Home महाराष्ट्र मला मारशील रे, पण बरबाद होणा-या तुझ्या आयुष्याचे काय ?

मला मारशील रे, पण बरबाद होणा-या तुझ्या आयुष्याचे काय ?

318

✒️दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551006

हिजाब संदर्भात कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर परवा लिहीले होते. ‘विषय फक्त इस्लामचा नाही !’ या शिर्षकाच्या अग्रलेखात सर्व धर्मातल्या धर्मांधतेचा समाचार घेतला होता. सदर लेखावर कोल्हापुरातील एका युवकाचा वाटसपवर मला धमकीचा मेसेज आलाय. त्याने मला धमकी दिली आहे. “धर्माविरूध्द लिहीणे, बोलणे बंद करा नाहीतर हुडकून मारू ! असे तो म्हणतोय. धर्माविरूध्द बोलाल तर मारणार की त्यात एवढ काय !” अस तो सहज बोलला. अतिशय बेदरकारपणे तो ही धमकी देत होता. शाहू महाराजांचे कोल्हापुर हल्ली सनातन्यांचा व जातीयवाद्यांचा अड्डा होतोय याची खंत वाटते. खरेतर असल्या धमक्यांची सवय झाली आहे. त्याचे काहीच वाटत नाही. कधी स्वत:ची काळजीही वाटत नाही. स्वत:चा विचार बाजूला ठेवत ही प्रबोधनाची वाट निवडली आहे. त्यामुळे या दमबाजीचे काहीच वाटत नाही. असल्या फुसकुळ्या नित्याच्याच आहेत त्याला डरतो कोण ? पण काळजी वाटते ती धमकी देणा-या पोराची. मला तो मारेल किंवा धर्मासाठी आणखी कुणालाही मारेल. कारण त्याच्या डोक्यात धर्माचे विषच इतके ठासून भरले आहे की तो काहीही करेल. बहूजन समाजात अशी हजारो मुलं आहेत जी धर्मासाठी मरायला व मारायला तयार आहेत.

खरी काळजी वाटते ती याच पोरांच्या बरबाद होणा-या आयुष्याची. मला हुडकून मारण्याची धमकी देणा-या, धर्माच्या नावाने वेडावलेल्या त्या पोराच्या आई-बापांची काही स्वप्ने असतील, त्यांनी त्याला जन्माला घालताना तो दहशतवादी व्हावा, तो खूनी व्हावा या साठी तर नक्कीच घातला नसेल. तो एक चांगला माणूस व्हावा, तो एक चांगला पुत्र व्हावा, त्याने घराचे, कुळाचे, गावाचे व आई-बापाचे नाव रोशन करावे असेच त्यांना वाटत असेल. पण धर्माच्या नावाने भरकटलेल्या, आयुष्य नासवून घ्यायला निघालेल्या या पोराचे काय होणार ? त्याला या कारस्थानाची कधी जाणीव होणार ? दाभोळकरांना मारणारा सातारचा कळसकर असाच धड आयुष्यही न पाहिलेला. ओठावर नव्याने मिसरूड फुटलेला. गेले काही महिने तो तुरूंगात सडतो आहे. आजवर धर्माच्या नावाने ज्यांनी ज्यांनी दंगलीत सहभाग घेतला ते ही असेच सडले. कोर्टाच्या येरझारा, तुरूंगवास यात बरबाद झाले. कोर्ट-केसेसमध्ये अडकल्यावर त्यांना विचारायला एकही धर्माचा ठेकेदार गेलेला नाही. त्यांचे घर, त्यांचे आई-बाप सांभाळायला कुणी पुढेे आले नाही. ते सत्ता भोगत बसले, सत्तेच्या खुर्चीत जावून बसले अन बरबाद झाली ही पोरं. धर्माची ढाल करत ब्राम्हण्यवादी देशाच्या सत्तेत आले.

हिंदू धर्माची ढाल करत केवळ ब्राम्हणी वर्चस्वासाठी बहूजनांची मस्तकं भडकवली जात आहेत. त्यांच्या मनात मुस्लिमांविषयी आणि भाजपविरोधी पक्ष-नेत्यांविषयी कमालीचा द्वेष भरला जात आहे. ही पोरं कच्चे भांडवल म्हणून वापरली जात आहेत. त्यांना खून करायला प्रवृत्त केले जात आहे. त्यासाठी इतिहास मोडून तोडून सांगितला जात आहे. धर्माची आग भडकवून सत्तेची शेती यशस्वी केली जात आहे. आज देशात ऐंशी टक्के हिंदूच आहेत. देशात हिंदूचेच प्राबल्य आहे, हिंदूच बहूसंख्य आहेत, केंद्रात, राज्यात हिंदूच सत्तेत आहेत. मग हिंदूंचे राज्य कुठले येणार ? कोण हिंदू सत्तेत येणार ? कुठल्या हिंदूची सत्ता येणार ? सत्तेसाठी धर्माची ढाल करायची, बहूजनांची पोरं वापरायची, त्यांना दंगलीत बाद करायचे आणि सत्ता आली की खडसे, तावडे, मुनगंटीवार, मुंडे, दानवे, शेलार या सा-यांना कोलून देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचे. बहूजनांच्या बोकांडी पेशवाई विचार लादायचा हा ब्राम्हण्यवादी कावा बहूजन पोरांच्या लक्षात कधी येणार ? तो लक्षात यायच्या अगोदरच त्यांचे आयुष्य बरबाद होते आहे. म्हणूनच त्याचीच चिंता वाटते. धमकी देणारा मला मारेल पण त्याच्या बरबाद होणा-या आयुष्याचे काय ? त्याच्या आई-बापांनी पाहिलेल्या स्वप्नांचे काय ? धर्माच्या नावाने नासवल्या जाणा-या या पोरांचे काय ?

