



✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी येवला)मो:-९६०४१६२७४०
येवला(दि.21एप्रिल):- अनुभव, शिक्षण, प्रशिक्षण सामाजिक बहुउद्देशीय संस्था व सलग अठरा तास अभ्यास उपक्रम समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त त्यांना अनोख्या पध्दतीने अभिवादन करण्यात आले.देशातील प्रत्येक नागरिकाला संधीची समानता व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, समता अधिकार बहाल करुन बाबासाहेब आंबेडकर यांनी आपली राष्ट्रभक्ती व राष्ट्रप्रेम याचे सर्वोच्च उदाहरण जगासमोर ठेवले. अठरा अठरा तास अध्ययन करुन बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्ञानार्जन केले व ते ज्ञान देशाच्या हितासाठी खर्ची केले. मी प्रथमतः भारतीय व अंतिमतः देखील भारतीयच असेल हे सांगत त्यांनी भारत देशाप्रती असलेले प्रेम प्रतिपादीत केले.
हाच धागा पकडून या ही वर्षी समितीच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त बाबासाहेब आंबेडकर यांच्या सह देश स्वातंत्र्यासाठी बलिदान करणाऱ्या व कामी आलेल्या राष्ट्र पुरुषांना अभिवादन करण्यात आले. येथील मुक्तीभूमी येथे सुमारे साठ विद्यार्थ्यांनी सलग सोळा तास अभ्यास करून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या व कृतिशील पध्दतीने अभिवादन केले.विविध शाळा महाविद्यालयांतील विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते.सकाळी सहा ते रात्री १० या कालावधीत विद्यार्थ्यांनी सलग अध्ययन केले. कार्यक्रमाचे मुख्य प्रवर्तक हिरामण मेश्राम यांनी आपन समाजाचे देणे लागतो व त्यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत काम करणे हे प्रमुख उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून या ही वर्षी स्वत: पदरमोड करून हा उपक्रम आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन यशस्वी केला.
सध्या सर्वच महापुरुषांच्या जयंत्या या सवंग पध्दतीने व पैशांचा अपव्यय करुन साजऱ्या केल्या जात आहेत.याला फाटा देत समिती गेल्या ८ वर्षांपासून म्हणजे सन २०१३ पासून हा उपक्रम राबवीत असल्याची माहिती मेश्राम यांनी दिली. वैचारिक पातळीवर अशी जयंती साजरी होणे ही काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. समारोपाच्या अध्यक्षस्थानी विकास वाहुळ हे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ सुरेश कांबळे व पत्रकार विलास कांबळे हे होते. डॉ सुरेश कांबळे यांनी प्रज्ञासुर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षाला तोड नसुन विद्यार्थ्यांना महान बनविण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारां शिवाय पर्याय नसल्याचे प्रतिपादन करीत अभ्यासपूर्ण मांडणी केली.अध्यक्ष वाहुळ, नितीन संसारे,आदींनी या उपक्रमा संदर्भात आपले विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन साप्ताहिक पत्रीसरकारचे तालुका प्रतिनिधी तथा समितीचे संयोजक नितीन संसारे यांनी केले.
समिति संयोजक प्रविन खंडागळे, विनोद त्रिभुवन यांनी आभार मानले. नवचेतना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र संचालक जितेश पगारे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा बाबत मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षक उपलब्ध करून देत सहकार्य केले. शुभम निघुट सर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षां बाबत मार्गदर्शन केले.उपक्रम यशस्वीतेसाठी निलेश देशमुख, आर.पी.झाल्टे, संदीप जोंधळे, सुभाष वाघीरे, भगवान साबळे, दिवाकर वाघ, दत्तु ससाणे, योगेश पवार, सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड राजरत्न वाहुळ आदींनी परिश्रम घेतले. यावेळी लिना मेश्राम, सौ.वाहुळ,अश्विनी संसारे,सौ.खंडागळे आदींसह मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.


