Home महाराष्ट्र सावित्रीआई-ज्योतिबांबद्दल हेसुद्धा सांगा…

सावित्रीआई-ज्योतिबांबद्दल हेसुद्धा सांगा…

200

14 फेब्रुवारीला पुण्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुतळा अनावरण समारंभात भाषण करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सावित्रीबाई आणि ज्योतिबांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं . क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं लग्न 10 व्या वर्षी झालं होतं. तेव्हा त्यांच्या पतीचं वय 13 वर्ष होतं. त्यामुळे कल्पना करा की, इतक्या लहान वयात एक मुलगा आणि मुलगी लग्नानंतर काय विचार करत असतील? असं म्हणत राज्यपाल कुत्सितपणे हसले होते. ज्या दाम्पत्याने संपूर्ण आयुष्य समाजासाठी खर्ची घातले त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी राज्यपालांकडे याशिवाय काहीच नव्हत?

फक्त भगतसिंग कोशियारी या व्यक्तीने हे वक्तव्य केले असते तर ते समजू शकले असते कारण तर ज्या संघटनेतून येतात त्या संघटनेला स्वतः च्या कार्यकर्तृत्वाचा इतिहास नसल्याने ते समाजातील इतर महापुरुषांचा इतिहाससुद्धा विकृत करून ठेवण्याचा अधून मधून प्रयत्न करत असतात. परंतु इथे राज्यपाल या पदावरून असे वक्तव्य करणे हे अतिशय निषेधार्ह आहे. हेच वक्तव्य दुसऱ्या पक्ष-संघटनेतील एखाद्या व्यक्तीने केले असते तर? हे लोक असेच बोलत राहतील परंतु दुःख या गोष्टीचे आहे की महात्मा फुले आणि सावित्रीआई फुले यांच्या नावावर चालणाऱ्या संघटना, पोट भरणारे नेते मात्र ह्या अपमानास्पद वक्तव्यानंतर सुद्धा गप्प आहेत. तुरळक ठिकाणचा निषेध वगळता कुणासही ह्या गोष्टी आक्षेपार्ह वाटत नाहीत. त्यावर व्यक्त व्हावेसे वाटत नाही हे आश्चर्य आहे आणि संतापजनकही. फुले दाम्पत्याने आपल्यावर केलेले उपकार आपण विसरलोय हेच या प्रकरणातून सिद्ध झाले आहे.

राज्यपालांना ११ वर्षांच्या सावित्री आणि १३ वर्षांचे ज्योतिबा दिसले. परंतु जे काही दिसायला पाहिजे होते ते दिसले नाही. पूर्वी लग्न फार कमी वयात करून टाकत असत. एका प्रकरणात एका फूलमणी नावाच्या ११ वर्षाच्या मुलीचे लग्न ३५ वर्षीय व्यक्तीसोबत लावून देण्यात आले. त्या ११ वर्षीय फुलमणी च्या ३५ वर्षीय पतीने तिच्याशी जबरदस्तीने संभोग केल्यामुळे तिचा मृत्यू झाला. त्याकाळात अशा अनेक घटना घडत होत्या ज्यात अल्पवयीन मुलींशी लैंगिक संबंध ठेवल्याने त्या अपंग झाल्या. विवाह आणि संमतीने लैंगिक संबंध यासाठीचे वय वाढविण्याची मागणी भारतातील समाजसुधारकांकडून करण्यात येत होती. म्हणूनच ब्रिटिश सरकारने १८९१ साली एक कायदा “एज ऑफ कॉन्सेन्ट ॲक्ट १८९१” तयार केला. ज्यानुसार १२ वर्षापेक्षा कमी वयाच्या विवाहित किंवा अविवाहित मुलीशी लैंगिक संबंध ठेवणे हे बलात्काराच्या कक्षेत येईल. काँग्रेसमधील बहुतांश सुधारवादी लोकांचे या विधेयकाला समर्थन होते, परंतु टिळकांनी या प्रकरणात ब्रिटीश सरकारच्या हस्तक्षेपाला विरोध केला. ते म्हणाले – “हा सरकारचा कायदा योग्य आणि उपयुक्त असू शकेल, परंतु तरीही सरकारने आमच्या सामाजिक परंपरा आणि जीवनशैलीत हस्तक्षेप करावा अशी आमची इच्छा नाही.

