



मागील वर्षी संत गाडगेबाबा जयंतीला वक्ता म्हणुन गेलो होतो. विचारपिठावर नावारुपास आलेले वक्तेही होते. तीन वक्त्यांची भाषणं झाल्यानंतर मी भाषणासाठी ऊठलो. माझी एक सवय आहे.मी लिहितांना किंवा बोलतांना अगदी स्वच्छ बोलतो, लिहितो. त्या बोलण्यानं किवा लिहिण्यानं ईतरांना वरं वाटावं म्हणून मी लिहित, बोलत नाही. वस्तुस्थिती असेल ते बोलायचं. लिहायचं.हा माझा मीच बनवुन टाकलेला नियम आहे.
मग भाषण गाडगेबाबांच्या जीवणावर द्यायचं होतं. म्हणजे त्यांना अपेक्षीत असलेल्या समाज रचनेच्या निर्मीतीसाठी जे बोलावं लागणार होतं तेच मी बोललो. मी जी निरिक्षणं नोंद्विलित ती प्रेक्षक आणि श्रोते अशा दुहेरी भुमिकेत असलेल्या लोकांपुढे आपल्या अवतीभवतीची उदाहरणे देत माझं भाषण रेटत गेलो. मी म्हणालो गाडगेबाबांनी माणसाला केंद्रबींदू मानुन आपलं आयुष्य दलित, पिडित समाजासाठी खर्ची घातलं. आणि आपण विवक्षित तारखा आल्या की तंबू तानायचा. बोंबल्याचा मोठा गलका करुन प्रबोधनपर गाणी वाजवायची. हारतुऱ्यांचे सोपस्कार आटपुन संचालन, समापन वगैरे करायचं. पण मग प्रश्न ऊरतो, त्याचा फायदा काय? मला बोलता येईल तेवढं बोललो. त्यात देवी, देवता, अंधश्रद्धा, बुवाबाजी आणि ढोंगधतुरे वगैरे विषय रेटत गेलो. आणि शेवटी मी माझ्याच गावातील ऊदाहरणाकडे वळलो. म्हणालो, ह्या गांधीचौकातील दगड दरवर्षी श्रीमंत होतांना पाहीला. हा दगड आमच्या बालपणात तिकडे विद्याश्री टाँकीजच्या रस्त्यावर, हागंदारीत एका चिंचेच्या झाडाच्या विशाल भोकात अतिशय दारिद्र्यात जीवन कंठतांना पाहीला. तेव्हा ह्या दगडाचं नाव “माराई” होतं. माराई च्या भोवती माणसं शौच करित असत. मग माराई नावाचा हा दगड कदाचीत त्या घाणेनं गुदमरल्या सारखा होत असावा…..
एक दिवस मी त्या रस्त्याने गेलो तर माराई नावाचा तो दगड तिथे दीसला नाही. नारळाची टरफलं, अर्धवट विझलेल्या अगरबत्या आणि पुजेसाठी कायम वापरात असलेल्या वस्तू म्हणजे गुलाल, बुक्का, शेंदूर वगैरेंचा पसारा तेवढा बाकी होता. मी त्या वेळी क्षणभर गोंधळलो. माराई अद्रुश्य झालीय की काय बुवा.? असा मला शंकामुलक प्रश्न पडला.आणि तेवढ्या वेळात मन काही क्षणांसाठी घाबरलं. कारण त्यावेळी देवादीकांच्या आणि त्यांच्या जादुई क्रुत्यांच्या कपोलकल्पीत कथांचा मनावर प्रभाव होता. त्या प्रभावात मी काही क्षण राहीलो. आणि त्या दगडाचा म्हणजे माराईचा आजूबाजुला नजर टाकुन शोध घेऊन पाहीला. तिकडे शोध सूरु असतांना तो दगड म्हणजे माराई अकल्पीतपणे आपल्या पाठीशी खरेच ऊभी राहीली