



राज्याचे शिक्षणआयुक्त यांनी एप्रिल महिन्यात शाळा भरवावी व शनिवार रविवारीही शाळा भरवावी असे आदेश दिल्यावर शिक्षक संघटना आणि शहरी पालकांनी टीका केली व परीक्षा संपल्यावर लगेच सुटी व २ मेला निकाल असा बदल करण्यात आला. कोरोनाकाळात मुलांच्या शिक्षणाची नुकसान झाली आहे हे सर्वांना मान्य असताना शासन जर पुढाकार घेत असेल तर शाळा भरवायला पाठींबा द्यायला हवा होता. पण यानिमित्ताने हक्काची सुटी अजिबात सोडायला शिक्षक संघटना तयार नाहीत. दिवाळीची सुटी कमी करण्याचा विषय आला तेव्हाही संघटनानी काही जिल्ह्यात विरोध केला. संघटना आक्रमक झाल्या की सरकार माघार घेते व ज्या विद्यार्थ्यांच्या जीवनावर थेट परिणाम होतो ते बिचारे बोलू शकत नाहीत.
त्यामुळे या सुट्याच्या तरतुदीवरच चर्चा आता करायला हवी. शिक्षण हक्क कायद्यात शाळा किमान २२० दिवस भरावी असे म्हटले आहे.यापेक्षा जास्त दिवस शाळा भरली तरी चालेल पण तेच दिवस अंतिम मानले जाते. ५२ रविवार व ७६ दिवस सुटी अशी १२८ दिवस सुटी अधिकृत आहे. ५२ रविवारची सुटी योग्य आहे पण ७६ दिवसांची सुटी का दिली जाते याची उलटतपासणी करायला हवी.यात सर्वात जास्त काळ सुटी ही मे महिन्याची आहे. ब्रिटीशांना इथला उन्हाळा सहन होत नसल्याने न्यायालये आणि शिक्षणात या सुट्या आल्या. उन्हाळ्यात मुलांना परीक्षा झाल्यावर ८ दिवस सुटी द्यावी पण ४१ दिवसाची सुटी दिली आहे. ऊन असले तरी अगदी सकाळी ७ ते १० शाळा,महाविद्यालय भरवणे अशक्य आहे का ? त्यात व्यक्तिमत्व विकास उपक्रम, छंदवर्ग घेणे अगदीच शक्य आहे व त्या दिवशी उरलेल्या वेळेत शिक्षकांचे व्यक्तिमत्व विकास करणारे प्रशिक्षण,प्रकल्प,वाचन असे काही करता येईल व सुटी देण्यापेक्षा शिक्षक व विद्यार्थी यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी हा काळ वापरायला हवा.
सुटीच्या काळात वेतन दिले जाते तर मुलांना उन्हामुळे सुटी असताना तो वेळ शिक्षकांच्या,प्राध्यापकांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी वापरावा. दिवाळी ५ दिवसांची असताना १५ दिवसापेक्षा सुटी का दिली जाते ? इतर सर्व खाजगी कार्यालये,कारखाने लगेच उघडतात मग शाळा,कॉलेजांना जास्त सुटी कशाला ? अनेक शाळा,महाविद्यालयात एकही ख्रिस्ती विद्यर्थी नसताना १० दिवस नाताळाची सुटी कशासाठी हे आता ठामपणे विचारायला हवे.सण साजरे करताना व महापुरुषाना वंदन करताना सुटी हाच उपाय का दिसतो ? यावर विचार करण्याची गरज आहे. जयंती पुण्यतिथीला सुटी देवून आपण त्या महापुरुषांचा परिचय मुलांना होऊ देत नाही.उत्तरप्रदेश सरकारने त्यासाठी जयंती पुण्यतिथीच्या सुट्या रद्द केल्या व शाळेत कार्यक्रम घ्यायला सांगितले.आपल्याकडे आदर व्यक्त करण्यासाठी सुटी हे उत्तर असते.लता मंगेशकर यांचा दुखवटा म्हणून सुटी दिली. वास्तविक त्यांच्या गाण्याचे कार्यक्रम शाळा,महाविद्यालयात ठेवता आले असते. सणाच्या दिवशी मुले शिक्षक काय करतात ? हा ही प्रश्नच आहे. एका धर्माच्या सणाच्यावेळी दुसऱ्या धर्माच्या व्यक्तींनी काय करणे अपेक्षित आहे ? ज्या अनेक जिल्ह्यात एकही पारशी कुटुंब नाही तिथे पारशी दिनाची सुटी दिली जाते.
