




✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114
बीड(दि.5एप्रिल):-गेवराईत पुन्हा एकदा वाळूमाफियांची मुजोरी समोर आली आहे. कारवाईसाठी गेलेल्या पोलीस अधीक्षकांच्या पथकातील कर्मचाऱ्यांच्या अंगावर, वाळूमाफियांनी ट्रॅक्टर घातले आहे. यामध्ये कर्मचारी जखमी झाला असून त्यांना गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या कारवाईत एकुण 6 ट्रॅक्टर या पथकाने ताब्यात घेत लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. गणेश धनवडे असे जखमी झालेल्या पोलीस नाईकचे नाव आहे.
बीडच्या गेवराई तालुक्यात गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा काही केल्याने थांबत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने कारवाया होत असताना देखील, वाळू माफिया या कारवायांना भीक घालताना दिसत नाहीत. दरम्यान तालुक्यातील खामगाव येथील गोदावरी नदी पात्रात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक यांच्या पथकाला मिळाल्यावरून, तेथील नदीपात्रात पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने धाड टाकली.
दरम्यान वाळू उपसा करणार्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यावर, चक्क ट्रॅक्टर घातल्याने, बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तर यामुळं वाळूमाफिया किती मुजोर झालेत? याचाच प्रत्यय आला आहे. त्यामुळे आता तरी या वाळू माफियांना पाय बंद करणार का? आणि बीड जिल्ह्यात नद्यांचे होणारे नुकसान थांबवणार का? असा प्रश्न समोर येत आहे.