तर ! ह्या विचारानं भयग्रस्त नजरेनं क्षणात मागे वळलो. ती पाठीमागे ऊभी नसल्याची खात्री झाली…. ईक्या वेळात त्या रस्त्याने कुणी आलं गेलं नाही. म्हणून मन थोडसं धास्तावलं. मी घाईनेच घराच्या दीशेनं वळलो. काही पावलांचं अंतर कापलं तर एक म्हातारा मलविसर्जनासाठी हातात डबा घेऊन त्याच चिंचेच्या झाडाकडे निघाला होता. मी चालू लागलो तसा…. गांधी चौक जवळ येऊ लागला. आणि भजनपुजनाचा अस्पस्ट आवाजही येऊ लागला. मी आणखी वेग घेतला .आणि आवाजही स्पस्ट होवु लागला. नियोजीत चौकात प्रचंड बाया माणसं जमली होती.कमरेतुन घसरू पहाणारा माझा पँट मी कमरेवर स्थिरस्थावर केला. आणि गर्दीत शिरलो. गोपाला गोपाला रे म्हणत मी ही नाचु लागलो. अल्पावधीत तो कर्कश आवाज मला नकोसा झाला होता. पण प्रसादाचं ते भलंथोरलं टोपलं बघीतलं, त्यातील, काकडी, अँपल ,केळं, पोहे, भिजलेली चना डाळ, लाह्या आणि न विरघळलेली ओलसर साखर हे सारं बघुन मन तिथुन निघत नव्हतं. तोंडाला पाणी सुटलं. आणि पोटात भुकेचा आगडोंबही ऊठला होता आता सारं लक्ष त्या टोपलेवाल्याकडे लागुन राहीलं.
कधी एकदाचा वाटप कार्यक्रम सुरु होतो, कधी काला फुटतो अशी मला सारखी हुरहुर लागलेली. ईतक्यात, हं झालं कारे निट, असा कुणाचा तरी गर्दीतुन आवाज आला. मी त्या आवाजाच्या दीशेनं पाहीलं, तर तिथे माराई नावाचा दगड गर्द शेंदराने रंगला होता. त्यावर वेगळी चमक होती. सिमेंटचा ओटा अगदी लहान पण आकर्षक बनविण्यात आला होता. त्या ओट्यावर अगदी लहान खिडकीएवढ्या आकाराचं स्लँबचं घर करण्यात आलं होतं. आणि दगड त्या घरात, थंडी, वारा वादळ, पाऊसपाणी ईत्यादींपासुन संरक्षीत झाला होता.दगडाला घर मिळालं होतं. त्याची चमक त्याची श्रीमंती आणि श्रद्धाळूंच्या क्रुपेनं त्याला मिळालेलं ते घरकुल, घरकुल कसलं? एकट्या आणि मुळात आकाराने फार मोठा नसलेल्या त्या दगडाला मिळालेला एकप्रकारचा बंगलाच तो! लोक वर्गणीतुन दगड श्रीमंत झाला होता. त्याला श्रीमंत करण्यासाठी ज्यांनी वर्गणी दीली होती, तेही तिथे दींडी भजनात रममान झाले होते. बऱ्याच लोकांच्या अंगावर धड वस्त्रे नव्हती.मळकट आणि अनेक ठिकाणी ठीगळं पडलेले त्यातील अनेकांचे कपडे मी पाहीले होते. ते तालबद्ध आवाजात भजन म्हणत होते. मोठ्याने टाळमृदंगांचा आवाज वाढला होता. भाविक आणखीच भावनिक होवुन नाचु लागले. आणि काला फुटला. तसा हातात बोंबल्या (स्पिकर) असणारामाऩूस मोठ्याने जयजयकार करु लागला., बोलो शितला माता की जय. माराई हे त्या दगडाचं मुळ नाव. आणि आताचं नविन नाव शितला माता.
