



✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114
बीड(दि.17एप्रिल):-कोरोना कालावधीत आरोग्य विभागातील कोट्यावधी रूपयांची कागदोपत्रीच सीसीटीव्ही खरेदी, सॅनिटायझर, विद्युत पुरवठा ,बोगस हिवताप प्रमाणपत्र, प्रेरणा प्रकल्प अंतर्गत गैरव्यवहार आदि प्रकरणात कोट्यावधी रूपयांचा अपहार करण्यात आला असून कोरोना कालावधीतील खर्चाचे ऑडीट करण्यात यावे तसेच अतिरिक्त कर्मचारी भरती गैरव्यवहार प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यात येऊन वादग्रस्त गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आधिका-यांची हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डाॅ.भारती पवार यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
सविस्तर माहीतीस्तव
____
बीड जिल्ह्य़ातील आरोग्य विभागातील खरेदीत आरोग्य विभागातील वरिष्ठ आधिकारी, राजकीय नेते आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी संगनमतानेच अनियमितता तसेच कोट्यावधी रूपयांची कागदोपत्रीच खरेदी दाखवून मोठ्याप्रमाणात आर्थिक अपहार करण्यात आला असून उपचार यंत्रणेपेक्षा अनावश्यक कामावर रंगरंगोटी, पडदे, सीसीटीव्ही बाबींवर अव्वाच्या सव्वा अतिरिक्त खर्च दाखवून शासनाची दिशाभूल केलेली आहे, संबधित प्रकरणात वारंवार निवेदन, आंदोलनानंतर सुद्धा जिल्हाप्रशासन चौकशी करण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत असून कागदोपत्रीच चौकशीचे घोडे नाचवले जात असून भ्रष्टाचार प्रकरणात पाठराखण करत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाकाळात जिल्हारूग्णालयात कोट्यावधी रूपयांच्या खरेदीत जवळपास ११० कोटी रूपयांची बिले उचलण्यात आली असून त्यात डाॅक्टर आणि त्यांचे नातेवाईक मालामाल झाल्याचे दिसून येत आहे.
त्याच बरोबर कोरोना संसर्गावरील रूग्णांवर उपचारासाठी मनुष्यबळ भरती करताना प्रशासकीय अनियमिततेबरोबरच मोठ्याप्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार करण्यात येऊन १२१ अतिरिक्त कर्मचा-याच्या भरतीमुळे अतिरिक्त शासन तिजोरीवर भार पडला असुन त्याचे वेतन देण्यात अडचणी यैत आहेत. तत्कालीन मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड अजित कुंभार यांनी संबधित प्रकरणात दोषींवर कारवाई करण्याची शिफारस केलेली आहे. वरील प्रकरणात कोरोना कालावधीतील खर्चाचे ऑडीट करण्यात यावे तसेच उच्च स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.


