




(डॉ.आनंदीबाई जोशी जयंती विशेष)
आनंदीबाई गोपाळराव जोशी या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर होत्या. स्वतः डॉक्टर होऊनही कुणा देशभगिनीवर उपचार करण्याची संधी आनंदीबाईंना मिळालीच नाही. तिकडे अमेरिकेत मात्र कारपेंटर यांनी आपल्या कुटुंबाच्या स्मशानात त्यांचे लहानसे थडगे बांधले. त्यावर ‘आनंदी जोशी, एक तरुण हिंदू ब्राह्मणकन्या. परदेशात शिक्षण घेऊन डॉक्टर पदवी मिळवणारी पहिली भारतीय स्त्री’ अशी अक्षरे कोरून तिचे स्मारक केले. जयंतीदिनी या नारीशक्तीच्या पावन प्रेरक स्मृती ‘अलककार’- श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजींनी या लेखातून जागविल्या आहेत… संपादक.
एक महिला दि.१६ नोव्हेंबर १८८६ रोजी नऊवारी साडी नेसलेली, नाकात नथीचा आकडा घातलेली, कृष शरीरबांध्याची व बोटीच्या तसेच जीवन सागरातील प्रवासाने थकलेली अशी मनस्वी स्त्री मुंबईच्या किनाऱ्यावर उतरली. तिच्या पदस्पर्शाने भारतातील स्त्रियांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. ती स्त्री म्हणजेच डॉ.आनंदीबाई गोपाळराव जोशी होय! १९व्या शतकात केवळ पतीच्या इच्छेसाठी साऱ्या समाजाचा रोष व विरोध पत्करून त्या शिकल्या व पुढे अमेरिकेस जाऊन त्यांनी वैद्यकीय पदवी मिळवली. भारतातील स्त्रियांची सेवा करण्याचे व्रत घेऊन भारतात परत आल्या. भारतातील पहिली महिला वैद्यक- एमडी म्हणून त्यांचा लौकिक आजही कायम आहे.आनंदीबाई जोशी यांचा जन्म दि.३१ मार्च १८६५ रोजी पुण्यात त्यांच्या आजोळी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव यमुना होते. जुन्या कल्याण परिसरातील पारनाका येथे राहणाऱ्या गणपतराव अमृतेश्वर जोशी यांच्या ज्येष्ठ कन्या होत्या. घरातील आर्थिक परिस्थिती बेताची असल्याकारणाने त्यांचे बालपण फारसे रम्य नव्हतेच. आनंदीबाईंचे लग्न लवकर करून मोकळे व्हावे, असाच विचार तिच्या आई-वडिलांचा होता. अशातच पोस्टात काम करणाऱ्या गोपाळराव जोशींचे स्थळ अनायसे चालून आले व त्यांच्याशी यमुनाचे लग्न करण्याचे गणपतरावांनी पक्के केले. गोपाळराव जोशी हे विदुर होते व सुधारक विचारांनी भारावलेले होते. विधवेशी पुनर्विवाह करण्याचा त्यांनी निश्चय केला असल्याने आपल्यापेक्षा वयाने २० वर्षांनी लहान असलेल्या कुमारिकेशी विवाह करणे, त्यांना पटत नव्हते. त्यांनी लग्न ठरू नये म्हणून खूप प्रयत्न केले. अखेर यमुनाला शिकण्यासाठी तिच्या माहेरून काही विरोध नसावा अशी अट मान्य केल्यावरच ते लग्नास तयार झाले. अखेर वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह गोपाळराव जोशी यांच्याशी झाला.
गोपाळराव जोशी हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील रहिवासी होते. लग्नानंतर गोपाळरावांनी आपल्या पत्नीचे यमुना हे नाव बदलून आनंदीबाई असे ठेवले. वयाच्या चौदाव्या वर्षी आनंदीबाईंनी एका मुलाला जन्म दिला, परंतु वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे मूल फक्त दहा दिवस जगले. आनंदीबाईंच्या जीवनात हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला. या घटनेनंतर त्यांनी डॉक्टर होण्याचे ठरविले. गोपाळरावांनी तिला मिशनरी शाळांमध्ये प्रवेश मिळावा म्हणून प्रयत्न केला. स्त्री शिक्षणाचा प्रसार करणे, हा त्यांचा ध्यास होता व त्याची सुरुवात स्वतःच्या कुटुंबातून करण्याचा त्यांचा मनोदय होता. आनंदीला शिक्षणात फारसा रस नव्हता, परंतु पतीच्या नजरेच्या धाकाने तिला अभ्यास करावा लागत असे. सुधारक विचारांचा काहीसा विक्षिप्त व मनस्वी अशा पतीमुळे तिच्या जीवनाला कलाटणी मिळाली. सर्वसामान्य मुलींप्रमाणे केवळ संसारच तिने करू नये तर शिक्षण घेऊन काही तरी वेगळे करावे, असे गोपाळरावांना वाटत असे. तिच्या आईला शिक्षणाचे महत्व मुळीच समजले नसल्याने ती मात्र आनंदीचा अतिशय राग-राग करीत असे. तिच्या मागे कामांचा सपाटा लावून तिला अभ्यासाला वेळच देत नसे. तरीही तिने अभ्यास केला नाही तर पतीचा मार खायचा व केला तर आईचा मार खायचा, असे घोर संकट आनंदीबाई वयाच्या १०-१२ व्या वर्षी झेलत होत्या. एकदा आईने जळक्या लाकडाने दिलेल्या माराणे शरीरावर झालेल्या जखमा गोपाळरावांचे निदर्शनास आले व या घरात राहुन तिचा अभ्यास होणार नाही, या विचाराने त्यांनी आपली बदली अलीबाग येथे करवून घेतली.