ईथुन दगडाच्या प्रमोशनची सुरूवात झाली होती. हागंदारीत विशाल चिंचेच्या विशाल भोकात पडुन असलेला दगड आणि आता आपादमस्तक चमक असलेला स्लँबच्या घरातील दगड, असं ते प्रमोशन होतं. मी काला घेण्यासाठी हात अपुरे पडतील आणि अधिक काला मिळवता येणार नाही म्हणून, सदऱ्याचे खालील दोन बटनं काढून घेतले. आणि सदऱ्याचा ओचा पसरला. त्यात मुठभरुन काला मिळाला. अधाशासारखा मी तो तोंडात कोंबुन घेतला. आणि गर्दीतुन वाट काढू लागलो.
हळू हळू मी शिकु लागलो. मोठा होवु लागलो. आणि दगडही (शितला माता/माराई) मोठा होवु लागला. त्याला शेंदराचा लेप जड होवु लागला. तो भार कसातरी पेलवत होता.शैक्षणीक अभ्यासाबरोबरच ईतर साहित्यही वाचु लागलो. आणि देवादीकांच्या, भुतबाधेच्या, मंत्रातंत्रांच्या भयानं मनात घर केलं होतं, ते भय आता निघुन जावु लागलं. मन आताशा भुताकटीच्या, कल्पनांतुन मुक्त झालं. रितं झालं. शिक्षण तसंच सुरु राहीलं. रानोमाळ फीरणारा मी, घाणेरड्या कपड्यांत रहाणारा मी पुर्णतः बदललो. सुटाबुटात आलो. ही बाबासाहेब, महात्मा फुले ह्यांच्या विचारांची जादू आहे. माझ्यातील बदल जसा मी हेरला तसं त्या दगडाकडेही माझं लक्ष होतंच. दगडही आता कमालीचा श्रीमंत झाला. त्याचा खिडकीएवढा बंगला कधीचाच पडलाय. आता तिथे मोठं मंदीर ऊभारलं गेलं.
वर छान आकर्षक कळस आहे. मंदीराच्या चौफेर सुशोभीत जाळ्या लावल्या. भक्तीचा तो उत्तम नमुना शितलामाता मंदीराच्या रुपाने गांधीचौकात उभा आहे. आणि भक्त तसेच फाटक्या ठिगळलेल्या कपड्यात आहेत. माझ्या वयाची त्यांची दुसरी पिढी क्वचित सोडलेत तर निरक्षर झाली. त्यांची पोरही तशीच चावडीवर अर्धवट कपड्यांत मी पहातोय. ही पिढीही तशीच वर्गणी देउन मोकळी होईल, असं चित्र आहे. जगण्याचे संदर्भ शोधण्याच्या नादात फार कुणी पडल्याचं दीसत नाही. प्रगती म्हणावी अशी दोळ्यांत भरणारी शितलामातेच्या श्रीमंतीशिवाय त्या वेटाळात मला काही दीसत नाही. माझ्याकडे बघा, सुमारे तेहत्तीस किमी. पायी प्रवास करुन परिक्षेचा फाँर्म भरुन परतायचो. कारण त्यावेळी विस तीस रुपयेही नसायचे .आज तुमच्या मंडळाला हजार रुपयांची देणगी दीलीय. काल माझ्याकडे बघून माझ्या गरिबीची टर उडविली त्यांनी आज मला फुलांचा हार घालुन माझं स्वागत केलं. ईथे बैसन्याचा मान दीला. ही माझी आजची सर्वात मोठी श्रीमंती आहे. हा बाबासाहेबांच्या विचारांचा विजय आहे. फुलेंच्या, गाडगे बाबांच्या विचारांची जादू आहे. आणि ज्यांनी ह्या विचारांना नाकारलं ते लोक दिवसभर राबतात. घामाने थबथबलेलं शरीर आणि शिण दारुच्या हवाली करतात. दारूने अनेक संसार मेाडुन पडलेत. पत्त्यांच्या बंगल्यसारखे.माणसंही अती नशाखोरीनं जगाचा निरोप घेऊन मोकळी झाली. काही मरणासन्न झालीत. तरी अखेरच्या श्वासातही ग्रँम शंभर ग्रँम दारुसाठी अनेकांकडे हात पसरतांना मी पहातोय. दगडाला श्रीमंत करण्यासाठी वर्गणीची पावती फाडणारी हीच माणसं दारुसाठीही वर्गणी मागतात. हे चित्र फार विचित्र आहे. माणसामाणसा कधी होशिल माणुस असं कोणत्यातरी साहित्यिकानं म्हटल्याचं आठवतं. आपल्या श्रद्धा किती आणि कशा असाव्यात ह्याचा विचार माणसांनी कधीतरी करायला नको का? आपल्याला डोकं आहे.
