



🔹बांधकाम कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबध्द – आमदार देवेंद्र भुयार
✒️मोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)
मोर्शी(दि.16एप्रिल):-ईमारत बांधकाम आणि इतर कामगारांना सुरक्षा, आरोग्य आणि कल्याणकारी उपाययोजना प्रदान करण्याच्या उद्देशाने आमदार देवेंद्र भुयार यांच्या माध्यमातून राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनेचा उपक्रम मोर्शी विधानसभा मतदार संघामध्ये राबवण्यात आला.महाराष्ट्र हे उपेक्षित घटकांसाठी योजना राबविण्यात नेहमीच आघाडीवर राहत आलेले राज्य आहे. नव्या योजना निर्माण करणे, त्यांची अंमलबजावणी करणं यातही महाराष्ट्र नेहमी अग्रेसर राहिला आहे. त्यादृष्टीनं विचार केला तर असंघटित क्षेत्रातील कामगार हे तसे दुर्लक्षित राहत आले. पण महाविकास आघाडी सरकारने या असंघटित क्षेत्रात अतिशय मोठा वर्ग असलेल्या बांधकाम कामगारांसाठी धोरणं ठरविली आहेत.
असंघटित आणि ज्यांना स्वत:चा असा आवाज नसणाऱ्यांना कायद्याचं संरक्षण देण्यात येणारं, त्यांच्या कल्याणासाठी राज्य शासन काम करीत असल्यामुळे सर्व बांधकाम कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबध्द असल्याचे प्रतिपादन आमदार देवेंद्द भुयार यांनी यावेळी केले.या उपक्रमाच्या माध्यमातून मोर्शी येथील कामगार भवन येथे आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते १६८ इमारत व इतर बांधकाम कामगारांना अत्यावश्यक वस्तु यामध्ये प्लास्टिक चटई, मच्छरदाणी, सोलर टॉर्च, जेवणाचा डबा, पाण्याची बाटली, सॅक, आणि पत्र्याची पेटी या सात वस्तु साहित्य वाटप करण्यात आले.
मोर्शी वरुड तालुक्यामध्ये बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी गेल्या काही वर्षांपासून मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी विशेष मोहीम राबविली आहे. याअंतर्गत नोंदणी झालेल्या कामगारांना कामगार भवन मोर्शी येथे ‘किट’ अर्थात बांधकाम साहित्याच्या पेट्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे मोर्शी तालुकाध्यक्ष नरेंद्र जिचकार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके, राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष अंकुश घारड, राष्ट्रवादी युवक शहर उपाध्यक्ष मयूर राऊत, माजी उपाध्यक्ष मोहन मडघे, अमर नागले, राजेश ठाकरे, पप्पू पठाण, शुभम पकडे, गजानन हूड, गजानन वानखडे, शुभम तिडके, राष्ट्रपाल वाहने, रोशन राऊत, सतीश टिपरे, यांच्यासह आदी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते.
मोर्शी येथील कामगार भवन येथे इमारत व इतर बांधकाम कामगार स्वतःच्या नावाची नोंदणी करू शकतात. यासाठी 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, रहिवासी पुरावा, छायाचित्रासह ओळखपत्र, बँक पासबुकची प्रत, पासपोर्ट आकाराची तीन छायाचित्रे आवश्यक आहे. वरुड येथील शेतकरी भवन कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेमध्ये कोणत्याही कामगार आपल्या नावाची नोंद करू शकतो. राज्य शासनातर्फे 28 योजना कामगारांसाठी सध्या कार्यरत असून याचा लाभ घ्यावा, असे आव्हान आमदार देवेंद्र भुयार यांनी केले .