गोपाळरावांची अलिबाग येथे आणि नंतर कोलकाता येथे बदली झाली. ते एक पुरोगामी होते आणि त्या काळातही त्यांचा महिला शिक्षणाला पाठिंबा होता. आपल्या काळातील इतर पती आपल्या पत्नींना स्वयंपाक न केल्याबद्दल मारहाण करत, या उलट गोपाळराव हे आपल्या तरुण पत्नीला अभ्यास न केल्याबद्दल मारहाण करीत. कारण पत्नीने वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर बनावे, असा त्यांचा आग्रह होता. ते स्वतः लोकहितवादींची शतपत्रे वाचत. आपल्या पत्नीला शिक्षणात रस आहे, हे गोपाळरावांना कळल्यावर लोकहितवादींच्या शतपत्रांमुळे ते प्रेरित झाले आणि आपल्या पत्नीस इंग्रजी शिकविण्याचे ठरविले. त्यांनी कलकत्त्याला बदली घेतल्यावर तेथे आनंदीबाई संस्कृत आणि इंग्लिश वाचणे आणि बोलणे शिकल्या. आनंदीबाईंच्या वैद्यकीय शिक्षणाच्या बाबतीत गोपाळरावांनी अमेरिकेत काही पत्रव्यवहार केला. परंतु हे शिक्षण घेण्यासाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची अट होती आणि धर्मांतर करणे तर यांना मान्य नव्हते. पुढे गोपाळरावांची चिकाटीमुळे आनंदीबाईंना ख्रिस्ती धर्म न स्वीकारता १८८३मध्ये वयाच्या एकोणिसाव्या वर्षी विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हेनियामध्ये प्रवेश मिळाला. तेथे गेल्यानंतर अमेरिकेतील नवीन वातावरण आणि प्रवासातील दगदग यामुळे आनंदीबाईंची प्रकृती खुप ढासळली होती. परंतु अमेरिकेतील कारपेंटर जोडप्याचे साहाय्य त्यांना लाभले.
सुरूवातीला तत्कालीन भारतीय समाजाकडून आनंदीबाईंच्या डाॅक्टर होण्याला खुप विरोध झाला. त्यावेळी त्यांनी कोलकाता येथे एक भाषण केले. तेव्हा त्यांनी भारतामध्ये महिला डॉक्टरांची किती आवश्यकता आहे? याचे प्रतिपादन केले आणि त्यांना यासाठी धर्मांतर करण्याची काही गरज नाही. त्या आपला हिंदुधर्म व संस्कृती यांचा कदापि त्याग करणार नाही. त्यांना आपले शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतात येऊन महिलांसाठी एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायचे असल्याचे स्पष्ट सांगितले. आनंदीबाईंचे हे भाषण लोकांना खुप आवडले. त्यामुळे त्यांना होणारा विरोध तर कमी झालाच, पण त्यांना या कार्यात हातभार म्हणून संपूर्ण भारतातून आर्थिक मदत जमा झाली. भारताच्या तत्कालीन व्हाइसरॉय यांनी पण दोनशे रुपयांचा फंड जाहीर केला. कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम दोनच वर्षांत पूर्ण करून मार्च १८८६मध्ये आनंदीबाईनी एमडीची पदवी मिळवली. एमडीसाठी त्यांनी ‘हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतिशास्त्र‘ या विषयावर प्रबंध लिहिला. एमडी झाल्यावर व्हिक्टोरिया राणीकडून त्यांचे अभिनंदन झाले. हा प्रवास करताना त्यांना गोपाळरावांचा पाठिंबा होता. तिच्या पदवीदान समारंभाला गोपाळराव स्वतः अमेरिकेत गेले होते. पंडिता रमाबाई यांनीसुद्धा या समारंभात भाग घेतला. एमडी झाल्यावर आनंदीबाई जेव्हा भारतात आल्यावर त्यांना कोल्हापूरमधील अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलमधील स्त्री-कक्षाचा ताबा देण्यात आला.
केवळ २१ वर्षाच्या जीवनयात्रेत आनंदीबाईंनी भारतीय स्त्रियांसाठी प्रेरणादायी जीवनादर्श उभा केला. दुदैवाने आनंदीबाईंच्या बुद्धिमत्तेचा आणि ज्ञानाचा फायदा जनतेला होऊ शकला नाही. मात्र ‘चूल आणि मूल म्हणजेच आयुष्य’ असे समजणाऱ्या महिलांना त्या काळात आनंदीबाई जोशी यांनी आदर्श व मानदंड घालून दिला. एकीकडे सावित्रीमाई-जोतिबा फुले स्त्रीशिक्षणासाठी प्रयत्न करत असतानाच आनंदी-गोपाळ जोशी हे जोडपे आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी झटत होते. जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेही मोठे काम अशक्य नाही. हे या जोडप्याने समाजाला सिद्ध करून दाखवले आहे, असे म्हणता येऊ शकेल. समाजात राहून काम करायचे तर अडथळे येणारच. वयाच्या विशीतच त्यांना क्षयरोग झाला होता. पुढे काही महिन्यातच म्हणजे दि.२६ फेब्रुवारी १८८७ रोजी त्यांना पुण्यात मृत्यू आला.
!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे जयंती निमित्त त्यांना व त्यांच्यातील अचाट जिद्दीला विनम्र अभिवादन !!
✒️संकलन व सुलेखन:-‘अलककार’- श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी(म.रा. डि.शै. दै.रयतेचा कैवारीचे लेख विभाग प्रमुख तथा जिल्हा प्रतिनिधी.)मु. पो. ता. जि. गडचिरोली,व्हा. नं.९४२३७१४८८३.
इमेल- [email protected]




