




🔹महाराष्ट्र राज्यात अशा प्रकारच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद
✒️शांताराम दुनबळे(विशेष प्रतिनिधी)
नाशिक(दि.1मे):–यूट्यूबच्या चॅनेलवर तृतीयपंथी व्यक्तीच्या विरोधात लिंग व वर्णभेदी टिप्पणी करत शिवीगाळ करणाऱ्या बारामतीच्या महिलेवर येवला शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा गुन्हा बारामती पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे . देशात तृतीयपंथी समुदायाच्या संरक्षणासाठी २०२० मध्ये ट्रान्सजेंडर व्यक्ती अधिकार संरक्षण कायदा करण्यात आला आहे . या कायद्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला . सागर पोपट शिंदे ऊर्फ किन्नर आखाडा महंत शिवलक्ष्मी संजय झाल्टे ( रा . पारेगावरोड येवला ) या किन्नर महंत यांनी सागर मंथन नावाने यूट्यूबवर तृतीयपंथीयांच्या समस्या व अडचणींबाबत जनजागृतीवर व्हिडिओ बनवून अपलोड करतात .
या चॅनलवर व्हिडिओ पाहून अॅड . विजया गावडे ( रा . बारामती ) यांनी महिनाभरापासून शिवलक्ष्मी झाल्टे यांच्यावर वर्ण व लिंगभेदी टीका करत महंत शिवलक्ष्मी यांच्या व्हिडिओत छेडछाड करत बदनामी केली . शिवलक्ष्मी यांच्या जातीबद्दल अपशब्द वापरला .धमकी देखील दिल्याचे शिवलक्ष्मी यांनी फिर्यादीत म्हटले आहे . शहर पोलिस ठाण्यात शिवलक्ष्मी झाल्टे यांनी सत्यभामा सौंदरमल आणि कल्याणी माळी यांची मदत घेत येवला शहर पोलिस स्टेशन गाठले . किन्नरांसाठी देशात संरक्षण कायदा मंजूर झाल्यानंतर महाराष्ट्रात हा पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे.




