



सध्या राज्यावरच नव्हे तर देशावर भारनियमनाचे मोठे संकट उभे ठाकले आहे. ऐन उन्हाळ्यात भारनियनम होणार असल्याने राज्यातील नागरिक हवालदिल झाले आहे. अर्थात हे संकट फक्त राज्यवार नव्हे तर देशावरच आहे. देशातील कोळसा टंचाई हे त्यामागचे प्रमुख कारण आहे. कोळशाअभावी देशातील औष्णिक वीज प्रकल्प बंद पडले तर वीजनिर्मिती बंद पडेल आणि देश अंधारात बुडेल. एरव्ही पंधरा दिवस पुरेल एवढा कोळशाचा साठा शिल्लक असतो आता तो सात दिवस पुरेल एवढाच असल्याचे केंद्राने अधिकृतपणे सांगितले आहे. त्यामुळे भारनियमनाचे संकट घोंघावू लागले आहे. उन्हाळ्यात वाढत जाणारी विजमागणी आणि आणि त्याचवेळी वाहतुकीतील अडचणीतुन निर्माण झालेली कोळसा टंचाई यातून वीजनिर्मितीवर आलेल्या मर्यादेमुळे साऱ्या देशात वीज टंचाईचे चटके बसण्यास सुरवात झाली आहे. देशाचा विचार करता विजमागणीत मागील वर्षीच्या तुलनेत १२ टक्के वाढ झाली आहे.
देशातील औष्णिक वीज प्रकल्पांना कोळसा टंचाई भासत असल्याने मागणी व पुरवठ्यात तूट येऊन अनेक राज्यात भारनियनम करावे लागत आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने यावर तात्कालिक उपाय म्हणून कोळसा आयात करण्याची सूचना राज्य सरकार खाजगी वीज उत्पादक कंपन्यांना केली आहे.याचाच अर्थ देश अंधारात बुडू नये म्हणून सरकारी पातळीवर योग्य ती काळजी घेतली जात आहे. देश अंधारात बुडू नये यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. कोळशाअभावी विजप्रकल्प बंद पडू नये यासाठी परदेशातून कोळसा आयात करण्याची तयारी केंद्र सरकारनेही केली आहे. देश अंधारात बुडू नये यासाठी सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत असताना तिकडे जेएनपीटी ते पळस्पे या मार्गावर भरदिवसा सकाळी नऊ वाजेपर्यंत पथदिवे सुरू असल्याचे निदर्शनास आले. अर्थात हे चित्र राज्यातील सर्वच शहरात पहायला मिळते. हे असले बेजबाबदारपणाचे प्रकार शासन, स्थानिक स्वराज्य संस्था स्तरावर वारंवार पाहायला मिळत असतात. अनेक घरांतूनही पंखे, दिवे, वातानुकूलित यंत्रे, व विजेच्या वापरातील चीजवस्तू गरज नसताना विनाकारण सुरू असल्याचे राजरोस दिसून येते. ग्रामीण भागात अजूनही आकडा टाकून विजेची चोरी केली जाते. भारनियमनाचे संकट सोडवण्यासाठी सरकार प्रयत्न करतच आहे ; पण विजबचतीसाठी जबाबदार करदाता नागरिक म्हणून आपण काय करतो याचा विचार सर्व नागरिकांनी करावा.
सर्वकाही सरकारवर सोपवून आपली काहीच जबाबदारी नाही असे वागणे म्हणजे देशाला संकटात घालण्यास हातभार लावणे होय. देशासमोर भीषण वीज संकट उभे राहिले असताना सर्व नागरिकांनी जबाबदार नागरिक बनून विजेची बचत करावी. विजेची बचत हीच विजेची निर्मिती आहे. वीज बचत ही काळाची गरज आहे.
✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा पुणे)मो:-९९२२५४६२९५


