Home चंद्रपूर रोजगार… काँग्रेसने दिलेला…आता पुढे काय?

रोजगार… काँग्रेसने दिलेला…आता पुढे काय?

347

आज रविवारी सकाळी फिरायला गेलो असता वेकोलि मधून सेवानिवृत्त झालेले एक गृहस्थ मिळाले. नमस्कार झाल्यावर सहज बोलताना ते म्हणाले, मुलगा MBA झाला पण 15 हजारात राबतो आहे.स्थायी रोजगार नसल्याने 30 वर्षाचा असूनही लग्न केले नाही. मुलगीही कुणी देत नाही.आमच्या काळात आम्ही अल्पशिक्षित पण रोजगाराच्या संधी भरपूर असल्याने आम्ही आज सुखाचे दोन घास खात आहोत.पण आता मूल उच्च शिक्षण घेऊनही दारोदार भटकत आहेत. काँग्रेसच्या काळात जे प्रकल्प उभे झालेत तेच रोजगार देणारे होते आता मात्र तेही खासगीकरण होत असल्याने डबघाईस आलेत.भविष्यात आणखी वाईट परिणाम होतील असे ते उद्विग्नपणे बोलून गेलेत.

मी खूप विचार करत घरी आलो आणि शांतपणे विचार केला असता ते काका खरंच पोटतिडकीने बोलल्याचा साक्षात्कार झाला. मी केवळ चंद्रपूर जिल्ह्यातील रोजगाराचा विचार केला आणि थक्क झालो.
चंद्रपूर जिल्हा नागपूर नंतर अतिशय औद्योगिक विकास झालेला जिल्हा. येथे रोजगाराच्या संधी मोठ्या. वेस्टर्न कोल फील्ड लिमिटेडच्या भरपूर खाणी. त्यामुळे चंद्रपूर,बल्लारपूर, राजुरा,घूघुस, माजरी हा पट्टा आर्थिकदृष्ट्या सक्षम. जिल्ह्यातील लोकांना 70 -80 च्या दशकात स्थायी नोकरी मिळाली. जे अंगठा बहाद्दर होते ते या खणीमुळे आज लाखोंच्या संपत्तीत सुखाने जगत आहेत.परप्रांतीय लोक आज दुसऱ्या पिढीला सुखाने सेवारत करू शकले.वेकोलि हीच जिल्ह्यातील अर्थकारण प्रगतीवर नेणारी गंगोत्री ठरली.

वेकोलि नंतर चांदा आयुध निर्माणी ही आणखी एक जीवनदायी. चंद्रपूर जिल्हा नव्हे अख्या विदर्भातील तेव्हाच्या अल्पशिक्षित आणि शिक्षित लोकांना 70 च्या दशकात आपल्या कवेत सामावून घेणारी ठरली.आज त्या कामगारांची दुसरी-तिसरी पिढी याच आयुध निर्माणीत कामाला आहे.(आता यापुढेची पिढी खासगीकरणच्या विळख्यात सापडणार आहे!).भद्रावती ची संपूर्ण अर्थव्यवस्था या आयुध निर्मानीवर अवलंबून आहे.घूघुस, गडचांदूर, अवळपूर येथील सिमेंट उद्योग हे आणखी विकासाचे मॉडेल.
बल्लारपूर आणि पेपरमिल चे नाते माय आणि लेकरासारखे आहे.येथेही बिल्ट हेच विकासाचे माध्यम आहे.मात्र गेल्या 10 वर्षात ही गंगोत्री आटण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.चंद्रपुरातील महाऔष्णिक वीज केंद्र हेही रोजगाराचे उत्तम साधन.1984 मध्ये इंदिरा गांधी यांनी भूमिपूजन केलेले(मुद्दाम इंदिरा गांधी यांचा उल्लेख!) हे केंद्र आशियातील मोठे हे सांगण्याऐवजी दुर्गापूर आणि अख्या चंद्रपूर शहराला आर्थिक चालना देणारे हे महत्त्वाचे.

