



✒️आष्टी प्रतिनिधी(सौ. सरस्वती लाड)
आष्टी(दि 15मार्च):-दिनांक ८ मार्च २०२२ दुपारी १ वाजता अभ्यासिकेत जेवत असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेत स्थळावर पोलिस उपनिरिक्षक (PSI) परीक्षा २०१९ ची मेरीट लिस्ट जाहीर झाली….५१ व्या रँंक ने मी पास झालो होतो.. क्षणार्धात २०१६ पासून आजतागायतचा संघर्ष डोळ्यासमोर उभा राहिला. माझं गाव सांगवी (पाटण) ता.आष्टी जि.बीड.बीड जिल्ह्यातील माझं हे छोटसं तीन हजार लोकवस्ती असलेलं टुमदार गाव.. जिल्हा परिषदेच्या शाळेत माझं प्राथमिक शिक्षण (पहिली ते सातवी) झाल. आठवी ते दहावी पर्यंतच माझं शिक्षण सुदर्शन विद्यालय सांगवी पाटण येथे झाल. आम्ही चार भावंडं दोघे भाऊ आणि दोन बहिणी वडील शेतकरी आजोबा स्वातंत्र्य सैनिक. त्यामुळे आमच्यावर संस्कारही कडक शिस्तीत झाले. मी आठवीत असतानाच मोठा भाऊ महाराष्ट्र पोलीस दलात रूजू झाला. त्यामुळे घरात आपसूकच पोलीस दला बद्दल मनात आपुलकीची भावना निर्माण झाली.
मला लहानपणापासून च पोलिस अधिकारी व्हायची खूप इच्छा होती. तेव्हाच मी ठरवले होते की जायचं तर पोलीस दलातच तेही अधिकारी बनून. दहावीत असताना ७६ . ७६ टक्के गुण मिळवून गावात तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालो. नंतर बारावीपर्यंत शिक्षण विज्ञान शाखेतून श्रीराम ज्युनिअर कॉलेज, कडा ता. आष्टी, जिल्हा बीड मधून घेतले. पदवीचं शिक्षण मी बीएस्ससी (मायक्रोबायलाँजी) या शाखेत महात्मा फुले कॉलेज, पिंपरी चिंचवड येथून पूर्ण केले. पदवीच शिक्षण घेत असतानाच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचं ठरवल होत. पण पदवीचा अभ्यासक्रम आणि स्पर्धा परीक्षा यांचं योग्य संतुलन जमत नव्हत. प्रथम श्रेणी मिळवून मी माझी पदवी पूर्ण केली आणि २०१४ – २०१५ ला मी माझी पदवी पूर्ण करून मी २०१६ पासून एच. व्ही. देसाई अभ्यासिका, पुणे जॉईन करून अभ्यास सुरू केला. पहिल्याच प्रयत्नात पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा, राज्य कर निरीक्षक, मंत्रालय कक्ष अधिकारी पूर्व परीक्षा इ. पूर्व परीक्षा पार केली पण थोडा अनुभव कमी पडला व थोड्या गुणांनी अंतिम निवड होऊ शकली नाही.
मग पुन्हा एकदा शून्यातून सुरुवात झाली. २०१७ ला पोलीस उपनिरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, कर सहायक या परीक्षा पुन्हा उत्तीर्ण झालो. मग पोलिस उपनिरिक्षक मुख्य परीक्षाही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो पण मैदानी चाचणीमध्ये ९१ गुण आणि मुलाखत मधे २० गुण मिळाले आणि ४ गुणांनी अंतीम यादीतून बाहेर पडलो. तिकडे इक्साईज ची परीक्षा पण १२ मार्क्स ने नापास झालो.पोलिस उपनिरीक्षक च्या अंतिम निवड यादीतून बाहेर पडलो तो दिवस होता ८ मार्च २०१९ चा..आणि दुर्दैवाने मी पुढची २०१८ ची एकही परीक्षा पास झालो नव्हतो. खूप वाईट वाटत होत, खूप लांबचा प्रवास आता करावा लागणार होता. दरम्यान मला माझ्या घरच्यांनी आणि माझ्या मोठ्या भावाने खूप आधार दिला. माझा दिल्ली वरून पुण्यात यूपीएससी च्या तयारीला आलेला भाऊ रवींद्र दिनकर भोसले त्यांनी पण मला खूप आधार दिला. माझ्यासाठी आदर्श माझे आई आणि वडील हेच आहेत. त्यांनी मला खूप आधार दिला आहे. माझ्या अभ्यासामुळे त्यांच्या अडचणी मला कधीच नाही सांगितल्या. ८ मार्च २०१९ ला मी नापास झालो होतो..आणि २३ मार्च २०१९ ला पीएसआय च्या ४९६ पदांच्या जागेसाठी पूर्व परीक्षा होणार होती.
