




🔸जागतिक जल दिनानिमित्त आयोजित जल जागृती सप्ताहाचा समारोपीय कार्यक्रम संपन्न
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
गडचिरोली(दि.22मार्च):- गडचिरोली जिल्ह्यात 4 मुख्य, 10 उपनद्या तर शेकडो नाले आहेत, 3 महिने त्यांना पूरस्थिती असते आणि नंतर उन्हाळयात त्या कोरड्या असतात. जिल्हयात पाणी भरपूर आहे मात्र आपणाला त्याचे नियोजन आत्ताच करणे गरजेचे असून, भविष्यात पाणी वाहते पाहायचे असेल तर आत्तापासूनच आपल्या पाण्याशी संबंधित सवयींमधे बदल करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी केले. जलसंपदा विभागाकडून पाटबंधारे विभागाच्या जल दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. आपल्या आजूबाजूला असलेल्या पाण्याचे आपण कसे नियोजन करतो याविषयी आता आपण स्वत:लाच विचारले पाहिजे. प्रशासन विविध स्तरावर जल जागृती मोहिमा राबवित असते, योजनांची अंमलबजावणी करीत असते.
परंतू काय करायचे ते लोकांनीच ठरविणे आवश्यक आहे. प्रशासनावर अवलंबून न राहता लोकसहभागातून तसेच प्रत्यक्ष कृतीमधून पाण्याविषयी कामे होणे गरजेचे आहे. शासन मार्गदर्शकाची भूमिका विकासात्मक प्रक्रियेत पार पाडत असते. म्हणून लोकांनी स्वत: पुढे येवून पाण्याचे नियोजन करून विविध क्षेत्रात विकास साधला पाहिजे असे मत त्यांनी उपस्थितांसमोर व्यक्त केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, समाजसेवक देवाजी तोफा, व्याख्याते डॉ. सविता सादमवार, मनोहर हेपट, अनूप कोहळे, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग अविनाश मेश्राम उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी पाण्याविषयी जागृती करत असताना विद्यार्थी व युवकांना घेवून करा असा सल्ला उपस्थितांना दिला. ते म्हणाले, लहान मुले आताच पाणी बचत, वापर व नियोजन कसे करायचे याबाबत शिकले तर भविष्यात त्यांना पाण्याविषयी सांगायची गरज भासणार नाही. त्यांचावर आता केलेले संस्कार भविष्यात उपयोगी पडतील. या कार्यक्रमात जल जागृती सप्ताहामधे राबविण्यात आलेल्या कार्यक्रमातील व स्पर्धांमधील विजेत्यांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
प्रमुख अतिथी देवाजी तोफा यांनी जिल्ह्यातील पाणी विषयाची कामे स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा विचार करून, येथील रूढी, परंपरा व संस्कृतीचा विचार करून करावीत असे मत व्यक्त केले. विज्ञानाने प्रगती होते पण त्याला आध्यात्माची जोड दिल्यास विकास कायमस्वरूपी होण्यास मदत होते असे ते म्हणाले. मन व्यवस्थापन, जन व्यवस्थापन, वन व्यवस्थापन व जल व्यवस्थापन यातून आपल्याला आपला हेतू साध्य करता येईल असे मत यावेळी देवाजी तोफा यांनी व्यक्त केले. यानंतर व्याख्याते डॉ.सविता सादमवार, व्याख्याते मनोहर हेपट आणि अनूप कोहळे यांनी उपस्थितांना जल दिना निमित्त मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता अविनाश मेश्राम यांनी केले, आभार उप कार्यकारी अभियंता गणेश परदेशी यांनी मानले तर सुत्रसंचलन श्री.भांडेकर यांनी केले.




