Home गडचिरोली महाराष्ट्र लोककला संशोधन: नवी परंपरा निर्माण!

महाराष्ट्र लोककला संशोधन: नवी परंपरा निर्माण!

236

(अशोक परांजपे पुण्यस्मृती विशेष.)

मूळ सांगली जिल्ह्यातील हरीपूरचे असलेले अशोकजी परांजपे यांनी केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर, अवघे गरजे पंढरपूर, कैवल्याच्या चांदण्याला, नाविका रे वारा वाहे रे, ही आणि इतरही अनेक प्रसिद्ध मराठी गाणी लिहिली. त्यांच्या स्मृतिंविषयीची श्री. एन. कृष्णकुमार से.नि.अध्यापक यांच्या शब्दांत ज्ञानवर्धक माहिती… संपादक.

अशोक गणेश परांजपे हे पट्टीचे मराठी गीतकार होते. ते मुंबई येथे महाराष्ट्र राज्य लोककला संचालनालयाचे संचालक होते. त्यानंतर ते औरंगाबादला स्थायिक झाले होते. त्यांनी भक्तिगीत, भावगीत, अंगाईगीत, लावणी, गण-गवळण आणि नाट्यगीत या प्रकारची गीते लिहिली. इंडियन नॅशनल थिएटर- आयएनटी रिसर्च सेंटरचे त्यांचे काम सुरू असताना त्यांनी महाराष्ट्रातल्या खेड्यांमध्ये जाऊन तेथील लोक कलावंतांच्या लोककलेच्या ध्वनिफिती तयार केल्या. त्या संदर्भात परांजपेंनी सन १९९२मध्ये पंढरपूर भक्तिसंगीत महोत्सव आणि १९८६मध्ये आनंदवन येथील महाराष्ट्र आदिवासी कला महोत्सव, असे दोन महोत्सव आयोजित केले. या कामाची नोंद फोर्ड फाउंडेशनने घेतली. ऑस्ट्रियातील इन्स्टिट्यूट ऑफ व्हिडिओग्राफी- आयओव्ही या आंतरराष्ट्रीय लोककला संस्थेने त्यांना सभासदत्व दिले. त्यानंतर त्यांनी अनेक मराठी कलावंतांना फ्रान्स, आयर्लंड, जपान आदी देशांत नेऊन तेथे त्यांना कला सादर करण्याची संधी मिळवून दिली.

अशोक गणेश परांजपे हे महाराष्ट्रातील लोककला संशोधक, गीतकार, नाटककार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म दि.३० मार्च १९४१ रोजी सांगली जिल्ह्यातील हरिपूर येथे झाला. त्यांचे वडील गणेश परांजपे हे आयुर्वेदाचार्य होते. हरिपूर ही भूमी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या नावाने ओळखली जाते. त्यांचे ग्रामसंस्कृतीशी अतूट नाते होते. शालेय जीवनापासूनच त्यांना सांगली परिसरातील लोककलांचे विलक्षण आकर्षण वाटू लागले. शाहीर आनंदराव सूर्यवंशी, शाहीर बापूराव विभूते, तमाशा कलावंत शंकर तात्या सावजळकर, काळू-बाळू अशा लोककलावंतांशी त्यांचा सततचा संपर्क होता. शाहिरी, सोंगी भारुड दत्तपंथी भजन, तमाशा, तलवार, दांडपट्टा, करपल्लवी या लोककला सांगली परिसरात लोकप्रिय होत्या. त्या सगळ्यांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. लेखन, वाचन, चित्रकारी सोबतच कुस्तीची त्यांना आवड होती. मुंबईत आल्यावर जे.जे.स्कुल ऑफ आर्टमध्ये त्यांनी चित्रकलेचे धडे घेतले.

दि.१० ऑक्टोबर १९७८ रोजी इंडियन नॅशनल थिएटर लोक प्रयोज्य कला संशोधन केंद्राची स्थापना वगसम्राट दादू इंदुरीकर यांच्या हस्ते झाली. या संशोधन केंद्राचे संचालक म्हणून अशोकजींनी जबाबदारी स्वीकारली. तसेच ही जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पारही पाडली. सन १९८६ साली इंडियन नॅशनल थिएटर लोक प्रयोज्य कला संशोधन केंद्रातर्फे आनंदवन वरोरा येथे आदिवासी महोत्सवाचे आयोजन त्यांच्या संकल्पनेतून झाले होते. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी या आदिवासी महोत्सवाचे मार्गदर्शक होते. दामू झवेरी, कपिला वात्सायन, दुर्गा भागवत आदी मान्यवर या महोत्सवाला उपस्थित होते. सन १९९२मध्ये पंढरपूर येथे भक्तीसंगीत महोत्सवाचे आयोजन त्यांच्याच संयोजनाने झाले होते. फ्रान्स, आयलंड, जपान आदी देशांत महाराष्ट्रातील लोककलांची पथके नेवून तेथे मार्गदर्शन केले. खंडोबाचे जागरण, देवीचा गोंधळ, कोकणातील दशावतार, ठाणे जिल्ह्यातील आदिवासींच्या कला, पारंपरिक तमाशा, कीर्तन, लळीत अशा लोककलांच्या जतन, संवर्धन आणि संशोधनासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्यांनी आयएनटीच्या लोक प्रायोज्य कलेच्या संशोधन विभागाचे संचालक असताना कार्य केले.

