Home बीड घामाचे मोती! हमाली करणारा ज्ञानेश्वर बनला फौजदार; गावकऱ्यांनी घोड्यावर बसवून काढली मिरवणूक

घामाचे मोती! हमाली करणारा ज्ञानेश्वर बनला फौजदार; गावकऱ्यांनी घोड्यावर बसवून काढली मिरवणूक

60

🔹खाकी वर्दी अंगावर असावी, हे सुरुवातीपासूनच स्वप्न होते. आज माझे स्वप्न पूर्ण होतेय. आई-वडील, नातेवाईक आणि विशेष म्हणजे मित्रांनी केलेल्या सहकार्यामुळेच मी ‘स्टार’ झालो.- ज्ञानेश्वर देवकते

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.11मार्च):-घरी केवळ साडेतीन एकर जमीन. आई-वडील, भाऊ, बहीण असा परिवार. आई-वडील अडाणी. मजुरी करून उदरनिर्वाह भागवतात. अशा परिस्थितीत आई-वडिलांच्या सोबत दुसऱ्याच्या शेतात मजुरी केली. कृषी केंद्रावर खताचे पोते उचलत हमाली करून शिक्षण पूर्ण केले. परिस्थितीचा सामना करून जिद्द आणि चिकाटीच्या बळावर घामाचे मोती करत बीड तालुक्यातील शिदोड येथील ज्ञानेश्वर देवकते पोलीस उपनिरीक्षक बनला आहे. हे समजताच ग्रामस्थांनी ज्ञानेश्वरची घोड्यावर बसवून गावभर वाजतगाजत मिरवणूक काढली.

ज्ञानेश्वरचे दहावीपर्यंतचे शिक्षण गावातच झाले, तर पदवीपर्यंतचे शिक्षण बलभीम महाविद्यालयात झाले. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने ज्ञानेश्वरने एका कृषी दुकानावर काम केले. दुसऱ्याच्या शेतात मिळेल ते काम करून मजुरी केली. त्यातून मिळालेल्या पैशातूनच त्याने शिक्षण पूर्ण केले. दिवसरात्र अभ्यास करून त्याने आई-वडिलांच्या कष्टाचे चीज केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्याने २४८ गुण मिळवले. तो आता फौजदार होणार असल्याने कुटुंबासह ग्रामस्थांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत अभ्यास
ज्ञानेश्वर २०१८ पासून दररोज सकाळी १० ला बीडला आल्यावर रात्री ९ वाजताच परत गावी जायचा. दिवसभर अभ्यासिकेत बसायचा. रात्री घरी गेल्यावर आणि सकाळी उठल्यावरही हाती पुस्तक असायचे. शारीरिक चाचणीसाठीही सकाळी आणि सायंकाळी अशा दोन वेळा तो सराव करत असे.

दोन गुणांनी हुकली होती संधी अभ्यासात हुशार असणारा ज्ञानेश्वर शारीरिक चाचणीत थोडा कमी पडला होता. धावण्यात मायक्रो ७५ सेकंद कमी पडल्याने त्याचे सहा गुण कमी आले. याचा परिणाम मुख्य गुणांवर झाला. गुणांकनामध्ये त्याला अवघे दोन गुण कमी पडल्याने त्याचे यापूर्वी एकदा फौजदार होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले होते. यातून धडा घेत त्याने धावण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले. तेव्हापासून यशासाठी धावलेला ज्ञानेश्वर पीएसआय बनूनच थांबला.

खाकी वर्दी अंगावर असावी, हे सुरुवातीपासूनच स्वप्न होते. आज माझे स्वप्न पूर्ण होतेय. आई-वडील, नातेवाईक आणि विशेष म्हणजे मित्रांनी केलेल्या सहकार्यामुळेच मी ‘स्टार’ झालो.
– ज्ञानेश्वर देवकते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here