गेल्या काही वर्षात आर एस एस च्या पिलावळी खुप वाढल्या आहेत. त्यांनी अनेक शाखा उप-शाखा काढल्या आहेत. विविध नावानी पण एकच मुळ असलेल्या या सर्व संघटना समाजात खुप सक्रीय आहेत. आर एस एस नावाचा हजार तोंडाचा राक्षस देशात धार्मिक तेढ वाढवतो आहे. बहूजन समाजातली किशोरवयीन किंवा तरूण पोरं या संघटणांची शिकार होतायत. ज्यांच्या ओठावर अजून मिशी उगवली नाही अशी पोरसवदा मुलं धर्माच्या हाका-यांना भुलतायत. या जातीयवाद्यांच्या कच्छपी लागतायत. ‘धर्मासाठी मरायचं आणि मारायचं !” असे त्यांच्या मनावर बिंबवले जात आहे. असे हजारो तरूण या देशात रोज घडवले जात आहेत. या साठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुळ असलेल्या अनेक संघटना दिवस-रात्र काम करत आहेत. केंद्रातील सत्तेने त्यांना बळ आले आहे. देशात हिंदू राष्ट्र आणण्याचे स्वप्न त्यांना दाखवले जात आहे. हिंदू राष्ट्र म्हणजे आपले राष्ट्र अशी भुरळ त्यांना पाडली जात आहे. या भरकटलेल्या बहूजन पोरांना हिंदू राष्ट्र काय असेल ? कसे असेल ? त्याचे संविधान काय असेल ? त्याचा प्रमुख कोण असेल ? त्याचा राज्य कारभार कसा असेल ? या बाबत प्रश्न पडत नाहीत. हिंदू राष्ट्र म्हणजे तिथे मुस्लिम नसतील, त्यांचे लाड नसतील, त्यांना हाकलले जाईल, त्यांची कत्तल केली जाईल अशा भ्रामक संकल्पनात ते अडकले आहेत. त्या राष्ट्रात रोजगार कसा असेल ? नोकरी असेल का ? कायदा व्यवस्था असेल का ? समानता असेल का ? स्वातंत्र्य असेल का ? अभिव्यक्ती असेल का ? तिथे जात-पात असेल का ? श्रेष्ठ-कनिष्ठ असेल का ? असले प्रश्न अजून त्यांना पडायचे आहेत. पडतील याची शाश्वतीही नाही. ते केवळ द्वेषाच्या विषाने माखले आहेत. त्यांच्या मेंदूत देशाच्या व स्वत:च्या उज्वल भवितव्याचा विचार अजून यायचाय. भाकरीच्या संघर्षाशी अजून त्यांची गाठ पडायची आहे. त्यांच्या मनात धर्मविषयक भ्रामक संकल्पना ठासून भरल्या आहेत. त्यामुळे ते ब्राम्हणवाद्यांच्या कच्छपी लागले आहेत. त्यांच्या भुलथापांना बळी पडून स्व धर्मीयांच्या, स्वदेश बांधवांच्याच जीवावर उठू लागली आहेत.

