Home महाराष्ट्र माणसे घडविणाऱ्या नेतृत्वाचा शांत निर्झर : किशोर आनंदवार

माणसे घडविणाऱ्या नेतृत्वाचा शांत निर्झर : किशोर आनंदवार

320

नेतृत्व म्हटलं की आघाडीवर असलेली कित्येकजण इतरांना आपल्या वलयात कोंडण्याचा प्रयत्न करताना बघितली . पण आपल्या नेतृत्वात कोणाची घुसमट होऊ नये म्हणून आघाडीवर राहूनही मार्गदर्शक या नात्याने इतरांच्या मताचा आदर करीत त्यांच्यातील स्फुल्लिंग चेतवून नवा नेतृत्व तयार करणारा किमयागार म्हणजे किशोर आनंदवार . नावाप्रमाणे चेहऱ्यावर सातत्याने आनंदी , प्रसन्न आभा असलेला सकारात्मकता पेरण्यासाठीचा उमेदी व्यक्तिमत्व .घरातूनच सामाजिक वारसा लाभलेल्या या चीरतरुणाने जुनासुर्ला गावात स्वखर्चाने एक नव्हे तर अख्खे सात दिवस व्यसनमुक्ती शिबीर राबवून आम्हा तरुणात नवप्रेरणा भरली . त्या सात दिवसात देशभरातून येणारा प्रत्येक अभ्यासक किशोर आनंदवार मधील चैतन्याचा अनुभव घेऊन भारावून जात होता . पहिल्यांदा जुनासुर्ला गाव जगाच्या इतिहासात पोहचवून गावात प्रहार सेवधर्मी मंच स्थापून स्वतः प्रसिद्धीपासून दूर राहून आम्हाला नेतृत्व संधी उपलब्ध करून दिली . कोणी एखादा निर्णय घेतला तर त्याला विरोध न करता त्यातील शक्यशक्यता पडताळून उत्तम नियोजन मांडत यशस्वितेची हमी म्हणजे मी अनुभवलेला किशोर आनंदवार .

आजपर्यंत गावातील लहानापासून थोरांपर्यंत ज्यांच्याबद्दल आदर आणि ज्यांच्या प्रत्येक शब्दाला किंमत असलेला एकमेव म्हणून या व्यक्तिमत्वाव्यतिरिक्त दुसरा मी तरी बघितला नाही . त्यासाठी कमावलेले शील आदर्श गुणांची खाणच . बोलण्या-वागण्यातील एकरूपता आणि निर्व्यसनी तितकाच अभ्यासू उमदा मार्गदर्शक . स्वतःबरोबर इतरांना अभ्यास व लेखनाची आवड निर्माण करण्याची तळमळ जवळून बघितली . गावातील एकोप्यासाठी मिळणाऱ्या प्रत्येक संधीचे सोने करणारा परीस आपल्या कार्यक्षेत्रात विद्यार्ध्यांच्या व्यक्तिमत्वाला नवा आयाम देताना जवळपास तीन वर्षे एकत्र काम केल्याने पाहता आले .मी नोकरीवर नव्हतो तरी सोबत राहत असल्याने शिक्षकांच्या उद्भवणाऱ्या समस्या निकाली काढण्याची अभ्यासात्मक सचोटी आणि अधिकाऱ्यांशी बडेजाव न दाखवता विनयशील वर्तन कार्यसिद्धी साधून जायची . कार्य केल्याचा आव न आणता कोणीही त्रस्त राहू नये यासाठी दिवसाची रात्र करताना कुटुंबाकडे दुर्लक्ष होणार नाही यासाठी चाललेल्या ओढातानीत आपला संयम तुटू न देणे यासाठी तपश्चर्या लागते , ती किशोर आनंदवार यांच्या कष्टाने कमावलेल्या गोतावळ्याने सिद्ध केले .

जीवनाचे कित्येक चढ-उतार बघितलेल्या या किमयागाराकडे स्थितप्रज्ञतेचा मूर्तिमंत उदाहरण म्हणून बघता येईल . साथ देणारे भेटले तसेच घातकी लाभले पण कोणाबद्दल तक्रार करण्यात कुढत न बसता कर्मातून नावीन्य फुलविणारा किशोर आनंदवार माणसे तुटणार नाही यासाठी जागरूक असतो .प्रसन्न हास्यवदन , अभ्यासू मन , आणि विनयशील वर्तन असलेला स्थितप्रज्ञ आपल्या आचरणाने अधिकाऱ्यांच्या आदराबरोबर त्यांच्याकडून कोणावर अन्याय होणार नाही यासाठी सामोपचाराने प्रसंगी सनदशीर मार्गाने समस्या निकाली काढण्याची सचोटी किशोर आनंदवार यांच्यात कुटून भरलेली आहे . त्यामुळे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक समितीच्या अध्यक्षपदाची निवड त्यांच्या व्यक्तिमत्वाचा गौरव आहे . त्या पदाला नक्कीच न्याय मिळेल याची मी १०१% हमी देतो . केवळ पदासाठी नाही तर माणसे जोडत माणसे घडविणारा शांत निर्झर आज पुरोगामीचा नंदनवन फुलविणार आहे .

✒️लक्ष्मण खोब्रागडे(जुनासुर्ला,ता. मूल, जि.चद्रपूर)मो:-९८३४९०३५५१

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here