



🔹अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनाचे नियोजन
🔸ऊसतोड मजुरांना वेध परतीचे..!
✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी,बीड)मो:-9075913114
बीड(दि.16एप्रिल):-यंदाचा ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आहे. असे असताना मराठावड्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न कायम असल्याने आणखीन हंगाम लांबणार आहे. शेतकऱ्यांच्या ऊसाचे गाळप पूर्ण झाल्याशिवाय कारखाने बंद करु नयेत असे आदेश साखर आयुक्त कार्यालयाने दिले आहेत. मात्र, स्थानिक पातळीवर ऊसतोड मजुरांनी आवराआवर करण्यास सुरवात केली असून काहींनी तर परतीच्या प्रवासाला सुरवातही केली आहे. त्यामुळे अतिरिक्त ऊसाचे गाळप कसे होणार हा प्रश्न कारखाना प्रशासनाला भेडसावतोय. असे असतानाच बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील लोकनेते सुंदररावजी साखर कारखान्याने अनोखीच शक्कल काढली आहे. ऊसतोड मजुर टिकून रहावेत यासाठी प्रती मेट्रिक टन 100 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकच्या पैशासाठी का होईना मजूर टिकून राहतील हा यामागचा हेतू आहे. शिवाय अधिकतर मजूर हे बीड जिल्ह्यातीलच असल्याने मजुरांसाठीही हा निर्णय परवडण्यासारखा आहे.
अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनाचे नियोजन
राज्यात मराठवाडा विभागातच अतिरिक्त उसाचा प्रश्न हा गंभीर झाला आहे. परभणी, बीड, लातूर, जालना, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात कधी नव्हे ते ऊस क्षेत्रात वाढ झाली आणि त्याचा परिणाम आता तोडीवर होत आहे. यासाठी लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याने वेगळी शक्कल लावली आहे. सध्या ऊसतोड मजुरांना परतीचे वेध लागले आहेत. मात्र, मजुरांअभावी पुन्हा अतिरिक्त ऊसाचा प्रश्न अधिकच चिघळणार आहे. त्यामुळे 1 मे 2022 पासून हंगाम संपेपर्यंत काम करणाऱ्या ऊस तोडणी मजुरांना प्रोत्साहनपर प्रति मेट्रिक टन 100 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारखान्याचे चेअरमन धैर्यशील सोळंके यांनी हा निर्णय घेतला आहे.
कारखान्याचे विक्रमी गाळप
यंदाचा ऊस गाळप हंगाम सुरु होऊन 150 दिवसांपेक्षा अधिकचा काळ झाला आहे. उसाचे क्षेत्र वाढल्याने कारखान्यांना उसाची टंचाई ही भासलीच नाही. दरवर्षी कारखान्यांमध्येच अधिकच्या गाळपासाठी स्पर्धा असते.शेतकऱ्यांना वेगवेगळे आमिष दाखवून गाळप वाढवण्याचा प्रयत्न असतो. मात्र, यंदाची परस्थिती ही वेगळी आहे. क्षेत्र वाढल्याने राज्यात अजूनही 90 लाख टन उसाचे गाळप रखडलेले आहे. तर लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याचे विक्रमी गाळप झाले आहे. या कारखान्याने 8 लाख 50 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. तर 7 लाख 66 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतलेले आहे.
ऊसतोड मजुरांना वेध परतीचे
पाच महिन्यापूर्वी सुरु झालेला गाळप हंगाम अजूनही जोमात आहे. दरवर्षी मार्च अखेरलाच सर्व काही अंतिम टप्प्यात असते. पण यंदा ऊसाचे क्षेत्र आणि उत्पादन वाढल्यामुळे कारखाने हे सुरुच आहेत. पण पाच महिन्यापूर्वी गाव सोडलेल्या मजुरांना आता परतीचे वेध लागले आहे. राज्यात अधिकतर ऊसतोड मजूर हे बीड जिल्ह्यामधीलच असतात. पण अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण झाल्याने कारखाना प्रशासनाला ऊसतोड मजूर हे टिकवून ठेवावेच लागणार आहेत. त्यामुळे या लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याने अनोखी शक्कल काढली आहे. त्यामुळे कामगार काय निर्णय घेणार हे पहावे लागणार आहे.


