



या देशात आणि खासकरून महाराष्ट्रात संतांना मानणारा मोठा वर्ग आहे. अनेक संतांना तर लोकांनी ईश्वराचाच दर्जा दिलेला आहे. लोक ह्या संतांना खूप मांणतात, त्यांची पूजा-अर्चा करतात पण त्यांचे विचार काय होते ? हे तार्किकदृष्ट्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. आपल्या सोयीनुसार संतांच्या विचारांचा अर्थ लावणारे महाभाग येथे कमी नाहीत. वाईट याचं वाटतं की वारकरी संप्रदायासारख्या चिकित्सक समुदायातील सुज्ञ वारकरी सुद्धा खरे संतविचार समजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत.
या देशाला फार जुनी संतपरंपरा लाभली आहे. विविध संप्रदाय-पंथ यांमध्ये अनेक संत होऊन गेलेत. चक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत कबीर, संत रविदास, संत तुकाराम, संत कबीर, संत रविदास, संत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा अशी अनेक नावे सांगता येतील. भक्ती परंपरेत या संतांवर कधीच जातीचा शिक्का लागला नाही. परंतु आज महापुरूषांप्रमाणेच अनेकांनी संतांनासुद्धा जाती-जातीत विभागून टाकले आहे. संत कोणाला म्हणावे? की जो जाती-धर्माच्या पलीकडे गेलेला आहे. तो कधीच स्वतःच्या जाती-धर्माचा अभिमान बाळगत नाही आणि इतर जाती-धर्माचा तिरस्कार करत नाही. जो कधीच माणसा-माणसात भेद करत नाही. हे सारे विश्वची माझे घर मानतो. रंजल्या-गांजल्यांना आपले म्हणून त्यांची सेवा करतो ते खरे संत. ते लोक सुद्धा जातीभेद-धर्मभेद पाळत बसले असते तर ते संत झाले असते काय? मग त्या संतांची जाती-धर्मानुसार विभागणी करून आपण त्यांच्या विचारांचा खूनच करत नाही आहोत काय?
आजसुद्धा अनेक स्त्री-पुरुष ज्या मासिक पाळीबद्दल बोलायला संकोच करतात त्या मासिक पाळीबद्दल 11 व्या शतकात म्हणजेच आजपासून एक हजार वर्षांपूर्वी चक्रधर स्वामीं आपली शिष्या उमाइसा हिला म्हणतात की, बाई, हे एकी नाडी असे: ये नवद्वारे: जैसा नाकी सेम्बूड ये: डोळा चिपुड: काना मळ: तोंडा थुंकी ये: गुहिद्वारीं मळ येती: ऐसी ही एकी धातू स्त्रवे: मग निवर्ते: तयाचा विटाळ धरू नये. म्हणजेच ज्याप्रमाणे मनुष्य नैसर्गिकपणे मल-मूत्र, घाम, कफ शरीरातून बाहेर टाकतो तसेच स्त्रियांना मासिक पाळी येणे ही सुद्धा नैसर्गिक प्रक्रिया आहे. ज्याप्रमाणे कुणी मल-मूत्र विसर्जन करतो म्हणून त्याचा विटाळ मानला जात नाही, त्याला मंदिरात प्रवेश नाकारला जात नाही त्याचप्रमाणे स्त्रियांनासुद्धा मासिक पाळीच्या नावाखाली विटाळ मानला जाऊ शकत नाही. मंदिर प्रवेश नाकारला जाऊ शकत नाही. केव्हढी ही हिम्मत? तीसुद्धा एक हजार वर्षांपूर्वी. ईश्वराला मानणार्या सर्वांना एक प्रश्न प्रकर्षाने विचारावासा वाटतो की तुम्ही ईश्वराला मानता, देवाला मानता तर मग त्यांच्याच निर्मितीला तुमचा विरोध का? स्त्रियांची निर्मिती कुणी केली? स्त्रियांची अशा प्रकारची शारीरिक रचना कुणी केली? जर तुम्ही सर्वांना देवाची लेकरं मानता तर ’शुद्ध बीजपोटी फळे रसाळ गोमटी’ या वचनाप्रमाणे परमेश्वर शुद्ध तर त्याची लेकरे अशुद्ध कशी असू शकतात?ती पण तितकीच शुद्ध असणारच. चक्रधर स्वामी हजार वर्षांपूर्वी असा विचार करतात यावरून आपले विचार हजार वर्षांपूर्वीपेक्षाही मागासलेले आहेत हेच सिद्ध होते.