आयएनटीतर्फे ग्रामीण भागातील लोककला आणि लोककलावंतांना नागर रंगमंच उपलब्ध करून देण्याचे काम त्यांनी केले. तमाशा अभ्यासक रुस्तुम अचलखांब, शाहीर बापूराव विभूते, गोंधळमहर्षी राजारामबापू कदम, चित्रकथी बाहुलेकार गणपत मसगे, परशुराम गंगावणे, पारंपरिक वाद्ये शंकरराव जाधव धामणीकर, दशावतारी कलावंत बाबी नालंग अशा अनेक लोककलावंतांचे कार्यक्रम त्यांनी मुंबईत छबिलदास सभागृहात आयोजित केले. त्यानिमित्त त्या लोककला प्रकारांवर माहितीपूर्ण पुस्तिका प्रसिध्द केल्या. खंडोबाचे जागरण, लळीत, दशावतार, वासुदेवांची गाणी, नमन खेळे, मादळ यांसारख्या आदिवासी कला यावर अभ्यासपूर्ण पुस्तिका त्यांच्या संकल्पनेतून आयएनटीने प्रसिद्ध केल्या. खंडोबाचं लगीन, दशावतारी राजा, जांभूळाख्यान, वासुदेव सांगती, अरे रे संसार, मातीचं स्वप्न अशा आयएनटी संशोधन केंद्राच्या संशोधन नाट्यांची मूळ संकल्पना आणि लेखन मार्गदर्शन परांजपे यांचे होते. महाराष्ट्रात लोककलांच्या संशोधनाची नवी परंपरा निर्माण करून तरुण अभ्यासकांची फळी महाराष्ट्रभर उभी करण्याचे श्रेय त्यांना जाते. प्रकाश खांडगे, तुलसी बेहेरे, रमेश कुबल, गणेश हाके, सुरेश चव्हाण, पंढरीनाथ काळे, सुरेश चिखले, रामचंद्र वरक अशा तरुण अभ्यासकांची फळी त्यांनी निर्माण केली. त्यांना त्यांचा अभ्यास विषय असलेल्या लोककलांमध्ये मार्गदर्शन केले.

अशोकजी परांजपे यांचे मराठी रंगभूमीवरील योगदान नाटककार म्हणून उल्लेखनीय आहे. संत कान्होपात्रा, संत गोरा कुंभार, अबक दुबक, बुद्ध इथे हरला आहे, आतून कीर्तन वरून तमाशा, दार उघड बया सारखी संगीत रंगभूमीचे वैभव वाढविणारी नाटके त्यांनी लिहिली. नाटकांसोबतच वर्तमानपत्रात त्यांनी स्तंभ लेखन केले. ‘अनोळखी पाऊले’ ही त्यांची स्तंभलेखन मालिका अतिशय प्रसिद्ध होती. लोककलांचे संशोधन, नाट्यलेखन या सोबतच ते गीतकार म्हणूनही लोकप्रिय होते. अवघे गर्जे पंढरपूर, आला आला सुगंध मातीचा, एकदाच यावे सखया, कुणी निंदावे वा वंदावे, केतकीच्या बनी तिथे, दारी उभी अशी मी, दीनांचा कैवारी, नाम आहे आदी अंती, नाविका रे, पाखरा जा दूर देशी, पैलतीरी रानामाजी, वाट इथे स्वप्नातील संपली जणू, आला आला सुगंध मातीचा अशी अनेक लोकप्रिय गीते त्यांनी लिहिली. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. लोककला संशोधनाच्या क्षेत्रात त्यांचे कार्य उल्लेखनीय होते. अशोकजी परांजपेंनी दि.९ एप्रिल २००९ रोजी त्यांच्या औरंगाबाद येथील निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केली.

!! पुरोगामी एकता परिवारातर्फे त्यांच्या अविस्मरणीय अनेक स्मृतींना विनम्र अभिवादन !!

✒️संकलक:-श्री. एन. कृष्णकुमार, से. नि. अध्यापक.मु. पिसेवडधा, ता. आरमोरी.जि. गडचिरोली,व्हा. नं. ७४१७९८३३३९.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here