Home गडचिरोली अर्धवट उपचार: पुढे धोक्याचा सुमार!

अर्धवट उपचार: पुढे धोक्याचा सुमार!

261

(जागतिक हिवताप दिन विशेष)

धक्कादायक असे की, मलेरिया- हिवताप आजाराच्या उच्चाटनासाठी २५ एप्रिल या दिवशी भलेही जागतिक मलेरिया दिन साजरा होतो. मात्र वास्तव असे की, जगभरात प्रत्येक दोन मिनिटांना एका बाळाचा अथवा लहान मुलाचा मृत्यू केवळ मलेरियाने होतो. ही जागतिक पातळीवरील सरासरी आहे. मलेरिया हा डासांच्या चावण्यामुळे होणारा रोग आहे. डासांद्वारे त्याचा प्रसार होतो. याचा प्रादुर्भाव विषुववृत्तीय भागांत जास्त आहे. आपण डॉक्टर नाही, तरी सतर्कतेसाठी हे ठावे असावे. मलेरियाचे गांभीर्य लक्षात घेता जागतिक मलेरिया दिन पाळण्याची निकड भासू लागली. अधिक माहितीसाठी वाचा हा श्री एन. के. कुमार गुरूजी यांचा लेख… संपादक.

मलेरियाला समूळ संपवण्यासाठी डब्ल्यूएचओ व आरबीएम एकत्र आले आहेत. त्याच्या समूळ उच्चाटनासाठी राजकीय, सामाजिक पातळीवर एकत्र येणे, विशिष्ट अजेंडा तयार करणे अशी त्यांची संकल्पना आहे. प्रोटोजुअन प्लाज्‍मोडियम नावाच्या कीटाणूच्या एनोफिलीज मादी डासापासून मलेरिया होतो. आजवर या आजाराने जगभरात अनेकांचे बळी घेतले आहेत. या आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच अवघे जग आज कोरोना व्हायरस अर्थातच कोव्हिड-१९ या विषाणूचा सामना करत आहे. जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यूएचओने या विषाणूचे वर्णन साथिचा आजार असे केले आहे. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने मलेरिया आणि इतर साथींच्या आजारांचा अनुभव लक्षात घेता जगभरातील देशांनी कोरोनाचे संकट लवकरात लवकर कसे निपटता येईल, यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलावीत. महत्त्वाचे असे, की आज जागतिक मलेरिया दिन आहे. प्लाझमोडियम या जातीच्या डासांमुळे होणारा हा रोग तसा फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. ख्रिस्तपूर्व पांचव्या शतकात हिपोक्रॅटिस यांना मलेरिया सदृश्य आजार माहीत होता. सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात जैलुइट लोकांनी पेरू देशात सिंकोना ही वनस्पती आणली होती. या सुमारास जेव्हा युरोपमध्ये फार मोठ्या प्रमाणात मलेरियाची साथ आली. तेव्हा या सिंकोना वनस्पतीचा त्या तापावर उपचार करण्यात आला होता. या उपचारांमुळे मलेरिया आणि अन्य प्रकारचे ताप यांतील फरक सिडनर्हेम आणि अन्य वैद्यांना ओळखणे शक्य झाले. इ.स. १८८०मध्ये लेव्हेरान यांनी मलेरिया निर्माण करणाऱ्या डासांचा शोध लावला, परंतु या डासांचे प्रामुख्याने जे तीन प्रकार आहेत, त्याचा शोध त्यावेळी लागला नव्हता.

