




✒️सचिन सरताप (प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100
म्हसवड(दि.4एप्रिल):-राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आणि राष्ट्रनिर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बचत भवन हॉल पंचायत समिती माण दहिवडी जि. सातारा या ठिकाणी ‘भारतीय संविधान : सन्मान, सुरक्षा आणि संवर्धन’ या विषयावर बीएस फोर व माण शिक्षक बंधू भगिनी यांचे वतीने जाहिर प्रबोधन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.या परिसंवादाचे उद्घाटक म्हणून बाबासाहेब एक सूर्यंकन,मुत्यू सुंदर आहे!? चे लेखक, साहित्यिक, कवी डॉ.रविंद्र श्रावस्ती तर मार्गदर्शक व अध्यक्ष म्हणून संविधान अभ्यासक व प्रचारक सांगलीचे डॉ.विनोद पवार उपस्थित होते.
उद्घटकीय भाषणात बोलताना डॉ रवींद्र श्रावस्ती म्हणाले की,भारतीय संविधानाचे सारथ्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केले या देशाने ते मान्य केले.जनतेने त्याला मंजुरी दिली.संविधान म्हणजे फक्त आरक्षण हा खोटा आणि खोडसाळ प्रचार आहे.संविधान आपल्याला जगण्याचा अधिकार देते.भारतीय संविधानाच्या रूपानं आम्हाला जे मिळाले आहे ते एवढे उत्तुंग आहे की त्याची किंमत आम्हाला समजेना.जातीची धर्माची जोखडं बाहेर टाकल्याशिवाय आपणाला संविधान समजणार नाही. संविधान दिशादर्शक आहे. खेदजनक बाब ही की, संविधानाला आता पूजेचे रूप आणले आहे.जेव्हा एखाद्या पुस्तकाला पूजेचे महत्त्व प्राप्त होते. तेव्हा त्यातील विचाराचं महत्त्व कमी होतं.म्हणून तुम्ही कोणत्याही जाती,धर्माचे असा संविधानाचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे.
या वेळी परिसंवादाचे मुख्य मार्गदर्शक व अध्यक्ष डॉ.विनोद पवार म्हणाले,”संविधान म्हणजे ही एक पुस्तिका नाही. ती एक जीवनशैली आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं संविधान धोक्यात आणण्याचे काम चालले आहे.खाजगीकरणाच्या माध्यमातून नवरत्न कंपन्या विकण्याचा घाट घातला जातोय.राज्यकर्त्यांकडून धर्मावर आधारित संविधान बनवण्याची भाषा केली जात आहे.अशा परिस्थितीमध्ये संविधानाचा सन्मान,संरक्षण व सुरक्षा करण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे. आपल्याकडे Constitutional morality म्हणजेच संविधानिक नीतिमत्तेचा अभाव आहे.वास्तविक पाहता कोणावरही अन्याय अत्याचार झाला तर त्याची कळ ही प्रत्येकाला आली पाहिजे.परंतु तसे होताना दिसत नाही.आपल्याच जाती बांधवांवर अन्याय झाला की आपण पेटून उठतोय.हे संविधानासाठी मारक आहे.संविधान हा सर्वसामान्य माणसाचा एक ठेवा आहे.या देशाला धर्मनिरपेक्ष बनवण्याची सर्व संविधान निर्मात्यांची भावना होती.धार्मिक व सांस्कृतिकदृष्ट्या आपण सर्व भिन्न असलो तरी व्यक्ती म्हणून संविधान तुम्हाला नागरिकत्वाचा अधिकार प्राप्त करून देते.संविधान या देशातल्या वंचित घटकाला, शेवटच्या घटकाला अधिकार देण्याची भाषा करते.
म्हणून संविधानाचा सन्मान,संरक्षण व सुरक्षा करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचे आहे.” या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन आयोजकांनी यांनी केले होते.या कार्यक्रमासाठी बामसेफ,कास्ट्राईब संघटना, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व समिती, भारतीय बौद्ध महासभा, आरोग्य कर्मचारी संघटना अशा विविध संघटनांचे पदाधिकारी या परिसंवादासाठी उपस्थित हाेते.या कार्यक्रमाचे आयोजन समस्त बौद्ध शिक्षक माण तालुका यांनी केले होते. या परिसंवादाचे प्रास्ताविक उमेश गायकवाड यांनी केले.सूत्रसंचालन केशर माने, दयाराणी खरात यांनी केले तर आभार नवनाथ खरात यांनी केले.कार्यक्रमासाठी नगरसेवक शैलेश खरात, प्रा गवाळे, लक्ष्मण मोहिते, संभाजी सावंत, अविनाश शिंदे, किरण सावंत, बौद्ध महासभा पदाधिकारी, महिला, युवक युवती , सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार शिंदे,माजी शिक्षण विस्तार अधिकारी विनायक शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर शिक्षक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वतेसाठी उमेश गायकवाड, संजय खरात, विजय बनसोडे, जवळगेकर, इत्यादींनी परिश्रम घेतले.