माझ्याकडे १४ दिवस पूर्व परीक्षेसाठी होते. कसाबसा मनाला सांभाळत अभ्यास केला. पूर्व परीक्षा पास झालो. मुख्य परीक्षेचा पेपर भाग – १ हा भाषा विषयाचा असतो जो राज्यसेवेला आणि पीएसआय मुख्य दोन्ही परीक्षांना सारखाच घटक होता. ज्याचा अभ्यास मी आणि माझ्या भावाने बरोबर केला. य वेळेस मला कसलीच कसर ठेवायची नव्हती अभ्यास पण तसाच केला. भाषा विषयात मला ७७ गुण मिळाले आणि मुख्य परीक्षेचा माझा स्कोअर १३२ आला. पण लवकर च शारीरिक परीक्षा आणि मुलाखत होईल अशी आशा होती पण संयमाची मोठी परीक्षा बघावी लागणार हे मला माहिती नव्हत. मधेच कोरोना आला त्यांनतर झालेलं लॉकडाऊन..सगळ्यांसाठीच हा काळ खूप अटीतटीचा होता..सगळच सकारात्मक झाल. या दरम्यान मी नगरला ८ महिने अभ्यास केला.लॉकडाऊन थोड सैल झाल्यावर परत अभ्यास आणि शारीरिक परीक्षा च्या तयारी साठी पुण्याला आलो. ४ ऑगस्ट २०१९ ला मुख्य परीक्षेचा दुसरा पेपर झाला होता आणि मुलाखत वेळापत्रक २३ नोव्हेंबर २०२१ पासून सुरू झालं. म्हणजे तब्बल २ वर्ष ४ महिन्यांनंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ग्राउंड आणि मुलाखत घेण्यास सुरुवात केली. दरम्यान च्या काळात रोज उठून ग्राऊंड ची तयारी आणि त्या समांतर इतर परिक्षेंचा अभ्यास ह्याचा मेळ बसत नव्हता.
कारण ग्राउंड ला जास्तीत जास्त वेळ जायचा आणि आयोगाचा काहीच फीडबँक नव्हता शारीरिक आणि मानसिक दोन्ही त्रासातून मला जावे लागले. युपीएससी ची तयारी करतोय म्हटल्यावर ह्या गोष्टी मधून जावं च लागत अस ऐकल होत. ते प्रत्यक्षात अनुभवा लागलं. रोज कधी यातून मुक्त होतोय अस वाटायचं. राज्यसेवा व सगळ्याच परीक्षा कोरोनामुळे बऱ्याच वेळा पुढे ढकलल्या गेल्या होत्या. कधी मुलाखत होईल याची काही कल्पना करता येत नव्हती. माझ्या आयुष्यातला संयम म्हणतात तो हाच..ह्याची खूप मोठी परिक्षा मला पहावी लागली होती. घरून मला माझ्या आई वडिलांचा कधीच दबाव नव्हता नव्हता. तुला जे पटतय तेच कर हेच त्यांचं नेहमी असायचं. त्यांनी मला नेहमी एक सकारात्मक दिशा दिलेली आहे. शेवटी माझी शारीरिक परीक्षा आणि मुलाखत ९ फेब्रुवारी २०२२ ला औरंगाबाद येथे झाली आणि १०० पैकी १०० गुण घेवून पास झालो. एवढ्या वर्षाच्या मेहनतीच चीज झाल. त्यानंतर मुलाखत पण मी छान दिली. मुलाखतीला २३ मार्क्स मिळाले. अशी एकूण २५३ बेरीज होऊन मी राज्यात ५१ व्या रँंक ने पास झालो. ज्या दिवशी मेरीट लिस्ट जाहीर झाली तो दिवस होता ८ मार्च २०२२ ठीक १ वाजता लिस्टमध्ये ५१ व्या नंबर ला नाव दिसल. शून्यातून खूप कष्टाने परत सगळ केलं होत. मेरीट लिस्ट पाहिल्यानंतर डोळ्यातून पाणी आल. कारण याच दिवशी ३ वर्षापूर्वी नापास झालो होतो आणि आज ह्याच दिवशी मी पास झालो. चेहऱ्यावर तेज आले ते कष्टाने मिळवलेल्या विजयाचे..आयुष्यात योग्य मार्गाने मेहनत आणि त्या मेहनती मधे सातत्य ह्या गोष्टी माणसाला यशस्वीच बनवतात.
विकास सोनाजीराव भोसले
(पोलिस उपनिरीक्षक)