कुणीही येऊन कोणतीही वस्तू भरुन जायला ते काही डोकं नावाचं खोकं नाही. मग डोक्याच्या एका कप्प्यात निवांत पडलेल्या मेंदुला आपण कधीतरी जागवणार आहोत की नाही ?……… आपण दगडासाठी जी वर्गणी करतो ती माणसांठी करता आली तर माणसांचा विकास घडवता येईल. दरवर्षी एक गरिब कुटुंब उद्योगशील होईल. एखाद्या गरिब कुटुंबातील व्यक्तीला ताप आजारातुन वाचवण्यासाठी वर्गणी करून बघा हा आनंद बोलका बोईल. गाडगेबाबांचे हेच विचार आहेत…..
मी ईथवर बोलत आलो आणि माझ्याकडे मंडळाचा एक कार्यकर्ता चिठोरा घेऊन आला. मी पाहीलं. त्यात लिहिलं होतं, क्रुपया आवरतं घ्या. मी काय समजायचं ते समजलो. शितला मातेच्या मागे मी हात धुवुन लागलो. आणखी एखाद देवीला टार्गेट करणार की काय असं त्यांना वाटलं असावं. मी भाषणाला पूर्णविराम देऊन त्या चिठोऱ्याला मान दीला. मग एक डाँक्टर महाशय भाषणाला ऊठले. ते ऊठताच सुरुवात केली ती अशी, ईथे गाडगे बाबांना कार्यकर्ते रोज आंघोळ घालुन देतात. पुतळा स्वच्छ करतात. कुणी कितीही तत्वाच्या गोष्टी बोलत असले तरी त्यांच्या महापुरुषांचे पुतळे पक्षांच्या विष्ठेने आणि धुळीने माखलेले असतात. वगैरेवगैरे…..
आता आपण मुळ मुद्याकडे येऊ. माझं भाषण ईथे सांगुन मी फार विद्वान आहे हे मला सांगायचं होतं. (तुम्हाला विनोद झालाय असं वाटत असल्यास हसू शकता) मी हजार रूपयांची देऩगी दीली. ते मी भाषणात कटवलेत. हजार रूपये दील्याशिवाय कुणी भाषणाला बोलवत नाही, हे वास्तव आहे. (तुम्ही पुन्हा हसु शकता) आता आपण महत्वाच्या मुद्याकडे य़ेऊ.
आषाढी एकादसीला सुरूवात झाली आणि वारी स्तवणाला चौफेर पेव फुटलं. हे दरवर्षी ठरलेलं असतं. आता शोशल मिडिया अधिक प्रगत झाल्याने प्रत्येकांना आपली मतं व्यक्त करण्यासाठी मुक्त विचारपिठ मिळालंय जणू! मग अनेकांचा अभ्यास न्यारा. त्यांची मतंही वेगळी. हजारोंच्या संख्येनं माणसं पंढरपुरच्या दीशेनं चालू लागतात. ही शतकांची परंपरा आली आहे.