संत ज्ञानेश्वरांनी काय काय चमत्कार केलेत? हा प्रश्न जर विचारला गेला तर 5 वी-6 वी तील लहान मुलगा सुद्धा सांगेल की, ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवले, त्यांनी स्वतः च्या पाठीवर पोळ्या भाजल्या वगैरे. आता हे चमत्कार कुणी सांगितले? ज्ञानेश्वरांनी लिहून ठेवलेत काय? नाही. स्वतः ज्ञानेश्वरांनी लिहून ठेवलंय की,
योग याग विधी। येणे नोहे सिद्धी ।
वायाची उपाधी। दंभधर्म ॥
म्हणजेच कुणी कितीही योगसाधना केली, होम-हवन-तपश्चर्या केली तरी कुणाला कधीच सिद्धी प्राप्त होत नसते, कधीच कुणी चमत्कार करू शकत नाही. हे सगळं दंभधर्म आहे म्हणजे सगळ्या खोट्या गोष्टी आहेत. हे स्वतः ज्ञानेश्वर माउली म्हणतात पण आपला त्यांच्या बोलण्यावर विश्वास नाही. आपण त्यांच्याच नावाने 4-4 चमत्कार खपवतो आणि त्यांच्या विचारांचा खून करतो.जनतेच्या वागणुकीत असे अनेक विरोधाभास बघायला मिळतात. संत रविदासांबद्दल सुद्धा असेच झाले आहे. संत रविदास स्पष्ट शब्दात सांगतात की, माथे तिलक हाथ जप माला… जग ठगने को स्वांग रचाया… म्हणजेच कपाळावर टिळा आणि हातात माळा घेऊन धर्माच्या नावावर लोकांची फसवणूक करण्यासाठी सोंग रचल्या जात आहेत. अशा लोकांपासून सावध राहा. असे ढोंगी मार्ग निवडून ईश्वरभक्ती होत नसते. त्याने ईश्वरप्राप्ती सुद्धा होत नाही. परमेश्वर प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे, तो आपल्याला ओळखता आला पाहिजे. आणि विरोधाभास बघा की, ज्या संत रविदासांनी आयुष्यभर अंधश्रद्धा, ढोंग-पाखंड, टिळा-माळ यांना विरोध केला. त्यांची प्रतिमा कायम टिळा लावलेली, हातात माळ घेऊन जप करणारी अशी बनविली जाते आणि आपण ती स्वीकार करतो म्हणजेच त्या संताच्या विचारांचा आपण खून करतो.संत तुकारामांना मानणारा खूप मोठा वर्ग या महाराष्ट्रात आहे. तुकोबारायांनी तर समाजातील चुकीच्या रूढी-परंपरांवर अतिशय कठोर प्रहार केले आहेत. आजही लोक मुलगा व्हावा म्हणून अनेक ठिकाणी देवाला नवस कबूल करतात. परंतु तुकोबारायांनी आजपासून 500 वर्षांपूर्वी सांगून ठेवलं की, जर का नवसे पुत्र होती, तर का करणे लागे पती. म्हणजेच नवसाने जर मुलं झाले असते तर नवरा करण्याची गरजच नसती. म्हणजे नवस बोलणे हे थोतांड आहे. किती वस्तुनिष्ठ विचार आहे हा, तो सुद्धा सोळाव्या शतकातला. आपण आजसुद्धा इतका तर्क लावत नाही. त्यांनी जीवन जगतांना मनुष्याच्या दैनंदिन व्यवहारासाठीसुद्धा अनेक सूत्रे सांगून ठेवली आहेत.
पाया जाला नारू। तेथे बांधला कापरू ।
तेथे बिबण्याचे काम। अधमासि तो अधम ॥
देव्हार्यावरी विंचू आला। देव पूजा नावडे त्याला।
तेथे पैजाराचे काम। अधमासि तो अधम ॥
म्हणजेच पायाला नारू झाला तर तिथे कापूर बांधून उपयोग होणार नाही तर तिथे झणझणीत बिबाच आवश्यक आहे. त्याचप्रमाणे देव्हार्यावर जर विंचू आला तर त्याची पूजा करून उपयोग नाही तिथे त्याला चपलेने मारला पाहिजे नाहीतर तो आपल्याला चावेल. म्हणजे अधमाशीं अधमपणेच वागले पाहिजे. ज्यांच्याविरुद्ध लढायचे आहे त्याच्यासारखे बनूनच लढावे लागेल तिथे फाजील लाड कामाचे नाही.
तुकोबारायांनी समाजातील अंधश्रध्देवरसुध्दा कठोर प्रहार केले आहेत. या जगात भूतप्रेत नावाची गोष्ट अस्तित्वात नाही. जगात भूत दाखविण्यासाठी एकूण 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची बक्षिसे आहेत परंतु आजपर्यंत कधीच कुणी भूत दाखवू शकलेले नाही कारण भूत नावाची कुठली गोष्ट अस्तित्वातच नाही. या भुताबद्दल तुकोबाराय लिहितात.
वाजे पाऊल आपले। म्हणे मागे कोण आले। काही वाटे आकस्मिक। म्हणे मागे आले भूत।तुकोबारायांनी खर्या संतांची व्याख्या सुद्धा सांगून ठेवली आहे.
