Home महाराष्ट्र यशस्वी व्हायचे असेल,तर कुटुंब, मित्र आणि संघटनेची गरज असते!

यशस्वी व्हायचे असेल,तर कुटुंब, मित्र आणि संघटनेची गरज असते!

432

जन्मापासून माणूस कुटुंबाशी जोडला असतो.जस जसा तो मोठा होत जातो तस तसे त्याचे माणसाशी नात जोडल्या जाते.कुटुंबा बाहेर शेजारी असतात.त्या सर्वामिळून परिसर तयार होतो.शेजारी आणि परिसरात मित्र तयार होतात.कुटुंबातील शेजारी आणि परिसरातील मित्र यांची मग संस्था संघटना निर्माण होते.जी विचारधारेवर आचारसंहिते वर चालते,सर्वांचा विकास आणि कल्याण करते.तिच्याशी जुळणारे सर्व सुखादुखाच्या प्रसंगी कायम सोबत असतात.स्वर्गापेक्षा जास्त प्रेम मी माझ्या जोडलेल्या माणसावर करतो कारण स्वर्ग आहे की नाही. हे कोणाला माहीत नाही परंतु जीवाला जीव देणारी माणसं माझ्या आयुष्यात आहेत. कासवाच्या गतीने का होईना,पण रोज थोड़ी थोड़ी प्रगति माणूस संस्था संघटनेत राहून करतो.

संस्था संघटनेत राहणाऱ्या मानसच्या प्रगतीत खुप ससे आडवे येतील.बस त्यांना हरवायची हिंमत ठेवा.जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल,तर नोटा मोजू नका!.कधी चुकून डोळयांत दोन अश्रू आले तर ते पुसायला किती जण येतात ते मोजा!. तेव्हाच कुटुंब,मित्रांची आणि संघटनेची गरज का असते ते समजेल.आयुष्यात प्रत्येक व्यक्तिला किंमत द्या, कारण जे चांगले आहेत ते साथ देतील व जे वाईट असतील ते अनुभव देतील.काय चुकलं,हे शोधायला हवं,पण आपण मात्र “कुणाचं चुकलं” हेच शोधत राहतो.त्यामुळेच आपण मोठे होत नाही आणि इतरांना होऊ देत नाही.म्हणूनच आपली माणस मोठी करा,आपोआप आपणही मोठे होऊ.नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसते.मनापासून जे सांभाळल जाते ते खरं नातं असते.जवळीक दाखवणारा हा जवळचाच रक्ताच्या नात्यातील असतोच असं नाही.

जात,धर्म,प्रांत सर्व सीमारेषा ओलांडून जो हृदयापासून जोडला जातो,तो जवळचा असतो तोच आपला असतो.आपल्या निःस्वार्थी कुशल कर्माने दुसऱ्यांच्या मनात घर करून जगणे हीच जीवनातील सर्वात मोठी कमाई आहे.त्यासाठी कुटुंब,मित्रांची आणि संघटनेची गरज असते.एकलकोंडे पैसे कमवून ठेवू शकतात.पण कुटुंबातील नातलग,मित्र आणि संघटनेपासून ते कोसो दूर असतात.कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्याला त्याची समाजातील आपली किंमत कळते.आयुष्याने शिकवलेलं एक वाक्य.जिंकलो तर आवरायचं आणि हरलो तर सावरायचं.

यशस्वी व्हायचे असेल,तर कुटुंब,मित्रांची आणि संघटनेची गरज असते.त्याच प्रमाणे पण यशाचे शिखर गाठायचे असेल,तर शत्रु आणि स्पर्धकांची तेवढीच गरज असते.ज्याप्रमाणे जेवणातील भाजीत मीठ असावे लागते तेवढीच गरज असावी. सुख ही एक मानसिक सवय आहे,ती लावून घेणं आपल्याच हातात आहे.तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल,तितकंच सुखी तुम्ही रहाल.तुमच्या सुखी रहाण्यावर केवळ आणि केवळ तुमचाच अधिकार असतो.इतर लोकं तुम्हाला दुःख देऊच शकत नाहीत.ही गोष्ट एकदा लक्षात आली की जगणं फार सोपं होऊन जाईल.चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा,अनोळखी लोकात राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगलच असते.कोणतही फुल कधीच दुसऱ्या फुलांशी स्पर्धा करत नाही कारण त्यांना पण माहीत असतं की निसर्गाने प्रत्येकालाच वेगळं बनवलयं,प्रत्येकाला काहीतरी सुंदर दिलयं.त्याचा माणस योग्य वेळी योग्य ठिकाणी वापर करणारच.महिलांना केसात बांधणारा गजरा त्याची फुल मृत्यू झालेल्या शरीरावर सुद्धा टाकायची हिंमत कोणी करीत नाही.तेव्हा त्याचे महत्व आणि किंमत वेगवेगळी असते.
माणसाला पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते.

