




✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100
म्हसवड(दि.18एप्रिल):-भारताच्या लोकसंख्येच्या निम्म्याहून अधिक असणाऱ्या इतर मागासवर्गासाठी भारतीय संविधानाने पुरेशा तरतुदी केल्या असून त्याचा लाभ घेवून प्रगती साधण्यासाठी ओबीसींसह सर्वांची जातवार जनगणना अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन भारतीय संविधानाचे अभ्यासक व प्रचारक डॉ विनोद पवार यांनी केले.म्हसवड येथील फुले आंबेडकर जयंती मंडळाच्या वतीने आयोजित संयुक्त जयंती निमित्त आयोजित तिसऱ्या प्रबोधन सत्रात ओबीसी जातवार जनगणना व भारतीय संविधान या विषयावर ते बोलत होते.यावेळी प्रा. डॉ एम डी चंदनशिवे, संविधान प्रचारक राजू कांबळे,विठ्ठल सजगाने उपस्थित होते.
डॉ विनोद पवार यांनी जातीआधारीत जनगणनेचा इतिहास , संविधानिक तरतुदीचा लाभ घेण्यासाठी जातीआधारीत जनगणनेची गरज स्पष्ट केली. जाणीवपूर्वक जनगणना कशी टाळली जाते हे सिद्ध करत 2011 सालीच वेगळी गणना करण्यासाठी करोडो रुपये खर्च करण्या ऐवजी मुख्य जनगणनेमध्येच केवळ एक रकाना वाढवून ओबीसी जातींची नोंद सहज शक्य होती .माननीय सर्वोच्च न्यायालय 2022 च्या मुख्य जनगणनेमध्ये ओबीसी सह सर्वांनी गणना करण्याचे आदेश देवू शकले असते. आज ओबीसी वर्गाच्या हक्कावर गदा आणली जात आहे, उद्या अनुसूचित जाती जमाती यांचेही संविधानिक अधिकार काढून घेण्याचे डावपेच सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
देशाच्या साधन संपत्तीमधील वाटा ओबीसी वर्गाला मिळू नये म्हणून जातवार जनगणना टाळली जात आहे असा आरोप डॉ पवार यांनी करुन ओबीसी वर्गाने आपले संविधानिक अधिकार मागू नयेत म्हणून धार्मिक मुद्द्यांत व द्वेषभावनेसाठी जुंपले जात आहे असे सांगीतले.भारतीय संविधान सन्मान सुरक्षा संवर्धनाची अपेक्षा व्यक्त करुन संविधान टिकले तरच देश टिकेल त्यासाठी भारतीय संविधान प्रचार प्रसाराची आवश्यकता ठामपणे प्रतिपादन केली.यावेळी म्हसवड, देवापूर, शिरताव, संभुखेड इत्यादी ठिकाणावरून असंख्य बहुजन उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन, त्रिशरण पंचशिलाने झाली. स्वागत प्रणव सरतापे, योगेश सरतापे यांनी, प्रास्ताविक एम डी चंदनशिवे तर सूत्रसंचालन राजाराम तोरणे यांनी आणि आभार विठ्ठल सजगाने यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंडळाचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार तसेच सर्व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.