वरील सर्व उद्योग म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचे दीपस्तंभ.MEL हेही आणखी एक उदाहरण.
हे सर्व प्रकल्प 60 ते 80 च्या दशकात सुरू झालेले.(2014 नंतरचे नाहीत,हे सुज्ञ लोकांनी गळी उतरवावे!)याच प्रकल्पांच्या भरवशावर राजकीय नेते,सर्वसामान्य जनता उड्या मारत आहेत.या गंगोत्री आटल्या तर राजकारण्यांना पैसे मिळणार नाहीत आणि सर्वसामान्यांना रोजगारही मिळणार नाही.सांगायचा मुद्दा हा की याच प्रकल्यावर चंद्रपुरातील तरुणाईचे अर्थकारण अवलंबून आहे.पण आता उच्च शिक्षण घेऊनही त्यांना रोजगार मिळत नाही.अल्प शिक्षित बाप लाख रुपये कमावतो तर पोरगा 15 हजारात घाम गाळून जगतो.
हे का झाले?याचा विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे. ज्या बापाला अल्प शिक्षित असतानाही रोजगार मिळाला, त्या बापाचा मुलगा आज काँग्रेस ने काय केले म्हणून जेव्हा चौकातील पान टपरीवर 30 रुपयांचा खर्र्या तोंडात टाकून गप्पा हाणतो तेव्हा त्याची कीव येते.वर उल्लेखित सर्व उद्योग दुर्दैवाने(!) काँग्रेस च्या काळात सुरू झालेत.

आता नवीन उद्योग एकही आलेले नाहीत.गेली 30 वर्ष सातत्याने राजकारणात जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱ्या एकाही नेत्याने एक हजार लोकांना रोजगार उपलब्ध होईल असे उद्योग जिल्ह्यात आणलेले नाहीत.केवळ बगीचे निर्माण करून रोजगार उपलब्ध होत नाहीत.बगिच्यात जाण्याची हौस तेव्हाच पूर्ण होते जेव्हा तुमचे पोट पूर्णतः भरलेले असते.पोंभुरण्यात भौतिक सुविधा दिसतात पण तेथील गोरगरिबांना रोजगार कुठे आहे.बगिच्यात फिरण्यासाठी ते कधी जाणार हा प्रश्न कधी उपस्थित होत नसेल का?जिल्हा औद्योगिक संपन्न आहे.पण भविष्यात तो तसाच राहील का ही चिंता आता सतावते आहे.आयुध निर्मनीचे खासगीकरण, बिल्ट ची अधोगती थांबविण्याचे आव्हान उभे आहे.मात्र याकडे लक्ष देण्याऐवजी लोकांना आपल्या चक्रव्यूहात अडकविण्याचे काम सुरू आहे.काँग्रेस नेत्यांच्या शिक्षण संस्थांत काम करणारे विशिष्ट विचारधारेचे शिक्षक, प्राध्यापक जेव्हा काँग्रेसने काय केले असे बोलतात तेव्हा ते आपले पोटही काँग्रेसच्या नेत्यांच्या सुविधेमुळे भरते याची त्यांना जाण नसेल का?

असो,मुद्दा हा रोजगाराचा आहे.चंद्रपुरातील हे सर्व उद्योग उध्वस्त होणार नाहीत याची काळजी घेणे आज गरजेचे आहे.नाहीतर वर उल्लेख केल्याप्रमाणे अल्प शिक्षित बाप उच्च शिक्षित पोराला पोसण्यातच आपले आयुष्य खर्ची घालेल.

(टीप- मी काँग्रेस धार्जिनी किंवा भक्त नाही हे स्पष्ट करतो.केवळ येथील उद्योग, अर्थकारण आणि एकूणच रोजगार याबद्दल वर उल्लेखित काकांच्या बोलण्यातून दिसून आलेली अगतिकता यामुळे हा लेखप्रपंच आहे.)

✒️अरविंद खोब्रागडे(चंद्रपूर)मो:-9850676782

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here