Home महाराष्ट्र थेंब थेंब पाणी गळत्या नळास मीटरचे काय काम?

थेंब थेंब पाणी गळत्या नळास मीटरचे काय काम?

272

बऱ्याच ठिकाणी पाण्याची टाकी- जलकुंभ कोठे असावे? गावापेक्षा उंच ठिकाणी असावे की गावापेक्षा सखल भागी असावे? याचा काही एक ताळमेळ साधलेला आढळून येत नाही. जर गावाच्या उंच भागी जलकुंभ असेल तर समस्त गावकऱ्यांना पाणी मुबलकप्रमाणात मिळते. जर जलकुंभ गावाच्या सखल भागात असेल तर ती नळयोजना अजिबात यशस्वी नाही. त्यामुळे होते काय? तर सखल भागातील लोकांना पाणी भरपूर तर उंच भागातील लोकांना ते त्रोटक स्वरूपात मिळते. कुठे कुठे तर तेही नशीब होत नाही. प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी- ‘अलककार’ यांचा हा लेख… संपादक. संपूर्ण महाराष्ट्रात पाणी पुरवठा योजना राबवली जात आहे. खेडोपाडी जनतेला विनासायास- सहजासहजी पाणी उपलब्ध करून देण्याच्या महदहेतूने नळयोजना कार्यान्वित केली जात आहे. पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे लोकांना पायपीट करावी लागत असते. विशेषतः ही पायपीट महिलावर्गाच्या वाट्याला येत असते.

ही गैरसोय टाळण्यासाठी स्थानिक प्रशासन- स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत नळयोजना शहरांसह खेड्यापाड्यात सुरू करण्यात आली आहे, तर कुठे कुठे ती निर्माणाधीन आहे. हे तसे पुण्याचे कार्य आहे, चांगले आहे. मात्र सत्य परिस्थिती ही संतापजनक व निषेधार्हच आहे. सखल भागात नळाचे पाणी रात्रंदिवस मिळू शकते. नव्हे तर लोक स्वतःच्या नळाला तोट्या न बसविल्याच्या कारणाने ते अहोरात्र ढळढळा सुरूच असते. तर उंच भागात वॉल अर्धवट खोलल्यामुळे वेळेवरही एक थेंबसुद्धा मिळेल तर शप्पथ! मात्र प्रशासन पाणीपट्टी म्हणून ‘सब घोडे बारा टक्के’ या न्यायाने उकळत असते. हीच खरी लाजिरवाणी गोष्ट म्हणावी लागेल. आधी प्रशासनाने सर्वांना मुबलक पाण्याची सोय करावी आणि मगच मीटर बसवावेत, अशी ओरड जनतेच्या गोटातून होत आहे. ते खरोखरच न्याय्य व रास्त आहे.
बऱ्याच ठिकाणी पाण्याची टाकी- जलकुंभ कोठे असावे? गावापेक्षा उंच ठिकाणी असावे की गावापेक्षा सखल भागी असावे? याचा काही एक ताळमेळ साधलेला आढळून येत नाही. जर गावाच्या उंच भागी जलकुंभ असेल तर समस्त गावकऱ्यांना पाणी मुबलकप्रमाणात मिळते. जर जलकुंभ गावाच्या सखल भागात असेल तर ती नळयोजना अजिबात यशस्वी नाही. त्यामुळे होते काय? तर सखल भागातील लोकांना पाणी भरपूर तर उंच भागातील लोकांना ते त्रोटक स्वरूपात मिळते.