त्यांना तिकडे कुणीतरी खुनावतोय. पण आपल्याला बाबासाहेबांनी दगडापुढे माथा टेकायचा नाही असं सांगितलं. तरी आपल्यातील अतीहुशार लोकांनी नवा शोध लावला. त्यांचं असं मत आहे, किंवा अभ्यास आहे की पंढरपुरचा पांडुरंग हा दसरा तिसरा कुणी नसुन ती बुद्ध आहे. आणि त्याहीपुढे असं म्हणतात की देशातील अनेक मंदीरे ही पुर्वी स्तुप होती. व त्यात बुद्ध मुर्ती होत्या. त्या सर्व ठिकाणी आता देवी देवता आहेत. हा नवा शोध ईतक्यावर थांबला नाही. मागच्या दाराने आलेला एक रिपाईं आमदार (विधानपरिषद सदस्य) ह्या महाशयांनी पंढरपुर पदयात्रा काढुन काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पंढरपुरला हींदूंच्या अतिक्रमणात आणि पांडुरंगाच्या रुपात असलेल्या बुद्धाला मुक्त करण्यासाठी प्रयत्न चालविलेत. ही खरेतर आंबेडकरवाद्यांसाठी अतिशय खेदाची बाब मानली पाहीजे. देशात मंदीर आहे तिथे बुद्ध आहे आणि बुद्ध आहे तिथे ही चळवळ वळवळ करायला गेली तर पुढच्या हजारो पिढ्यांचं आयुष्य बुद्ध मुक्तीसाठी खर्ची होईल. समजा तिथे बुद्ध मुर्ती असेलच तर पांडुरंगाच्या रुपाने का होईना, वारकरी बुद्धाला नकळत पुजतात. एवढं समाधान असु द्या. बुद्धाच्या मुक्तीसाठी चळवळ मंदीर मंदीर भटकु लागली तर नव्या पिढीकडे चुकीचा संदेश जाईल. आणि बाबासाहेबांनी ज्या दलदलीतुन अतिशय कष्टाने काढलं त्याच दलदलीत आपला समाज रमु लागेल.
पंढरपुरच्या पांडुरंगात बुद्ध नाही हा वारकरी संप्रदायाचा दावा आहे म्हणुन ते तिथे नतमस्तक होतात. आणि पांडुरंग हा बुद्ध आहे म्हणून ऊद्या भविषात आंबेडकरी समाज तिथे वारी करु लागला तर बाबासाहेबांचा सगळ्यात मोठा पराभव असेल. खरे तर ही हींदुत्ववाद्यांची खेळी असण्याची दाट शक्यता आहे.
घर वापसी अभियान असण्याची शक्यता आहे. हिंदुंचे सण आले की आपली नाळ त्यांच्याशी जोडण्याची एकही संधी अलीकडे ते सोडत ऩाहीत. आषाढी एकादशीला पांडुरंगाच्या मुर्तीत बुद्ध शोधला गेला. आता गणपतीच्या मुर्तीतही बुद्ध शोधु लागले आहेत. सध्या वँटस् अप च्या माध्यमातुन प्रबोधनकार ठाकरेंच्या पोस्ट जोर धरु लागल्या आहेत.प्रबोधनकार ठाकरे आपला वंश हत्ती सांगतात. पण आपण नाग वंशिय आहोत हे आपल्यापैकी अनेकांना ठाऊक आहे. नाग म्हणजे हत्ती. पण टोटेम म्हणून आपण हत्तीची पुजा करत नाही. टोटेम म्हणून नाग सापाची पुजा करतात असं मत काही वैचारिक व्यक्ती मांडतांना दीसतात. आणि ह्या मताला अनेक मंडळी दुजोरा देतात. तर ठाकरेंच्या नावे कुणी वेगळीच व्यक्ती आपल्यात गणपती घुसवतेय का ? हा विचार करून बघण्याची गरज आहे.
