हंटल की देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतो असा चुकीचा संदेश देशात दिल्या जातोय. परंतु महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना तुम्ही धमकावताय की , “तुमच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणतो दम असेल तर थांबवून दाखवा”. हा कोणता धर्म आहे? तुम्ही सरळ मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर या, हनुमान चलीसा म्हणा, आणि निघून जा. त्याला कुणाचीच काही हरकत नाही, पण तुम्ही पत्रकार परिषद घरून एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जाहीर धमकी देताय हा कोणता धर्म आहे? आता तर प्रश्न पडतोय की देशस्थ लाखो मंदिरे बांधली कशासाठी आहेत? कारण कुणाला मस्जिदिसमोर हनुमान चालीसा म्हणायची आहे तर कुणाला मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर. मग मंदिरांची गरजच काय?
महाराष्ट्रात भोंग्यांचे राजकारण गाजत असतांना हिंदुत्ववादी नेते प्रवीण तोगडियांनी छान मागणी केली की, महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्याची मागणी करणाऱ्या भाजपने अगोदर भाजपशासित राज्यांमधील (गुजरात, मध्य प्रदेश) धार्मिक स्थळांवरील भोंगे आधी काढावेत, त्यानंतर महाराष्ट्रात तशी मागणी करावी. ते न करता संपूर्ण सूड फक्त महाराष्ट्रावरच उगवला जातोय. देशातील 80% हिंदूंच्या टॅक्सच्या जमा झालेल्या पैशातून काही अरबोपती उद्योगपतींची हजारो कोटींची कर्जे माफ केली जात आहेत.
हा हिंदूंचा विश्वासघात नाही का म्हणे भाजपा झोपलेल्या हिंदूंना जागं करत आहे. अहो हिंदू जागृतच होता म्हणून तो आधी शिकत होता, डॉक्टर, इंजिनियर, स्पर्धा परीक्षा देत होता. तो रोजगार, महागाई, देशहिताबद्दल जागृत होता. आता बेरोजगारी ने पुरता रिकामा झाल्यामुळे तो हिंदू-मुस्लिम, मंदिर-मस्जिद, भोंगे, झेंड्यांमध्ये गुंतून गेला आहे. त्याला आपल्या आणि देशाच्या दोन्हींच्या भविष्याची चिंता वाटत नाही. जगणं कठीण होत असताना, देश पुरता बरबाद होत असताना तो देशापेक्षा धर्माला महत्व द्यायला लागला आहे. ह्या हिंदुत्वाचे ठेकेदार असणाऱ्या सरकारमध्ये 80% हिंदूंचे जितके हाल होताहेत ते अगोदर कधीच नव्हते. ह्यांच्या भुलवणाऱ्या धर्मांध बाबींना असेच आपण बळी पडत राहिलो तर लवकरच आपले दोन वेळचे खाण्याचे सुद्धा हाल होणार आहेत यात शँका नाही.
अहो नका विरोधी पक्षांवर विश्वास ठेवू, पण निदान 2014 च्या आधी स्वतः नरेंद्रजी मोदी, राजनाथ सिंग, प्रकाश जावडेकर, स्मृती इराणी, रामदेव बाबा हे जे सांगत होते त्यावर तर विश्वास ठेवा. सगळे लोक तुमचे आदर्श आहेत ना? मग त्यांनी 2014 च्या अगोदर महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्था, परराष्ट्र धोरण याबद्दल जी मते ठामपणे मांडलीत ती आजही व्हिडीओ रूपाने उपलब्ध आहेत. ती सोशल मीडियातून अनेकदा आपल्या समोर येतात, आपण ते व्हिडीओ बघतो, तेव्हाही आपल्याला वाटत नाही की हे लोक बोलत काय होते आणि आज करत काय आहेत? हे सर्व बघूनसुद्धा त्यांचा खोटारडेपणा-दुटप्पी पणा आपल्या लक्षात येत नाही, की आपल्याला लक्षात घ्यायचा नाहीये? मग मात्र अशी शंका यायला लागते की हे लोक हिंदूंना मूर्ख बनवत आहेत की आपण मुर्खच आहोत?
✒️चंद्रकांत झटाले(अकोला)मो:-9822992666