पुन्हा आषाढी एकादशी,घटस्थापना, रामनवमी, गुढीपाडवा,महावीरजयंती,बुद्धपौर्णिमा,ईद या सणांच्या प्रार्थना मंदिरात जाऊन फक्त दर्शन घेण्यासाठी संपूर्ण दिवस सुटी घेणे गरजेचे आहे का ? अल्पसंख्य समुदायाच्या विद्यार्थ्यांची शाळा,महाविद्यालयात संख्या कमी असल्याने त्यांना त्या सणाला सुटी देवून इतर विद्यार्थ्यांसह शाळा कॉलेज चालू शकते. या सुट्या इकडे असताना खाजगी क्षेत्रात मात्र यातील कोणत्याही सुट्या दिल्या जात नाहीत.पण तिथे कर्मचाऱ्यांच्या भावना दुखावत नाहीत. सगळे लाड सरकारी क्षेत्रातच चालतात. सण व जयंतीच्या सुट्या रद्द कराव्यात कारण एक दिवसाचा पगारावरील खर्च ही खूप मोठी किंमत आहे.
शिक्षण हक्क कायद्याने प्राथमिक शाळा ८००घड्याळी तास व माध्यमिक शाळा १००० तास सुरु राहाव्यात असे नमूद केले आहे.पण त्यातही सकाळच्या शाळा करण्यासाठी संघटना आग्रह धरतात. त्यात अपडाऊनमुळे कमी काळ अध्यापन होते. महिनाअखेरला अर्धी सुटी, शनिवारी सकाळी शाळा भरवून तास कमी होतात. हे १००० तास प्रत्यक्ष अध्यापनाचे म्हटले आहे त्यामुळे शाळेत होणारे इतर कार्यक्रमाचे तास त्यात धरायचे की नाही ? यावर चर्चा करावी लागेल.पुन्हा वार्षिक परीक्षा झाल्यावर निकाल लागेपर्यंत विद्यार्थ्यांना सुटी दिली जाते,त्यामुळे ते दिवस एकूण मुलांच्या हजेरी मांडून एकूण कामकाज दिवसात धरले जातात.असे धरणे चुकीचे आहे.मुले शाळेत नसताना ते तास मोजणे गैर आहे. असे काटेकोर तास मोजले तर कामाचे आणखी दिवस वाढवावे लागतील.
त्याचप्रमाणे दर आठवड्याला शिक्षक ४५ तास शाळेत असावेत त्यात ३० तास अध्यापन व्हावे व १५ तास ही पूर्वतयारी असावी. आता ही पूर्वतयारी मोजण्याची कोणतीच वस्तुनिष्ठ पद्धत विकसित केलेली नाही. रोज २ तास १२ मिनिटे शिक्षक नेमकी काय स्वरूपाची पूर्वतयारी करत आहेत ? कोणते वाचन करत आहेत ? ती पूर्वतयारी घरी करायची की शाळेत ? त्याच्या नोंदी कोण तपासते आहे ? याबाबत काहीच घडले नाही. शिक्षण हक्क कायद्यात या तरतुदी असून गांभीर्याने घेतल्या गेल्या नाहीत. हे रोजचे २ तास मोजायचे ठरवले तर शाळेचे तास वाढवावे लागतील त्यातून दिवसही वाढतील..संघटना अधिवेशनासाठी सुटी मागतात. हे दिवस भरून काढले जातात का ?
वरील सगळी मुद्दे बघितल्यावर लक्षात येते की सर्वच सुट्याचा फेरविचार करायला हवा. ३६५ दिवसांपैकी ५२ रविवार,वर्ष संपल्यावर ८ दिवस सुटी , मोठे सण वगळून जास्तीत जास्त दिवस शाळा महाविद्यालये चालायला हवी. आपल्यासारख्या गरीब देशाला ४ ते ५ महीने पगारी सुटी देणे परवडणार नाही.परदेशात शाळा कमी दिवस भरतात असे सांगितले जाते पण तिकडे कुटुंबात,समाजात अनौपचारिक शिक्षण होऊ शकते.आपल्याकडे त्याप्रकारे पालक अनौपचारिक शिक्षण करू शकत नाही हे कोरोना काळात आपण अनुभवले आहे. त्यामुळे कोरोनाने झालेली नुकसान भरून काढण्यासाठी शाळा महाविद्यालये जास्त काळ भरवायला हवीत…
✒️हेरंब कुलकर्णी(8208589195)


