



✒️विषेश प्रतिनिधी(शिवानंद पांचाळ नायगांवकर)मो:-९९६०७४८६८२
नांदेड(दि.23एप्रिल):-प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येनंतर नांदेड शहरासह जिल्ह्यात नागरिक तसेच विविध क्षेत्रातील व्यावसायिकात भीतीचे वातावरण पहावयास दिसत आहे. एका नंतर एक धमकीचे पत्र समोर येत आहेत. पोलीस प्रशासनही कंबर कसून चौकशी करतांना दिसत आहे.
प्रसिद्ध व्यावसायिक श्याम गुप्ता यांना एक खोका खंडणी, पंधरा दिवसांचा वेळ नाहीतर पाच जणांना मृत्यूची धमकी देणाऱ्याला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एम.व्ही. कुलकर्णी यांनी तीन दिवस अर्थात २५ एप्रिल २०२२ पर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे. नांदेडचे प्रसिद्ध व्यापारी श्याम कमलकिशोर गुप्ता यांना एक पत्र आले त्यात ऐक रे श्याम गुप्ता तू भाग्यनगर मध्ये दुसऱ्याच्या जमीनीवर विना कागदपत्र इमारत बांधतो आहेस. सोबतच कौस्तुभ फरांदेला पण समजून सांग नाहीतर पहा. तसेच आता तुला फक्त पंधरा दिवसांचा वेळ आहे. एक खोका (अर्थात एक कोटी रुपये) पंधरा दिवसांत दिले नाही तर आई, बहीण, भावजी आणि दोन बालके जीवानिशी जातील. असे लिखाण लिहिलेले पत्र श्याम गुप्ता यांना नोंदणीकृत डाकने पाठवले. पोलीसांना किंवा तुझ्या सावत्र भावाला सांगीतलेस तर पहाच तू, असे त्या पत्रात लिहलेले होते.
हे पत्र श्याम गुप्ता यांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी पोलिसांना दिले. पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथकाने याबाबत सविस्तर तपासणी केली. तपास पूर्ण करून सहायक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून श्याम गुप्ता यांना धमकीचे पत्र पाठवणारा पुरुषोत्तम रामचंद्र मांगूळकर (३७) रा. हिमायतनगर हल्ली मुक्काम भाग्यनगर कमानीच्या आत यास अटक झाली. दि.२२ एप्रिल २०२२ रोजी दुपारी भाग्यनगरचे पोलीस निरीक्षक सुधाकर आडे, पोलीस अंमलदार सादिक पटेल, रितेश कुलथे यांनी पुरुषोत्तम रामचंद्र मांगूळकर यास न्यायालयात हजर करून जिल्ह्यातील परिस्थितीची मांडणी करत तपासासाठी पोलीस कोठडी देण्याची विनंती केली.