जे का रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले
तोचि साधु ओळखावा। देव तेथेचि जाणावा॥
रंजल्या-गांजल्यांची म्हणजेच दुःखी, पीडित, गरिबांची निरपेक्ष वृत्तीने सेवा करणारेच खरे संत आहेत.
जगाच्या कल्याणा। संतांच्या विभूती।
देह कष्टविती। परोपकारे॥
संत हे जगाच्या कल्याणासाठीच जन्म घेत असतात, इतरांना मदत करण्यासाठी, परोपकार करण्यासाठीच ते आपले संपूर्ण आयुष्य झिजवतात. आज असे संत आपल्याला दिसतात? आजचे साधु तर जनतेकडून टोकाची सेवा करून घेतांना आपण बघतो. स्वतःचाच विचार हे लोक करत असतात. संतांच्याच नावावर द्रव्य कमावून संतांच्याच विचारांना तिलांजली देत असतात. तुकोबारायांनी तर त्याकाळी असे अभंग लिहून ठेवलेत जणूकाही ते आजच्या काही स्वयंघोषित संतांसाठीच लिहिलेले असावेत,
जेथे कीर्तन करावे ।
तेथे अन्न न सेवावे ॥1॥
बुका लावु नये भाळा ।
माळ घालु नये गळा ॥ध्रु॥
तटावृषभासी दाणा ।
तृण मागों नये जाणा ॥2॥
तुका म्हणे द्रव्य घेती ।
देती तें ही नरका जाती ॥3॥
म्हणजे जिथे कीर्तन करायचे आहे तेथील अन्नसुद्धा सेवन करू नये. इतकेच काय तर तेथील बुक्का सुद्धा लावू नये. हार घालू नये. कीर्तनकाराने आपल्या बैलांसाठी चारासुद्धा घेऊ नये आणि जे ढोंगी साधू हरिकथा सांगण्याचे पैसे घेतात आणि त्यांना जे पैसे देतात त्या दोघांचीही अधोगती होते. आणि आजचे स्वयंघोषित संत बघा. तुकोबारायांनी जे त्याकाळी सांगितले ते या काळात तंतोतंत पाळणे शक्य नाही. काही लोक म्हणतील कीर्तनकारांना सुद्धा पोट आहे. संसार आहे. हे कबूल आहे. त्यांनी आपल्या उदर्निर्वाहापुरता मोबदला घ्यावा जेणेकरून त्यांचा संसार चालू शकेल. परंतु आज एका-एका कीर्तनाचे-प्रवचनाचे, कथेचे हजारो-लाखो रुपये घेणारे महाभाग समाजात सन्मानाने वावरतात. धर्माचा बाजार मांडला जातो. तो सन्मान आपणच त्यांना देतो. असे बुवा-बाबा लोक यजमानांची आर्थिक पिळवणूक करताना आपण बघतो.हा सुद्धा खर्या संतांचा त्यांच्या वचनांचा अपमानच आहे. त्यांच्या विचारांची हत्याच आहे.संतांचे कार्य आहे समाजातील भेदभाव दूर करणे, भक्तिमार्ग सांगणे, समाजाचे प्रबोधन करणे परंतु आजच्या काळात अनेक साधूंनी हा व्यवसाय करून टाकला आहे, काहींनी तर राजकीय प्रचार करायला सुरुवात केली आहे. संतांचे प्रबोधनकारी विचार झाकून ठेऊन लोकांना कर्मकांडांकडे वळवत आहेत.
दुर्दैव हेच आहे की आपला संतांवर विश्वास आहे परंतु संतांच्या विचारांवर नाही. त्यामुळेच संतांनी वारंवार समाजाला ज्या गोष्टींपासून वाचण्यासाठी सावध केलं, नेमक्या त्याच गोष्टींमध्ये समाज अडकून पडत आहे. आज जर संतांचे खरे विचार आपल्याला समाजापर्यंत पोचवायचे असतील तर वारकरी संप्रदायातील लोकांनी व युवा वक्ते, व्याख्याते, कीर्तनकारांनी पुढाकार घेऊन हे विचार मांडण्याची हिम्मत केली पाहिजे. कोणत्याही संताने कधीच फक्त हाच धर्म श्रेष्ठ आहे किंवा गर्व से कहो हम अमुक है असे म्हटले नाही. कुण्या दुसर्या धर्माला शिव्या-शाप दिले नाहीत. कुणी दुसर्या धर्माचा आहे म्हणून त्याच्यासोबत वाईट व्यवहार केला नाही. त्याची मदत करतांना, त्यांना उपदेश करतांना कुठलाही भेदभाव केला नाही. संतांची हीच खरी शिकवण लोकांपर्यंत पोचवायची की आजपर्यंत त्यांच्या विचारांची हत्या होत आली तशी होऊ देत राहायची हे संतांच्या वैचारिक वारसदारांनी ठरवायचे आहे.
✒️चंद्रकांत झटाले(अकोला)मो:-9822992666


