Home महाराष्ट्र कोलाम बांधवांनी बांधला श्रमदानातून बंधारा

कोलाम बांधवांनी बांधला श्रमदानातून बंधारा

46

🔸जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अनोखा उपक्रम

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(ता.१०मार्च):- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन माणिकगड पहाडावरील अती दुर्गम रायपूर व खडकी कोलामगुड्यातील महिला व युवकांनी खोल दरीत वाहणाऱ्या नाल्यात श्रमदानातून बंधारा बांधून नवा आदर्श निर्माण केला आहे. बारमाही वाहणाऱ्या नाल्याचे पाणी अडवून दुष्काळ समस्येवर मात करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने कोलामांनी केलेला आहे.जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम बुधवारी (ता.९) रायपूर येथे समाज भवनात आयोजित करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना कोलाम विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास कुंभारे यांनी सांगितले की, माणिकगड पहाडावरील कोलामगुडे सातत्याने उपेक्षेचे केंद्र ठरलेले आहे. आदिम कोलामांसाठी मंजूर झालेल्या घरकुल, शौचालय, विहीर बांधकामात संगनमताने कोलामांना लुटल्याचे समोर आले आहे. याबाबत वेळोवेळी तक्रार करूनही कोलामांना अद्याप न्याय मिळालेला नाही. कोलामांच्या अज्ञानाचा व भित्रेपणाचा गैरफायदा घेऊन त्यांना अनेक योजना पासून वंचित ठेवले जात आहे. कोलामांना अकार्यक्षम ठरवून त्यांना त्यांच्या हक्काच्या रोजगार हमी योजनेतील कामांपासून वंचित ठेवले जात आहे. हे पाप खपवून घेतले जाणार नाही.

शेतीचे कामे संपल्यानंतर जिवती तालुक्यातील अनेक कोलामगुडे रोजगाराच्या शोधात स्थलांतरित होतात. तेलंगणा, आन्ध्रप्रदेश याठिकाणी कोलाम रोजगारासाठी भटकत असतानाही माणिकगड पहाडावर रोजगार हमी योजनेची कामे कोलामांना दिली जात नाहीत. त्यांना रोजंदारीच्या कामात उत्साह नसल्याचा बनाव करून जिवती तालुक्यातील नोकरशाही इच्छूक कोलामांना जाणिवपूर्वक रोजगारापासून वंचित ठेवत आहे. यावर रायपूर, खडकी येथील कोलामांनी वस्ती लगतच्या नाल्यात श्रमदानाने बंधारा बांधून यंत्रणेच्या डोळ्यावरील पट्टी हटविण्याचा प्रयत्न केलेला आहे.
रायपूर लगतच्या खोल दरीत वाहणाऱ्या नाल्यावर बंधारा बांधून कोलामांनी आपली रोजगार क्षमता सिद्ध केलेली आहे. सोबतच दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आगाऊ तयारी करून कोलाम समुदायांनी आपल्या कल्पकतेचा परिचय दिला आहे.

कोलाम विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास कुंभारे यांचे मार्गदर्शनाखाली ग्राम विकास समिती रायपूर शाखेचे अध्यक्ष नामदेव कोडापे व खडकी शाखेचे अध्यक्ष भिमराव कोडापे यांचे नेतृत्वात ग्रामस्थांनी एकजुटीने बंधारा बांधला. यावेळी व्यासपिठावर गाव पाटील बाजीराव कोडापे, आंगणवाडी शिक्षिका मनकरणा केंद्रे व मीना पडवेकर, लेतू कोडापे, सुनिता कुंभारे, नामदेव कोडापे आदि मान्यवर उपस्थित होते. संचालन व आभार देवू सिडाम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता बारीकराव कोडापे, भिमा कुमरे, संघर्ष पडवेकर, अयु कुमरे, रामा सिडाम, अयु सिडाम, जैतु सिडाम, झाडु मडावी, उत्तम मडावी, सुंदरी सिडाम, रामबाई कोडापे, राधिका कोडापे, मुत्ताबाई मडावी, सुपाबाई सिडाम, लच्चू कोडापे,लेतू सिडाम, तुकाराम कुमरे व अन्य गावकऱ्यांनी परिश्रम घेतले.

Previous articleसह्याद्री-देवराई वनविभागात महिनाभरात दुस-यांदा आग; वनविभागीय आधिका-यांना घटनेचे गांभीर्य नाही ,प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालय नागपुर यांना तक्रार
Next articleसंभाजी ब्रिगेड तर्फे रावसाहेब दानवे यांचा निषेध

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here