




🔹राज्य शासनाच्या व्यसनवर्धक नीतीचा निषेध करण्यासाठी आझाद मैदानावर व्यसन विरोधी संघटनांचा एल्गार, 40 हून अधिक संघटनांचा सहभाग
✒️धुळे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
धुळे(दि.25मार्च):-राज्याचे आघाडी शासन गेल्या काही दिवसांपासून विविध व्यसनवर्धक नीतीचा स्वीकार करत आहे. समाज घातकी निर्णय घेऊन व्यसन पसरवण्याचा अतिरेकी उत्साह दाखवत आहे. शासनाच्या व्यसन वर्धक नीतीला प्रखर विरोध करण्यासाठी गुरुवारी (ता. 24) सकाळी 11 पासून मुंबई येथील आझाद मैदानावर व्यसन मुक्त महाराष्ट्र समन्वय मंचातर्फे 8 वे राज्यस्तरीय धरणे आंदोलन झाले. विशेष म्हणजे या आंदोलनात राज्यातील 40 हून अधिक संस्था, संघटनांनी सहभाग नोंदवित सरकारचे डोके ठिकाणावर आहे, असा प्रश्न उपस्थित करत शासनाला धारेवर धरले. आंदोलनात धुळ्याहून कार्यकर्ते सहभागी झाले होते.
व्यसन हा आजार आहे, असे जागतिक आरोग्य संघटना बजावत आहे. तरीही राज्यातील आघाडी शासनाने गेल्या काही दिवसांपासून किमान डझनभर व्यसनवर्धक नीतीचा पुरस्कार करणारे निर्णय घेतलेले आहेत. या निर्णायांविरोधात व व्यसनवर्धक नीतीचा निषेध करण्यासाठी आझाद मैदानावर आजचे आंदोलन झाले. यावेळी राज्य शासनाचा निषेध नोंदविणारे विविध बॅनर हातात घेऊन विविध घोषणा देण्यात आल्या.विविध व्यसनांचे दुष्परिणाम दाखविणारे पोस्टर्स प्रदर्शन आंदोलनस्थळी लावण्यात आले होते. त्याद्वारे व्यसनांचे दुष्परिणाम काय होतात, हे समजविण्यात आले होते. आंदोलनात मंचाचे राज्य निमंत्रण अविनाश पाटील व वर्षा विद्या विलास यांच्यासह धुळ्याहून नवल ठाकरे, रामदास जगताप, विलासराव कर्डक, महेंद्र शिरसाठ, अॅड. शंकरराव पाटील आदींनी सहभाग नोंदविला.