परत अयोध्येच्या उत्खणनात बुद्ध अवशेष मिळाल्याच्या पोस्ट फिरतायत. आणि त्याचा फार विचार न करता आपली माणसं खमंग चर्चा करतायत. अयोध्या हींदू मुस्लींमांचा वाद आहे. अशा पोस्ट फिरवुन आपल्या माणसांनी नको त्या वादात पडण्याची गरज नाही. कारण जातीवाद्यांचे आणि धर्मवाद्यांचे मनसुबे नेक नाहीत. हा वाद चिघळवून भविष्यात बौद्ध विरूद्ध मुस्लीम असा धार्मिक सामना बघण्यासाठी राजकीय कावळेही चोच मारण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ ह्या म्हणीप्रमाने आपल्या क्रुती वाणीतुन काही घडू नये. कारण धार्मीक युद्धात आपण ऊडी घेतलीच तर पंड्यांच्या आणि हींदू धर्मवाद्यांच्या तावडीतुन बौद्धविहारं मुक्त करण्यासाठी सबंध देश पायपीट करावा लागेल. म्हणून सध्या अयोध्या ऊत्खणनाकडे वेट अँण्ड वाच एवढ्या भूमिकेतुन बघा. म्हणजे सत्य जे बाहेर येईल त्याने हींदु आणि मुस्लीम दोघांचीही बोलती बंद होईल.
काही लोक वरिल नेत्याच्या गळाला लागलेत. त्यांनी ह्या आमदाराच्या लढ्याची तुलना बाबासाहेबांच्या काळाराम मंदीर लढ्याशी केलीय. ही तुलना अतीशय घाणेरडी वाटते आहे. काजव्याचा उजेड फक्त त्याच्या ढुंगणाखाली असतो. तो वाटसरूला वाट दाखवु शकत नाही. बाबासाहेब म्हणजे महासुर्य. त्यामुळेच काजव्याची आणि महासुर्याची तुलना ही फार मोठी विसंगती वाटते. बाबासाहेबांचं आंदोलन मंदीरात जाउन नतमस्तक होउन श्रद्धाळु भक्त म्हणून जातीवाद्यांकडे आणि धर्मवाद्यांकडे परवानगी मागण्यासाठीचं नव्हतं.
तर मंदीर हे सार्वजनिक स्थळ आहे आणि त्यात माणूस म्हणून आम्हाला वागवलं जावं एवढ्यासाठी होतं. चवदार तळ्याचं पाणी खुप गोड होतं म्हणून चाखलं नाही, तर ती नैसर्गीक साधनसंपत्ती आहे आणि माणूस म्हणून आमचा समान अधिकार आहे हे सांगण्यासाठी ते आंदोलन होतं.
धर्मांतरानंतर बाबासाहेब आपल्या भाषणात, आज माझा पुनर्जन्म झाला, असं म्हणत ते हींदू धर्मातुन बाहेर पडल्याचं समाधान व्यक्त करतात. आपल्याला बाविस प्रतिध्न्या देतात. त्यात ब्रम्ह, विष्णु, महेश ह्यांना देव मानणार नाही असं सांगतात. तरी आपली वाट देवांच्या दीशेनं चालली आहे. का ? तर हींदुंची मंदीरे ही पुर्वीची विहारं होती. आणि त्यात असलेले देव हे बुद्ध आहेत हा अलीकडच्या बुद्धीवाद्यांचा दावा आहे. बौद्ध धम्म अनेक शासकांच्या जाचामुळे काळाच्या पडद्याआड गडप झाला हा ईतिहास सर्वश्रुत आहे . प्रखर बुद्धीच्या बाबासाहेबांना हे माहीत होत तरी मंदीर मुक्ती, बुद्ध मुक्तीचा लढा बाबासाहेब लढले नाहीत. (क्रुपया कुणाच्या वाचणातुन तसं गेलं असल्यास माहीती पुरवा) त्यांना मंदीर मुक्तीच्या लढ्याची गरज वाटली नाही. मग आता आपल्याला तो मुद्दा महत्वाचा का वाटतो ?
