Home चंद्रपूर अनेक हिऱ्यांना पैलू पाडणारा रत्नपारखी

अनेक हिऱ्यांना पैलू पाडणारा रत्नपारखी

175

आयुष्यात काही माणसे अशी भेटतात , आपल्या आयुष्याला नवी कलाटणी देऊन जातात . त्यांच्या सहवासात बहरताना आसमंतीचा परिमल अधिकच भावून जातो .आणि मग वाटायला लागते , भग्न स्वप्नांच्या तुकड्याला कवटाळून बसण्यासाठी मनुष्याचा जन्म झालेला नसून त्याला गरुड पक्षाच्या पंखाच वरदानही लाभलेलं आहे । याची जाणीव करून देण्यासाठी स्व-च्या जाणिवेसह दुसऱ्याच्या अंतरात उमलणारी प्रतिभा हेरून त्याला निस्वार्थी भावाने फुलविणारा व सोने म्हणून जगासमोर आणणारा परीस भेटावा लागतो . असाच चार वर्षाआधि फक्त फोनवर विचार व्यक्त करून आपलंसं करून गेलेला आणि गेल्या एक वर्षांपासून ज्याच्या सहवासात अगदी जवळून काम करताना मला एक वेगळी ओळख देणारा परीस म्हणजे अरुण झगडकर . आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून कोटी कोटी हार्दीक शुभेच्छा ।

स्वकर्तृत्वावर स्वतः मोठे होता येते , पण या प्रसिद्धिच्या झोतात उतून , मातून न जाता स्वतःबरोबर दुसऱ्याचा तेजोवलय पसरवून देणारे विरळ . चंद्रपूर जिल्ह्यात झाडीबोली साहित्याची मुहूर्तमेढ रोवून स्वतःची मिरासदारी न समजता गेल्या चार वर्षात शेकडो हातांना लिहिते करून आत्मविश्वास जागवणारा अरुण झगडकर म्हणजे आजवरी भूभरीत दडलेला लखलखता निखाराच . या निखाऱ्याने राखेतून कित्येक अग्निशलाका धडकल्या . त्या अग्नितून तावून सुलाखून निघालेले कित्येक हिरे झाडीबोलीचा डंका दूर देशी पोहचवत आहेत . त्यांना बळ देण्याचे काम अरुण झगडकर नावाचा मायाळू तितकाच कणखर अवलिया करीत आहे .

दुर्दम्य आशावादाची मशाल हाती घेऊन उत्साहाचा संचार भरणारा वाटाड्या म्हणून कधीच गर्वाचा लवलेश दिसत नसल्याने आजवर हजारो माणसे कमावली . लहानापासून थोरांपर्यंत आपुलकीचा *अरूणभाऊ* हा शब्द ऐकला की अरुणभाऊच्या ममत्वाची उंची आपोआप वाढत जाते . साहित्यक्षेत्रात अनेक अनुचित प्रकार आणि लूटमार सुरू असताना अरुण झगडकर या वलयाने झाडीबोली साहित्य मंडळाची सात्विकता आणि प्रामाणिकपणा टिकवून ठेवल्याने , झाडीबोली साहित्य मंडळावर बोट दाखविण्याची कोणाची हिम्मत नाही आणि तसे कारण पण नाही . झाडीबोली साहित्य मंडळाचा हा निखळ , निर्मळ झरा वाटेत भेटणाऱ्या कित्येकांची तृष्णा भागवत त्यांना साहित्यक्षेत्रात उंच भरारी घेण्याचे सामर्थ्य भरीत आहे . अशा निर्मोही बळकट पंखाला उपमा पण थिट्या पडाव्या असा मार्गदर्शक मला लाभला , याचा मला अभिमान आहे .

संगीत , गायन , वादन यांची आवड असलेला अरुण झगडकर नावाचा वादळ इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी आपला प्रत्येक क्षण खर्ची घालताना , गरज असेल त्याला धीर देण्यात कोठेही कमी पडत नाही . नियोजनापासून आयोजनापर्यंत सतर्कतेने यशस्वीतेसाठी प्रत्येक घटकाला सन्मान मिळेल यासाठी हृदयातून जागरूक अरुण झगडकर मोठ्यांच्या सूचनांची अवहेलना करताना मी तरी कधी बघितला नाही . केल्याचा आव आणून वरिष्ठांच्या अपमानाची संस्कृती आपली नाही , याचा मौलिक संदेश अरुण झगडकर यांच्या व्यक्तिमत्वाने सिद्ध केले आहे . अशा ध्येयवादी व सहकार्यवृत्तीच्या पर्वताकडून आमच्यासारखे कित्येक यशाचे शिखर गाठतील . त्यासाठी अरुण झगडकर यांना उदंड आयुष्य लाभून , त्यांच्या जीवनात सुख ,समृद्धी , शांती व सौख्य लाभो हीच निर्मिकाचरणी प्रार्थना करतो .

✒️लक्ष्मण खोब्रागडे(जुनासुर्ला,ता.मूल,जि.चंद्रपूर)मो:-९८३४९०३५५१

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here