या देशातल्या जातीयवादी ब्राम्हण्यवाद्यांनी बहूजन समाजातली मुलं वेडी केली आहेत. महाराष्ट्रात तर या वेडाला उधाण आले आहे. पोरांच्या मनात जाती-धर्माचे विष पेरले आहे. संघाच्या स्थापनेपासून म्हणजे १९२५ सालापासून हे काम अविरतपणे सुरू आहे. आज हे द्वेषाचे पिक तरारून उगवले आहे. यात हजारो बहूजन पोरांचे आयुष्य बरबाद होणार आहे. धर्माचे राजकारण करणा-या कुटील लोकांच्या हाती बहूजनांची पोर सापडली आहेत. त्यांच्या कुटील काव्याने या पोरांचे आयुष्य नासले आहे. “पोरं धरा आणि पोरं नासवा !” हा प्रयोग जोमात सुरू आहे. धर्माचे राजकारण करणा-या, धर्मकारणाचा बुरखा पांघरलेल्या, विविध सांप्रदायाचे बुरखे परिधान केलेल्या या विकृत लोकांचे कारस्थान बहूजन समाजाच्या लक्षात यायला तयार नाही. आपली मुलं या कारस्थान्यांच्या कच्छपी लागतायत, तिथे जावून बरबाद होतायत, त्यांचे करियर उध्वस्त होतय याचे भान या पोरांच्या आई-बापांनाही यायला तयार नाही. देशात ऐंशी टक्के हिंदू आहेत तरीपण हिंदू खतरे मे कसा येईल ? हा प्रश्न या पोरांना पडत नाही. देशात सातशे वर्षे मोघलांचे राज्य होते तरीही देशात हिंदूच बहूसंख्यांक राहिला तो कमी झाला नाही, त्याची लोकसंख्या घटली नाही किंवा दहा-बारा पोरं जन्माला घालणा-या मुसलमानांचीही संख्या हिंदूपेक्षा जास्त वाढली नाही. हे सगळ कसं या पोरांच्या लक्षात येत नाही ? ज्या पाकिस्तानची भिती घालून देशात निवडणूकीचे राजकारण केले जाते त्या पाकिस्तानात नियोजीत नसतानाही अचानक जावून नवाज शरिफ यांच्या वाढदिवसाचा केक नरेंद्र मोदी खावून येतात, शरिफांना तिथे मिठ्या मारतात, काश्मिरात पाक धार्जिण्या मेहबुबा मुप्ती यांच्यासोबत युती करून सत्तेत येतात, लालकृष्ण अडवाणी बॅरिष्टर जीनाच्या समाधीवर माथा टेकतात, मुरली मनोहर जोशी मुस्लीम मुलाशी मुलीचे लग्न लावतात, अडवाणींची लेक मुस्लीम मुलाशी लग्न करते, सुब्रम्हण्यम स्वामीची लेक मुस्लीम मुलाशी लग्न करते आणि भाजप सरकार या मुस्लिम जावयांना केंद्रात मंत्रीपद देते हे या पोरांच्या लक्षात कसे येत नाही ? परवा संभाजी भिडेंनी या देशाला इस्लामचा खतरा आहे म्हणून सांगितले. खरच असं असेल, देशाला इस्लाचा खतरा असेव तर संभाजी भिडेंनी आजवर किती मुसलमानांचे मुडदे पाडले ? किती मुसलमानांना मारले ? एखाद्या मुसलमानास त्यांच्या समोर साधी शिवी तर का दिली नाही ? एखादा दगड तरी भिरकावून का मारला नाही ?

त्यांनी आजवर हजारो पोरांच्या मोहिमा काढल्या, त्यातली एखादी मोहिम मुस्लिम मोहल्यात घुसवून पाच-पन्नास तरी मुस्लिम का तोडले नाहीत ? धर्मासाठी त्यांनी हाती शस्त्र का घेतले नाही ? देशाला इस्लामचा धोका आहे तर तो नष्ट करण्यासाठीची कणभर कृती त्यांनी स्वत: का केली नाही ? महाराष्ट्रातील ब्राम्हण समाजातील पोरं धर्मासाठी मुसलमानांशी का भिडत नाहीत ? मुसलमानांचे मुडदे का पाडत नाहीत ? सनातनचे प्रमुख असलेल्या आठवलेंचा मुलगा डॉक्टर आहे, तो अमेरिकेत प्रॅक्टीस करतो. मोहन भागवतांच्या पै-पाहूण्यांची पोरं व इतर सर्व भाजप नेत्यांची पोरं हाती शस्त्र घेवून मुस्लिम मोहल्यात का घुसत नाहीत ? किमान चार-दोन मुसलमानांना का कापत नाहीत ? ते सर्व चांगले शिक्षण घेतायत, मोठ्या हुद्यावर जातायत, आमदार-खासदार होतायत. त्यांना का धर्मासाठी मरू दिले जात नाही ? सुषमा स्वराज यांची मुलगी वकील आहे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात, त्यांची मुलगी चांगले शिक्षण घेतेय, चंदू पाटील मंत्री होतात, रझा अकादमीच्या कार्यालयात जावून मांडीला मांडी लावून बसणारे आशिष शेलार आमदार होतात. केशव उपाध्ये, भातखळकर, सुधीर गाडगीळ आदी मंडळी ज्यांनी कधीही एखाद्या मुसलमानास शिवीही दिली नाही अशी माणस आमदार होतात. ही लोकं स्वत: का धर्मासाठी मारायला व मरायला पुढे येत नाहीत ? सत्तेच्या खेळासाठी बहूजन समाजाच्या पिढ्या नासवण्याचे काम किती दिवस चालणार ? हे लोकांच्या आणि बरबाद होणा-या पोरांच्या लक्षात कधी येणार ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here