पाऊले चलली पंढरीची वाट…. म्हणत दरवर्षी लोकांचा लोंढा पंढरीच्या वारीला निघतो. त्यात बरीच गम्मत जम्मत असते. वारकरी फेर धरुन नाचतात. फुगड्या खेळतात. आणखीही बरीच गंमत असते. पण बाबासाहेबांनी आपल्याला अशी गम्मत करायला शकविलं नाही. कारण त्यांच्या आयुष्यात अशी गम्मत नव्हती. अतिशय प्रतिकुल परिस्थिती आणि नानाविध समस्यांनी त्यांचं आयुष्य व्यापलं होतं. तीच स्थिती समाजाची होती. समाजाला अतिशय यातना भोगाव्या लागतात हे त्यांनी पाहीलं होतं. सर्वप्रथम त्यांनी देवांपासुन मुक्ती दीली. वरील भाषणातील वाक्य हे त्याचंच प्रतिक आहे.
ज्यांनी देवाच्या नादी लागु नका असं सांगीतलं त्यांचच आपण ऐकत नाही. आणि आपल्या अभ्यासाच्या पोस्ट वँटस् अप, फेसबुकसारख्या शोशल मिडियावर टाकतो. काय असतात त्या पोस्ट, पंढरपुरच्या पांडुरंगात बुद्ध. देशातील अनेक मंदीरं ही विहारं होती, हींदुचे त्यावर अतिक्रमण…. वगैरे. हे सारं खरं आहे. अनेक ठीकाणी ही स्थिती बघायला मिळते. पण आता परत मंदीराच्या पायऱ्या कधीकाळच्या भुतकाळात तिथे बुद्धाचं वास्तव्य होतं म्हणून चढायच्या हे शहाणपणाचं लक्षण नाही. कारण येणारी पिढी आस्तीक होउन बुद्धाच्या प्रतिमेला नमन करताकरता प्रत्यक्षपणे हींदूंच्या देव नावाच्या दगडापुढे नतमस्तक होईल. म्हणुनच स्वतःला नेते म्हणवुन घेणाऱ्या ठेकेदारांनी आणि आरएसएस च्या बगलबच्चांनी मंदीरांच्या,दगडांच्या दीशेनं नेऊ नये.मी माझ्यानंतर बोललेल्या वक्त्याचा संदर्भ दीला होता. आता आपण त्याचा विचार करु. देशभरात अनेक विहारं आहेत. जीथे वसती तिथे विहार आणि बाबसाहेब तसेच बुद्ध मुर्ती आहेत. वस्तुस्थिती अशी आहे की अनेक विहारं अतिशय बकाल, घाणेरडी, रंग उडालेली, भिंतींचे पोपडे निघालेली. अशी आहेत. तथागत बुद्ध आणि बाबासाहेब हे महामानव धुळीनं माखुन गेलेले आहेत. त्यावर पक्षांच्या विष्ठांचा थर आहे. हे पुतळे आणि विहार ६ डिसेंबर आणि १४ एप्रिलच्या १४ ऑक्टोबरच्या प्रतिक्षेत असतात. कारण ह्या तारखांना आपला आंबेडकरवाद ओसंडुन, ओतप्रोत वाहतो.
अचानक पुतळे प्रेमाची भरती येते. विहार आणि पुतळे चकाकु लागतात. त्यानंतर विहाराकडे आमच्या पाऊलखुना क्वचितच दीसतात. विहारं आतुन बाहेरुन धुळीनं माखतात. दाराच्या कुलुपाला कधी उघडण्याची वेळ आलीच तर राकेल, पेट्रोल घालुन कुलूपाचा श्वास मोकळा करावा लागतो, ईतके विहारांचे कुलुप गंजुन गुदमरुन जातात. आणि मग त्या वक्त्यासारखे लोक. आंबेडकर, बुद्ध फुलेंच्या प्रेमाची टींगल टवाळी करतात. अशावेळी आपल्याला मुकपणे मान घालुन गप व्हावं लागतं.
