Home गडचिरोली ऊनाच्या असह्य झाकाझळा; तरी शाळा एके शाळा!

ऊनाच्या असह्य झाकाझळा; तरी शाळा एके शाळा!

113

महाराष्ट्र राज्याचा शिक्षणविभाग खरंच कौतुकास पात्र ठरले आहे, म्हणावे लागेल! सर्वत्र ऊना पारा वाढत असल्याची हाकबोंब होत आहे. आरोग्य विभागातर्फे उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आबालवृद्धांची योग्य काळजी घेण्याचे निर्देश दिले जात आहेत. हे आजचेच नाही तर दरवर्षी एप्रिल महिन्यात उन्हाचा कडाका वाढतोच. म्हणूनच कोवळ्या मुलांच्या शाळा या सकाळी १०-३० वाजेपर्यंत ठेवण्यास आदेशित केले जाते. यावेळेपर्यंत सूर्यकिरण थोडे तिरकस व कमी तीव्रतेचे असतात. त्यानंतर मात्र ते लंबरुपात पडून सर्वाधिक दाहकता पसरवितात. चमचमणारे ऊन व उन्हाच्या झाकाझळा यामुळे सारी जीवसृष्टी कासावीस होत असते. तप्त झालेली जमीन पायांना फोड येईस्तोवर भाजून काढते. डोक्यावर आग ओकणारा सूर्यबिंब व सभोवार तापलेले वातावरण कोठेतरी थंडगार सावली शोधण्यास भाग पडत असते. या सपाट्यात एखादा लेचापेचा वा नाजूक जीव सापडला तर तो उष्माघाताने मेलाच म्हणून समजा.

कोरोना काळात विद्यार्थ्याच्या शिक्षणापेक्षा त्याच्या स्वास्थ्याला महत्व देणाऱ्या प्रशासनाने आज वाढत्या उष्णतामानाच्या तोंडावरच अगदी विपरित स्वरूपाचे, सर्वांना तोंडात बोटे घालण्यास लावणारे, नव्हे तर हास्यास्पद निर्णय घेतले, याचेच नवल वाटते. उष्माघाताच्या तडाख्याने विद्यार्थ्यांचे स्वास्थ्य बिघडले काय? त्यात त्याची प्राण हानी झाली काय? ते या उन्हाळ्यात ते गौण आहे. मागे पडलेले शिक्षण कोणत्याही परिस्थितीत पूर्ण झाले पाहिजे, असा अट्टाहास चालविला जात आहे. ही भरपाई पुढच्या शैक्षणिक सत्रात भरून काढणे अजिबातच शक्य नव्हते. शिक्षण क्षेत्रातील विचारवंत, तज्ञ, संशोधक यांच्या सुपीक डोक्यात ही भन्नाट कल्पना आली, म्हणून बरे झाले. ती कल्पना अशी, की संपूर्ण एप्रिल महिनाभरात शनिवार व रविवारीही ज्यादा वर्ग-शाळा भरविण्यात यावेत. शाळेचे दैनिक वेळापत्रक हे सकाळी ७ ते १२-३० वाजेपर्यंत करून त्याचे तंतोतंत पालन करण्यात यावे. बोलायला हे कित्ती सोप्पे गेले नाही का? बरं असो. हा निर्णय घेताना बाल हक्क संरक्षण कायदा, महिला व बालकल्याण, बालमानस शास्त्र, बालशिक्षण, बालक स्वास्थ्य आदी समित्यांशी सल्लामसलत केली असेल काहो? आणि हो, सल्लामसलत केलीही असेल; तर त्यांनी अशा रखरखत्या उन्हात शाळा चालविण्यास सहमती दर्शवली हे कशावरून?

जीवाला होरपळून काढणाऱ्या तप्त वातावरणात एका जागी बसून अध्ययन-अध्यापनात शिक्षक व विद्यार्थी यांची मानसिकता टिकून राहणे शक्य नाही. शिक्षक बिचारे कसेबसे तरी टिकवतीलच. कारण त्यांना सेवा करायची आहे; सेवेतून मेवा मिळवायचा आहे. परंतु भावी देशाच्या आधारस्तंभांचे, कोवळ्या नाजूक विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचे व स्वास्थ्याचे काय खुखखुळे व्हावे? अन्यवेळी नको तेथे विविध शब्दांचे विश्लेषण जीव तोडून करणारे तज्ञ महाशय आपल्या अकलेचे तारे तोडतांना दिसतात, ते आता मूग गिळून गप्प का? प्रशिक्षण हे प्राण्यांना दिले जाते; माणसासाठी असते तीला कार्यशाळा म्हणतात, असे ते मन चक्रावणारे निदान आणि विधान करतात.रखरखत्या ऊनाच्या वेळी दरवर्षी शाळा सताड बंद राहात होती, असे मुळीच नाही. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनांतर्गत लेखी चाचण्या संपल्या तरी तोंडी व कृतीपर मूल्यमापन सुरूच असायचे. याच दरम्यान व नंतरही निकाल जाहीर होईपर्यंत ‘समरकँप’ उपक्रमाद्वारे अध्यन-अध्यापन प्रक्रिया अविरतपणे सुरूच असायची. कोरोनाने बुद्धी उलटसुलट करून टाकली की काय? सगळ्या जुन्याच गोष्टी, संज्ञा, संकल्पना आदी या डोक्यात येऊ लागल्या. बालशिक्षण हक्क कायदा-२००९ अनुसार नविनतम आलेल्या- विद्यार्थी केंद्रीत शाळा व शिक्षण हवे, विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा, त्याच्या क्षमता समृद्धी-विकासास चालना व गती द्यावी, चार भिंतीच्या आड क्षमतांना जागृती प्रदान करता येत नाही, नैसर्गिक वातावरणातील शिक्षण अधिक खोलवर रूजते, विषय व पुस्तके कमी करून दप्तराचे ओझे हलके केले जावे, शाळा डिजिटल व्हावी, ऑनलाइन शिक्षणावर भर द्यावा, तंत्रज्ञान द्यावे, वेळोवेळी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन होत रहावे, आदी गोष्टी विस्मरणात गेल्या. जुन्याच समोर ठाकू लागल्या.

जसे- साचेबंद अभ्यासक्रम पूर्ण करावे, दैनिक वेळापत्रकाची अंमलबजावणी करावी, चार भिंतीआड शिकवावे, परीक्षा घ्यावी आदी गोष्टींमुळे शिक्षकांसह विद्यार्थीही चक्रावून गेले व द्विधा मनस्थितीच्या चिमट्यात सापडले आहेत. त्यांनी तरी करावे काय? सुट्टी होऊन घरी पोहोचेपर्यंत १ वाजून जातो. लखलखत्या ऊनाचा सगळा मारा त्याला अनिच्छेने अंगावर घ्यावाच लागतो. त्यापेक्षा त्याला दिवसभरची- सकाळी १० ते सायंकाळी ५ वा.पर्यंतची शाळा फायद्याची ठरली असती. एवढ्या घातक उन्हाचा मार खावा लागला नसता. उष्माघाताने त्याच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास सरळ शिक्षकच दोषी ठरणार, ही काळ्या दगडावरची रेख समजा!

✒️लेखक -‘अलककार’- श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी(म.रा. डि.शै. दै.रयतेचा कैवारीचे लेख विभाग प्रमुख तथा जिल्हा प्रतिनिधी.)मु. पो. ता. जि. गडचिरोली,व्हा. नं. ७४१४९८३३३९.
इमेल- nikodekrishnakumar@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here