जागतिक मलेरिया दिन हा २५ एप्रिल रोजी जगभर साजरा केला जातो. इ.स.२००८मध्ये अफ्रिकेत हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला. मलेरिया या साथीच्या आजाराने आजवर जगभरात अनेकांचा बळी घेतला आहे. त्यामुळे अवघ्या जगाने एकत्र येत मलेरिया आजाराचे संपूर्ण उच्चाटन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जागतिक मलेरिया दिन साजरा केला जातो. सन २००७ या वर्षाच्या मे महिन्यात भरलेल्या साठव्या जागतिक आरोग्य परिषदेत हा दिवस साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. या परिषदेला उपस्थित असलेल्या ४४ देशांनी एकमुखाने ही घोषणा केली. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या आकडेवारीनुसार सन २००० ते २००४ या कालावधीत मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात मोठी घट झालेली दिसते. या काळात मृत्यूदर सुमारे ४० टक्क्यांनी घसरला आहे. ही आनंदाची बाब आहे. जागतिक आरोग्य संघटनेचा २०१९चा अहवाल सांगतो, की सन २०१४ ते २०१८या काळात मात्र मलेरियाचा प्रादुर्भाव कमी करण्यात जागतिक पातळीवर विशेष यश आले नाही. साधारण सन २०१७मध्ये मलेरियाने जेवढे मृत्यू झाले तेवढेच २०१८मध्येही झाले. त्यामुळे मलेरिया उच्चाटनाचे महत्त्व अधिक वाढले आहे. हा डास मलेरियाचा वाहक आहे. या डासांचे नियंत्रण हा मलेरिया रोखण्याचा परिणामकारक उपाय आहे. इ.स.१८९४ साली रॉस यांनी या संदर्भात पुढील संशोधन करण्याचे ठरविले. त्यांनी, ज्या रोग्यांना मलेरिया झाला आहे. त्यांना चावा घेण्यास डासांना उद्युक्त केले. या मलेरिया ग्रस्त रोग्यांना डास चावल्यावर, त्या डासांच्या शरीरात मलेरियाच्या जंतूंचे काय होते? कोणकोणते आणि कसे बदल होतात? याचा अभ्यास सुरू केला; परंतु पहिली दोन वर्षे त्यांत फारशी प्रगती झाली नाही, तरीही नाउमेद न होता त्यांनी अभ्यास चालूच ठेवला होता.

इ.स. १८९७मध्ये त्यांच्या प्रयत्‍नांना यश आले. त्यांना दिसून आले की, डासांच्या जठरामध्ये बटणाच्या आकाराच्या जंतूंची अनेक अंडी तयार होतात. ही अंडी त्या डासांच्या लाळेत येतात आणि असे डास जेव्हा माणसांना चावतात तेव्हा त्या माणसांमध्ये पुरेशी प्रतिकारशक्ति नसेल त्यांना मलेरिया होतो. हे त्यांचे संशोधन बहुमोलाचेच होते.इ.स.१८९४मध्ये मॅनसन यांनी असे गृहीतक मांडले, की मलेरिया हा रोग डासांमुळे होत असून तो या जंतूंनी युक्त डास चावा घेऊनच नव्हे, तर पाण्यावाटे पसरवीत असावेत. पुढे इ.स. १८९८मध्ये रॉस यांनी मलेरिया डासांमुळे नेमका कसा होतो, याचा शोध लावला. पक्ष्यांमधील मलेरिया प्रमाणेच मानवी शरीरांतही घडामोडी होत असल्या पाहिजेत, असे त्यांना दिसून आले. त्याच वर्षी ग्रासी, बिगनमी आणि बास्टिनेली यांनी अ‍ॅनोफेलिस जातीच्या डांसामध्ये प्लाझमोडियम, फाल्सिपॅरम या जातीच्या मलेरियाच्या जंतूंची कशी वाढ होते आणि पुढे ते संसर्गित डास चावल्यामुळे माणसांमध्ये मलेरिया कसा होतो, हे दाखवून दिले. मलेरिया तापात थंडी वाजून ताप येणे आणि पुन्हा तीन चार दिवसांनी ताप येण्यामुळे शरीरात हिमोझाईन हा विषारी पदार्थ दिसून येतो. यामध्ये दोन प्रमुख- १) मलेरियाचे जंतू आणि त्यांचे वातावरण आणि २) ॲनॉफिलस जातीचे डास आणि त्यांचे वातावरण या घटकांचा विचार केला पाहिजे. डासांच्या शरीरांतील मलेरियाच्या जंतूंच्या घडामोडीविषयी आणि हा मलेरिया मानवी शरीरात कसा संक्रमित होतो, याविषयी सर रोनॉल्ड रॉस यांनी मूलभूत संशोधन केले व पुढील अभ्यासकांना दिशा दाखविली.

