Home पुणे देशात महागाईचा आगडोंब!

देशात महागाईचा आगडोंब!

237

देशात महागाईचा आगडोंब उसळत चालला आहे. देशात किरकोळ महागाई दराने उच्चांक गाठला आहे. माणसाच्या जीवनावश्यक गरजा अन्न, वस्त्र, निवारा तेच दिवसेंदिवस महाग होत चालले आहे. या महागाईच्या वणव्यात सर्वसामान्य जनता होरपळत चालली आहे. आम्ही काय खायचे असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. अन्नधान्य, भाजीपाला, इंधन अशा सर्वच जीवनावश्यक वस्तू सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. देशात पहिल्यांदाच इंधन दरवाढ शंभरी पार गेली आहे. पेट्रोलचे दर १२० तर डिझेल १०० रुपयांच्या वर गेले आहे. घरगुती गॅसच्या दरातही सातत्याने वाढ करण्यात येत आहे. घरगुती गॅस १००० च्या घरात पोहचला आहे. घरगुती गॅसचे दर वाढल्याने सर्वसामान्य नागरिक विशेषतः ग्रामीण भागातील महिला आता पुन्हा चुली पेटवू लागल्या आहेत. गॅसची सबसिडीही सरकारने बंद केली आहे. इंधन आणि घरगुती गॅसचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. इंधन आणि घरगुती गॅसचे दर कमी करा असा आकांत सर्वसामान्य नागरिक करीत असताना सरकार मात्र त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहे.

सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांकडे बोटे दाखवून महागाईचे हे पाप आमचे नाहीच असे भासवण्याच्या प्रयत्न करीत आहे. पण महागाई कमी करण्यासाठी कोणतेही प्रयत्न करीत नाही. इंधनाचे दर वाढल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देखील महागली आहे. इंधनाचे भाव वाढल्याने टॅक्सी, रिक्षा संघटनांनी भाववाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. इंधनाचे दर वाढले की बस, रेल्वे आणि लोकल यासारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देखील आपले तिकीट दर वाढवतात. इंधनाचे दर वाढले की महागाई वाढते हे समीकरणच आहे. इंधनाप्रमाणेच भाजीपाला आणि अन्नधान्य देखील महाग झाले आहे. खाद्यतेलाच्या दरात दररोज वाढ होत आहे. सहा महिन्यांपूर्वी सतराशे रुपयांना मिळणारा तेलाचा डबा आता अठ्ठावीसशे रुपयांना मिळत आहे. डाळींचे भावही कडाडले आहेत. वाढत्या महागाईने देशातील जनता मेटाकुटीला आली आहे. गहू, ज्वारी, तांदूळ यांचेही दर वाढले आहेत. सिमेंट, स्टील, वाळू यांचे भाव वाढल्याने घराच्या किमती वाढल्या आहेत त्यामुळे घर घेण्याचे सर्वसामान्यांचे स्वप्न स्वप्नच राहणार आहे. देशातील जनतेला अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून सत्तेवर बसलेले आता महागाईकडे सोयीस्करपणे डोळेझाक करीत आहे.

हेच का अच्छे दिन? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. महागाई कमी करुन जनतेला दिलासा देण्याऐवजी सरकार महागाई वाढवून सर्वसामान्य जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहत आहे. केंद्रात काँग्रेसचे सरकार सत्तेवर असताना आज सत्तेत असलेले भाजपचे नेते काँग्रेसवर टीका करीत होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले होते. आज सत्तेवर आल्यावर भाजपला या आश्वासनाचा विसर पडला आहे. सरकारने महागाई कमी करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करावा. किमान जीवनावश्यक वस्तूंचे भाव तरी नियंत्रणात ठेवायला हवेत.

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९९२२५४६२९५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here