आपण आपली चळवळ विहारं सोडुन पंढरीच्या वारीला, देशभरातील मंदीरांच्या वारीला नेण्याची गरज आहे का ? आपल्या नजीक असलेल्या विहारात आपण जाउन ती झाडण्यापुसण्याची, स्वच्छ ठेवण्याची गरज आहे. ही विहारं आपल्या नव्या पिढीला तेव्हा कळतील. त्यांचं महत्व तेव्हा कळेल. बुद्ध ,आंबेडकर,फुले हे विहारातुन नव्या पिढीकडे देण्याची सोय केली पाहीजे. प्रत्येक विहारात बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ असला पाहीजे. रोज त्या ग्रंथाचं अर्धा एक तास ह्यापैकी जी वेळ सोईची वाटेल त्या वेळेत ग्रंथाचं वाचन व्हायला पाहीजे. समाजातील लोकांनी सोईची वेळ ठरवून विहारात एकत्र आलं पाहीजे. ग्रंथ वाचुन संपल्यानंतर तीच सुरूवात नव्यानं करायला पाहीजे. त्यामुळे नव्या जुन्या पिढीला बुद्ध कळेल. तसेच विहारात अनेक स्पर्धा, सरकारी सेवाक्षेत्रातील मार्गदर्शन, त्यासबंधातील पुस्तकांची ऊपलब्धता करुन दीली पाहीजे. त्यामुळे शिक्षीत पिढी अभ्यासात रमुन भविष्याच्या ऊभारणीसाठी विहारांचा ऊपयोग करेल…….. शिवाय अनेक कल्पक लोक आपआपल्या कल्पना सुचवतील. आणि त्या अमलात आणल्या जातील. ह्या कामात सामाजिक भान असणाऱ्या वेगवेगळ्या क्षेक्रातील निव्रुत्त कर्मचार्यांचा सहयोग घेता येईल.
विहारं पुतळे रोज स्वच्छ झाडुन, धुवुन घ्यावेत. ही कामे वेळापत्रक करुन समाजातील प्रत्येक कुटुंबाकडुन करुन घ्यावीत. विहारं आतर्बाह्य सुशोभीत झालीत तर अनेकांच्या विरंगुळ्याची वास्तू होईल. फळ, फुलझाडे लावुन निसर्गरम्य वातावरणाची निर्मिती करता येईल. आपली माणसं तिथे एकत्र आली तर समाजात सुसंवाद निर्माण होईल. आपण एकासाठी सर्व आणि सर्वांसाठी एक झालो तर अल्पावधीत आपल्या समाजाची भरभराट झालेली दीसेल. पण आपली विहारं, मुर्त्या घाणेरड्या अवस्थेत ठेऊन आपण आपली चळवळ पंढरीच्या वाटेनं नेऊ लागलो तर एक ना धड भाराभर चिंधड्या अशी होईल.आपल्या मुक्तीचा मार्ग पंढरपुरच्या पांडुरंगात नाही. आपल्या नजीकच्या विहारात आहे. तिथेच आमचा आदर, आमची श्रद्धा, आमचा विश्वास आणि आमच्या चळवळीचा स्वासही आहे. काही मुर्खांनी ही चळवळ पंढरीच्या दिशेनं नेऊन, “चळवळं चालली पंढरीची वाट….”असा चुकीचा संदेश समाजात पेरला. पण आपण नेहमी चौकस आणि डोळस असलो पाहीजे. नाहीतर पुन्हा दगडांच्या पुढे डोकं रगडुन आमच्या पुर्वजांसारखी स्थिती ओढावण्यास आपल्यातीलच माणसं कारणीभुत ठरतील. तेव्हा, सदैव सावध, सजग रहा.
समाप्त
✒️लेखक :- राजू बोरकर(मो. नं. ७५०७०२५४६७)