विशेष म्हणजे संशोधनाचे हे कार्य त्यांनी बव्हंशी आपल्या हिंदुस्थानात कलकत्ता आणि बंगलोर येथे केले. या संशोधनासाठी इ.स.१९०२चे नोबेल पारितोषिक त्यांना मिळाले. रोनाल्ड रॉस यांचा जन्म अलमोडा येथे इ.स.१८५७मध्ये झाला. त्यांचे वडील सर सी.सी.जी.रॉय हे इंग्रजांच्या सैन्यामध्ये जनरल होते. रोनाल्ड रॉस यांचे शिक्षण इंग्लंडमध्ये झाले आणि वैद्यकाच्या अभ्यासासाठी त्यांनी इ.स.१८७५ मध्ये लंडन येथील सेंट बार्थिलोमोव्ह हॉस्पिटलमध्यें प्रवेश घेतला. इ.स.१८८१मध्ये डॉक्टर झाल्यावर ते इंडियन मेडिकल सर्व्हिसमध्ये काम करू लागले. डासांमुळे मलेरिया होत असावा असा काहीसा तर्क त्यापूर्वी एक शतक आधी करण्यात आला असला, तरी त्यावर पुरेसा प्रकाश टाकण्यात आलेला नव्हता. मलेरिया नेमका कसा होतो? तो कसा पसरतो व त्याला प्रतिबंधक कसा करता येईल? याबद्दल त्यावेळी निश्चित स्वरूपाची काहीही माहिती उपलब्ध नव्हती.

मलेरिया रूग्णात- १) थंडी वाजण्याचा त्रास सुमारे १५ मिनिटे ते तासभर चालतो. २) थंडी वाजून ताप येतो. ताप थोडा वेळ टिकतो. ३) ताप कमी होताना घाम येऊन उतरतो. ४) ताप सहसा दुपारनंतर येतो. ताप सहसा दिवसाआड किंवा रोज येतो. ५) तापाबरोबर खूप डोकेदुखी, अंगदुखी, कंबरदुखी, थकव, इत्यादी लक्षणे जाणवतात. पण हे वेळापत्रक अगदी पक्के नसते. याबरोबर पाठही दुखते. मलेरिया सौम्य असेल किंवा उपचार अर्धवट झाले तर लक्षणे सौम्य असतात. कधीकधी फक्त अंगावर काटा येणे, डोके दुखत राहणे, थकवा जाणवणे एवढीच लक्षणे असतात. अशा तक्रारी खूप असतात. रक्तनमुना तपासल्याखेरीज याचा नक्की निर्णय करणे अवघड असते.

मलेरियाच्या तापामुळे काही वेळा मेंदूला सूज येऊन झटके येण्याची शक्यता असते. ही शक्यता बालकांमध्ये जास्त प्रमाणात आढळते. प्लास्मोडियम फाल्सिपॅरम प्रकाराच्या जंतूंमुळे रुग्ण कोमात जायची व दगवण्याची शक्यता असते. काही रुग्णांत मूत्रपिंड निकामी होऊन लघवीत फुटलेल्या लाल रक्तपेशी दिसून येतात.

धक्कादायक असे की, मलेरिया- हिवताप आजाराच्या उच्चाटनासाठी २५ एप्रिल या दिवशी भलेही जागतिक मलेरिया दिन साजरा होतो. मात्र वास्तव असे की, जगभरात प्रत्येक दोन मिनिटांना एका बाळाचा अथवा लहान मुलाचा मृत्यू केवळ मलेरियाने होतो. ही जागतिक पातळीवरील सरासरी आहे. मलेरिया हा डासांच्या चावण्यामुळे होणारा रोग आहे. डासांद्वारे त्याचा प्रसार होतो. याचा प्रादुर्भाव विषुववृत्तीय भागांत जास्त आहे. आपण डॉक्टर नाही, तरी सतर्कतेसाठी हे ठावे असावे. मलेरियाचे गांभीर्य लक्षात घेता जागतिक मलेरिया दिन पाळण्याची निकड भासू लागली. म्हणून सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावणे आणि डासांनाना पिटाळण्याच्या पद्धती प्रकर्षाने अवलंबिणेच फायद्याचे राहील.

!! पुरोगामी एकता परिवारातर्फे विश्व मलेरिया दिनानिमित्त प्रेरणादायी हार्दिक शुभेच्छा !!

✒️श्री एन. के. कुमार, गुरूजी.(मराठी साहित्यिक विदर्भ प्रदेश)मु. गडचिरोली, मो.७४१४९८३३३९.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here