कुठे कुठे तर तेही नशीब होत नाही. एक उदाहरण म्हणजे आपण जेथे राहतो, त्या गडचिरोली शहरातील रामनगर वॉर्डातील ही कैफियत आहे. हा वॉर्ड तर उंच-सखल भागात विस्तारलेली खुप मोठी जनवस्ती आहे. तेसे विचार करता, या वॉर्डासाठी जलकुंभ हे वेगळे आणि तेही सर्वात उंच भाग असलेल्या पोटेगाव रोडला लागून उभारलेले असावयास हवे होते. मात्र ते त्याहून कितीतरी सखल असलेल्या वृद्धाश्रम भागात आहे. तसेही असू द्या, मात्र वेगळी सीलबंद पाइपलाइन ही थेट रामनगर येथेच उघडणारी हवी की नाही? तशी असेल तरच सखल भागातील पाणी उंच भागात चढेल, अन्यथा ‘फूसऽऽ.. फूसऽऽऽ…’ हवाच! कारण अधल्या मधल्या भागात दिलेल्या कनेक्शन- नळाद्वारे ते सगळे पाणी झिरपून जाते. तरीही मात्र येथील रहिवासी जनतेला नळाचे पाणी सर्वाधिक गोडच की! काहीही करून आपल्याला ते गुंड दोन गुंड तरी मिळालेच पाहिजे. म्हणून संपूर्ण वॉर्डभरातील प्रत्येक घरी नळाच्या खाली माणूस दोन माणूसभर खोल खड्डे खोदून घेतले आहेत. ते गुंड दोन गुंड पाणी केवळ स्वयंपाक व पिण्यासाठीच वापरले जाते. नळाचे पाणी अंघोळ करणे, भांडीकुंडी व कपडे धुणे अशा इतर कामासाठी वापरण्याएवढे मिळत असेल तर शप्पथ! त्यासाठी वॉर्डातील प्रत्येक घरी बोअर- कूपनलिका खोदलेल्या आहेत.

काही चाणाक्ष व दीडशहाण्या लोकांनी नळजोडणीला गुप्तपणे अंडरग्राऊण्ड टिल्लूपंप जोडलेले आहेत. हे असे का केले जाते? यावर प्रशासनास विचार करण्याची बुद्धी नाही किंवा फावला वेळही मिळत नाही. बाहेरून बाहेरून दिसणारे टिल्लूपंप जप्त करून काढून नेले. लोक ते का लावतात? याची कुणाकडूनही विचारपूस नाही की खबरमातही घेतली जात नाही, याचेच नवल वाटते.काही ग्रामस्थ तथा नागरिक नळाच्या पाण्याचा दुरुपयोग व नासाडीही करतात. उन्हाळ्यात कुठे कुठे तर पाणी विकत घ्यावे लागते. याची जाणीव सूज्ञ नागरिकांना असावयास हवी. पाण्याचा पुनर्वापर करणे अत्यावश्यक होत आहे. काळाच्या खाणाखुणा ओळखून प्रशासनही आता खडबडून जागे होत आहे. महाराष्ट्रात सर्वत्र कार्यान्वित केलेल्या पाणी पुरवठा योजनेतील अत्यावश्यक समजल्या जाणार्‍या नळयोजनेवर कडक निर्बंध घातले जाताहेत.

घरगुती नळांना मीटर जोडणी केली जात आहे. येणाऱ्या मीटर रिडींगप्रमाणे पाणीकर आकारणी केली जाणार आहे. पाण्याची बेमुर्वतपणे उधळपट्टी करणाऱ्या कुटुंबांना चांगलीच चपराक बसणार आहे. परंतु काही उपद्रवी उपभोक्ते याही हिकमतीत काहीतरी काळेबेरे नक्कीच करतील यात शंकाच नाही.उंच भागातील नागरिकांना मात्र ‘आगीतून निघून फुफाट्यात’ पडल्याचा त्रास भंडावून सोडणार आहे. त्यांच्यासाठी मीटर फिटिंग कुचकामी ठरत आहे. त्यांच्यासाठी पाणी आवश्यकतेप्रमाणे मिळण्याची तजवीज झालेली लाभदायक ठरली असती. खड्ड्यातच मीटर बसविल्याने तेथे खुप अडचण निर्माण झाली आहे. नळाखाली कसेबसे पसरट भांडे ठेऊन लोट्याने गुंड भरले जात होते. आता तर मीटरने जागा व्यापल्याने तोही उपाय पार खुंटला आहे. त्यामुळे लोक बिथरले आहेत. ते सरळ नळ कनेक्शनच काढून टाकण्याच्या तयारीत दिसत आहेत.प्रशासनाने वेळीच जागे होऊन अशा ठिकाणी पाणी मुबलक प्रमाणात मिळेल, अशी व्यवस्था यथाशिघ्र करणे अत्यंत गरजेचे वाटते. प्रशासन जागृत होण्यास्तव हा लेखप्रपंच!

✒️संकलन व लेखन:-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी- ‘अलककार'(म.रा. डि.शै. दै.रयतेचा कैवारीचे लेख विभाग प्रमुख तथा जिल्हा प्रतिनिधी)मु. पो. ता. जि. गडचिरोली,व्हा. नं. ९४२३७१४८८३.
इमेल- nikodekrishnakumar@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here