




🔹उदय साटम, आदर्श शिंदे यांच्या कलाविष्कारांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन
🔸भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने भीम महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन
✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)
परळी(दि.10एप्रिल):- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळी शहरात दि. 15 ते 17 एप्रिल दरम्यान ‘भीम महोत्सव’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची स्थापना करण्यात आली आहे.
दि. 14 एप्रिल रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन या तीन दिवसीय महोत्सवाचा प्रारंभ होईल. दि. 15 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वा. कलारंजना मुंबई, निर्मित व उदय साटम दिग्दर्शित 75 कलाकारांचा समावेश असलेला वंदन भीमराया हा कार्यक्रम होईल. दि. 16 एप्रिल रोजी प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांचा लाईव्ह भीम गीतांचा जंगी कार्यक्रम होईल व अखेरच्या दिवशी 17 एप्रिल रोजी प्रा. प्रकाशकुमार वाघमारे प्रस्तुत ‘भीमा तुझ्या जन्मामुळे’ या प्रसिद्ध नाटकाचा प्रयोग होईल. हे तीनही कार्यक्रम परळी शहरातील मोंढा मैदानात सायंकाळी 7 वा. होणार असून, या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
परळी शहरात सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच जातीपाती बाजूला ठेऊन सर्व महापुरुषांच्या जयंतीचे भव्य स्वरूपात आयोजन करण्याची परंपरा धनंजय मुंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी जोपासली आहे. त्याच परंपरेचा भाग म्हणून हा जयंती उत्सव कोविडच्या निर्बंध मुक्तीनंतर भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येत आहे.