जशी मृत्यू पेक्षा “श्वासाला” जास्त किंमत असते. या जगात नाते तर सर्वच जोडतात.पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त महत्व आणि किंमत असते.जीवनाच्या प्रवासात शाळा,कॉलेज,नोकरी, रिक्षा,बस,रेल्वे प्रत्येक ठिकाणी अनेक लोक भेटतात.त्यातील काहीं फायदा घेतात,तर काही योग्य वेळी आधार देतात.फरक ऐवढाच आहे.की फायदा घेणारे डोक्यात आणी आधार देणारे हृदयात कायम घर करून राहतात.त्यासाठीच स्वतःला असे तयार करा की तुमच्या विरोधकाला तुमचा पाय खेचण्याच्या ऐवजी तुमचा हात पकडून पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे.हे तेव्हाच शक्य असते.जेव्हा तुम्ही कुटुंब,मित्र आणि संघटने सोबत असता. तेव्हाच कमीपणा घ्यायला शिकलो.म्हणून आजवर खुप माणसं कमावली.हिच माझी श्रीमंती प्रसंग सुखाचा असो किंवा दुःखाचा तुम्ही हाक द्या कुटुंब,मित्र आणि संघटना तुमच्या सोबत उभी राहते. ज्यावेळी माणूस स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता कार्य करतो त्यावेळी त्याच्या हातून सर्वोत्तम कुशल कार्य घडते.त्याची प्रत्येक माणसाच्या मनात नोंद होते.शंभर वर्ष जिवंत राहण्यासाठी,शंभर वर्ष जगणं गरजेच नाही.काहीतरी चांगलं काम करा की लोक तुम्हाला हजारो वर्ष लक्षात ठेवतील.महापुरुष,राष्ट्रसंत,राष्ट्रमाता शंभर,दोनशे,चारशे पाचशे वर्ष झाली शरीराने जाऊन पण ती आज ही सैद्व्य आपल्या समोर लक्षवेधी प्रेरणा देऊन उभ्या आहेत.त्यांच्या नावाचा,प्रतिमेचा विसर आपल्याला होत नाही.त्याचे कार्यच आपल्याला नियमितपणे प्रेरणा देते.म्हणूनच त्यांना आपण प्रेरणास्थान म्हणतो.

तुम्ही कितीही चांगले राहा,कितीही चांगले काम करा, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. जी व्यक्ती तुम्हाला चुकीचं समजते ती मरेपर्यंत तुम्हाला चुकीचंच समजणार. कारण दृष्टीचे ऑपरेशन होऊ शकते दृष्टिकोनाचे नाही.ज्याचे कुशल कर्म चांगले आहे,तो कधी संपत नसतो.सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात.या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही.म्हणूनच कुटुंब,मित्रांची आणि संघटनेची गरज असते.त्यावर नि:संकोच विश्वास ठेवा,योग्य वेळी इतकं मिळते की मागायला काही उरतच नाही.कुटुंबात,मित्रांत आणि संघटनेत कोण कसा ठरतो. धन कमवतो तो “धनवान” ज्याच्या अंगी चांगले गुण तो “गुणवान” ज्याला चांगली बुद्धी लाभली तो “बुध्दिवान” ज्याच्या अंगी चांगले कर्तृत्व तो “कर्तृत्ववान” ज्याने नाती जोडली व जपली तो “मौल्यवान” यांची संपती कोणीच मोजण्याच्या भानगडीत पडत नाही.त्याची ओळख विचार आणि आचरण त्यांच्या नावाला शोभणारी असते.म्हणूनच ते सर्व माणसात वेगवेगळी ओळख निर्माण करतात.त्यासाठीच तर कुटुंब,मित्रांची आणि संघटनेची गरज असते.चुकीच्या निर्णयामुळे अनुभव वाढतो.आणि योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास.म्हणून निर्णय चुक कि बरोबर विचार करायचा नाही.निर्णय घ्यायचा अनं पुढे जायाचे.प्रत्येक माणसांच्या जीवनात एक क्षण रडवून जातो,तर दुसरा क्षण हसवून जातो.तो क्षण काळ थांबत नाही.निघून जातो.

म्हणूनच माणसाच्या या जीवनरूपी प्रवासात येणारा प्रत्येक क्षण जीवन जगण्याची कला शिकवून जात असतो.ज्या प्रमाणे चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध हा कमी होत नसतो,त्या अर्थात ज्याचे कुशल कर्म चांगले आहे तो कधी ही संपत नसतो,सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या असतात,याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही अखेर तोच संपतो. चांगल्या लोकांना मिळणारा मान कधी कमी होत नाही,ज्या प्रमाणे शुद्ध सोन्याचे शंभर तुकडे केले तरीही त्याची किंमत कमी होत नाहीं.तसेच चांगल्या माणसांचे असते.माणूस हा चुकीचा पुतळा आहे अशी म्हण आहे.नैसर्गिकरीत्या सुखाचा आनंद घेतांना त्याच्या हातून जी चूक होते त्यातूनच माणसाचा जन्म होतो.म्हणूनच म्हणतात चुकणं ही “प्रकृती” आहे आणि ती मान्य करणं ही” संस्कृती” आहे.आणि त्या ही पुढे जाणे म्हणजे सुधारणा करणं ही “प्रगती” आहे.म्हणूनच प्रत्येक माणसाने ठरविले पाहिजे की जगायचे तर दिव्या प्रमाणे,जो राजाच्या महालात आणि गरीबांच्या झोपडीत एक सारखा प्रकाश देतो.आणि अंधार अज्ञान अंधश्रद्धा दूर करतो.म्हणूनच प्रत्येक माणसाला यशस्वी व्हायचे असेल,तर कुटुंब,मित्रांची आणि संघटनेची गरज असते.जी विचारधारेवर आचारसंहिते वर चालते,सर्वांचा विकास आणि कल्याण करते.

✒️सागर रामभाऊ तायडे(भांडूप,मुंबई.अध्यक्ष सत्यशोधक कामगार संघटना)मो:-९९२०४०३८५९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here