




🔸आ.डॉ. रत्नाकर गुट्टे विधानसभेत आक्रमक
✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.24मार्च):-सध्या महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय सुरू आहे. दररोज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होत आहे. विरोधी पक्षातील सदस्यांच्या मतदार संघात निधी देताना दुजाभाव झाल्याची भावना काही सदस्य व्यक्त करीत आहेत. त्यामुळे गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे प्रश्न मांडताना आ.डॉ. रत्नाकर गुट्टे आक्रमक झाले होते.
मागे झालेल्या अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील रस्त्याची दैना झाली आहे. अनेक गावांचे रस्ते उखडून गेले आहेत. तसेच काही छोटे-छोटे पुल सुध्दा मोडकळीस आले आहेत. त्यात पुन्हा काही वेळेवर बील मिळत नसल्यामुळे काही कंत्राटदार अर्धवट कामे सोडून गेले आहेत. मंजूर झालेल्या ५६ पैकी केवळ १३ कामे पूर्ण झाली आहेत. मग उरलेल्या कामांना शासन निधी देणार आहे की नाही? असा उद्विग्न सवाल गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सरकारला विचारला.
आ.डॉ.गुट्टे यांनी विचारलेला प्रश्न संयुक्तिक आहे, त्यामुळे महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार यांनी निवेदन करायला करावे, असे तालिकाध्यक्षांनी सांगितले. यावर ना.सत्तार यांनी निवेदन करून याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. तरीही आ.डॉ. गुट्टे यांचे समाधान झाले नसल्याने ते सभागृहात आक्रमक झाले. तेव्हा आ.डॉ. गुट्टे मांडत असलेला प्रश्न महत्वाचा आणि लोकांच्या जिव्हाळ्याचा आहे. त्यामुळे गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्री महोदयांच्या दालनात तात्काळ बैठक लावून संबधित प्रश्नावर तोडगा काढावा असे तालिकाध्यक्षांनी सरकारला आदेशीत केले आहे.
दरम्यान, मतदार संघातले प्रलंबित प्रश्न, लोकपयोगी कामे, रखडलेल्या विम्याचे प्रश्न, धारासुर मंदिराचा जीर्णोद्धार असे विविध प्रश्न आणि मागण्या आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी अधिवेशनात लाऊन धरल्यामुळे मतदार संघातील नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.




