



मागील काही वर्षात दुष्काळाने पिचलेल्या महाराष्ट्राला भारतीय हवामान खात्याने सुखद धक्का दिला आहे. भारतीय हवामान खात्याने यावर्षी पडणाऱ्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हा अंदाज बळीराजासाठी सुखावणारा आहे कारण यावर्षी महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. मराठवाड्याच्या दक्षिणेला सरासरीच्या ११० टक्क्यांहून अधिक पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात अधिक पाऊस होईल. यावर्षी देशाच्या उत्तर भारतात काही ठिकाणी, तसेच ईशान्य भारतात कमी पाऊस पडेल पण देशाच्या इतर भागात मात्र सरासरी इतका पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यंदा देशात मोसमी पावसाचे प्रमाण ९९ टक्के राहील असेही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. याआधी स्काय मेट या संस्थेनेही सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता हा अंदाज बळीराजासाठी जितका सुखावणारा आहे तितकाच तो उद्योग जगतासाठी देखील सुखावणारा आहे कारण कोरोनामुळे गेले दोन वर्ष उद्योग जगताचे चाक अडकून पडले आहे.
भारताची अर्थव्यवस्था शेतीवरच अवलंबून आहे. शेती हाच भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आजही देशाची ६० टक्के लोकसंख्या ही शेतीवरच अवलंबून आहे त्यामुळे तिच्या स्थैर्यासाठी आणि विकासासाठी शेतीचे विशेष महत्व आहे. मागील काही वर्षात देशात दुष्काळ पडला होता त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला होता. मागील वर्षी चांगला पाऊस झाला पण कोरोनामुळे देशभर लॉक डाऊन लागल्याने देशातील उद्योगधंदे ठप्प झाले त्यामुळे जीडीपी घसरला अशा वेळी शेती क्षेत्राने देशाला वाचवले. यावर्षी कोरोनाची लाट पूर्णपणे ओसरली असल्याने देश अनलॉक झाला आहे. देशातील सर्व निर्बंध उठले आहेत असे असले तरी देशाची अर्थव्यवस्था अद्याप रुळावर आलेली नाही. अजूनही देशाचीअर्थव्यवस्थेला गती मिळाली नाही अशावेळी देशाची अर्थव्यवस्था टिकवण्याची जबाबदारी पुन्हा एकदा शेती क्षेत्रावर आली आहे त्यामुळेच हवामान खात्याच्या पावसाच्या अंदाजाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. यावर्षी सरासरी एव्हढा पाऊस पडणार असल्याने भरघोस पीक येऊन रान आबादानी होणार आहे.
महाराष्ट्रात लागू झालेल्या संचारबंदीतुन आणि कठोर निर्बंधातून शेती क्षेत्राला वगळले होते याबद्दल महाराष्ट्र सरकारचे आभार मानावे लागेल. कारण शेतीच्या कामासाठी हा काळ खूप महत्वाचा आहे. शेतीचे सर्व कामे वेळेतच करावे लागतात. खते, बी बियाणे, कर्जपुरवठा, पीक विमा यासारख्या कामात कोरोनामुळे खंड पडणार नाही याची दक्षता सरकारने घेतली होती. हवामान खात्याने जाहीर केलेल्या अंदाजानुसार जर पाऊस पडला तर कोरोनाच्या महामारीतुन त्रस्त झालेला आपला देश पुन्हा उभारी घेईल आणि आपली अर्थव्यवस्था पूर्वपदावर येईल.
✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा पुणे)





