



🔹प्रहार जनशक्तीची मागणी, पद भरती रखडली
✒️अमोल उत्तम जोगदंडे(उमरखेड प्रतिनिधी)
उमरखेड(दि.28मार्च):-शहरात उपजिल्हा रुग्णालयाची १०० खाटांची सुसज्ज इमारत उभी झाली. मात्र, पद भरती व यंत्रसामग्री अभावी ही वास्तू शोभेची वस्तू बनली आहे. उपजिल्हा रुग्णालयात यंत्रसामग्री व पद भरती करून त्वरित लोकार्पण करावे, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य मंत्र्यांकडे केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
शहरी व ग्रामीण नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, या करिता वामनराव उत्तरवार यांनी कोट्यवधींची मालमत्ता दान केल्यामुळे १९६४ मध्ये या रुग्णालयाची स्थापना झाली. आता ८ महिन्यांपूर्वी सुमारे १४ कोटी रुपये खर्चुन भव्य वास्तू
उभारण्यात आली. मात्र, तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची पद भरती रखडली आहे. परिणामी, रुग्णालयाची अवस्था कुटीर रुग्णालयापेक्षा ही बिकट झाली आहे.बाह्य रुग्ण तपासणी असलेल्या या रुग्णालयात अपुरी यंत्रणा व दर्जेदार उपचार उपलब्ध नसल्याने रुग्णांना रेफर करण्याचा आजार रुग्णालय प्रशासनाला जडला आहे. तालुक्यातील जनतेला नाइलाजास्तव खासगी रुग्णालयात उपचार करवून घ्यावे लागत आहे. लोकप्रतिनिधी व आरोग्य विभागाने रुग्णालयात सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख राहुल मोहितवार, सय्यद माजीद, अंकुश पानपट्टे, गजानन धोंगडे, श्याम चेके, गोपाल झाडे आदींनी केली आहे.