” ११ वर्षाच्या मुलींसोबत पस्तिशीतील माणसांनी काहीही करावे ह्याला टिळकांच्या असलेल्या समर्थनाबद्दल राज्यपालांचे काय मत आहे? हेसुद्धा त्यांनी सांगावे.महादेव गोविंद रानडे म्हणजेच न्यायमूर्ती रानडे आणि ज्योतिबा फुले हे दोघे मित्र. न्या. रानडे स्वतः ला थोर समाज सुधारक म्हणत असत. त्यांचे वक्तव्य सुद्धा तसेच असत. एकदा न्या. रानडे ज्योतीबांना म्हणाले, “माझी बहीण विधवा म्हणून परत आली आहे.” त्यावर ज्योतिबा म्हणाले “महादेवराव, ही तर सुधारणेची फार मोठी संधी चालून आली आहे. तुम्ही बहिणीचा पुनर्विवाह करून द्या.” तेव्हा रानडे म्हणाले , “मी जर बहिणीचा पुन्हा विवाह लावून दिला तर माझे वडील नाराज होतील.” असे म्हणून त्यांनी स्वतः च्या बहिणीचा पुनर्विवाह टाळला. न्या. रानडे यांची पत्नी वारल्या नंतर त्यांनी वयाच्या ३२ व्या वर्षी ११ वर्षाच्या मुलीशी पुनर्विवाह केला. ही घटना राज्यपालांना माहिती नसावी, नाहीतर ३२ वर्षाच्या पुरुषाचे ११ वर्षाच्या चिमुकलीशी लग्न झाल्यानंतर ते दोघे काय करत असतील? असा विचार करायला नवीन विषय राज्यपालांना मिळाला असता. कुणाही बद्दल असा विकृत विचार करायलासुद्धा आपल्याला लाज वाटते परंतु हे लोक शेवटी काहीच मार्ग शिल्लक ठेवत नाहीत.

महात्मा फुले न्या. रानडेंसारखे फक्त उपदेश करणारे नव्हते तर प्रत्यक्षात कृती करणारे होते. राज्यपाल ज्या परंपरेतून येतात त्यातून या अगोदर सुद्धा ज्योतीबांचा अपमान करण्याचा प्रयत्न झाला आहे. ज्योतीबांना तुम्ही नावे ठेवू शकता, त्यांची खोटी बदनामी करू शकता परंतु ज्योतिबांसारखं निस्वार्थ आणि निस्पृहपणे काम कधीच कुणी करू शकलं नाही हे तुम्हाला मान्य करावेच लागेल. विधवा विवाह बंदी, शिक्षणबंदी, विधवा केशवपन, पादत्राणे बंदी अशा अनेक गुलामीच्या साखळ्यांमध्ये स्त्री अडकलेली होती. ब्राम्हण जातीत पुनर्विवाह बंदी म्हणून विधवा झालेल्या स्त्री ने केशवपन करावे अशी प्रथा होती ती प्रथा मोडण्यासाठी ज्योतिबांनी न्हाव्यांचा संप घडवून आणला. ज्योतीबांनी विधवा विवाह चळवळ सुरू केली. हे राज्यपाल सांगत नाहीत. ब्राम्हण जातीतील बाल-तरुणवयात विधवा झालेल्या स्त्रियांकडून तारुण्यसुलभ चुका घडत असल्यामुळे गर्भपात, बालहत्या, आत्महत्या होत होत्या. अशा महिलांसाठी महात्मा फुलेंनी १८६३ मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. तिथे अशा चुका झालेल्या स्त्रिया गुपचूप आपले बाळंतपण (डिलिव्हरी) आटोपून स्वतः ची व घराण्याची इज्जत वाचवत होत्या व बदनामी टाळत होत्या. हे आता ऐकण्यास जरी सहज वाटत असले तरी आताही अशी हिम्मत कुणी करणे कठीण आहे जी ज्योतिबांनी दीडशे वर्षांपूर्वी केली. आपल्याच जातीत जन्मलेल्या स्त्रियांच्या ह्या अडचणी ब्राम्हण समाजातील कुण्याचं समाजसुधारकास दिसल्या नाहीत अथवा दिसल्यावरही त्यावर प्रत्यक्ष कृती कुणीही केलेली दिसत नाही. याबद्दल राज्यपाल चकार शब्द काढत नाहीत.

सावित्रीमाई आणि महात्मा फुलेंना कायमच ब्राम्हण जातीच्या विरोधात शत्रू म्हणून उभे केले जाते परंतु राज्यपाल याविषयीचा खरा इतिहास समाजासमोर मांडत नाहीत. महात्मा फुलेंनी कधीच कोणत्या जातीचा द्वेष केला नाही. कोणत्याच जातीच्या विरोधात कार्य केले नाही. बाळ गंगाधर टिळक, गो.ग. आगरकर व विष्णुशास्त्री चिपळूणकर ह्या तिघांनी मिळून जानेवारी 1881 मध्ये ’केसरी’ नावाचे मराठी व ’मराठा’नावाचे इंग्रजी असे दोन साप्ताहिक सुरू केले. केसरीचे संपादक आगरकर व मराठाचे संपादक टिळक होते. त्यावेळी कोल्हापूरच्या गादीवर दत्तकपुत्र शिवाजीराव विराजमान होते. ह्या शिवाजीरावांना कोल्हापूर च्या गादिवरून काढून टाकण्यासाठी तिथले दिवाण माधवराव बर्वे हे कारस्थानं करीत आहेत अशा आशयाचे लेख केसरी व मराठा या सप्ताहिकांमध्ये प्रसिद्ध झाल्यामुळे बर्वे यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. यावेळी टिळकांचे अनेक चाहते-समर्थक-मित्र असतांना सुद्धा या खटल्यात टिळकांची जमानत घेण्यास कुणीही तयार नव्हते. अशावेळी ज्योतिरावांच्या सांगण्यावरून त्यांचे मित्र रामशेठ उरवणे ह्यांनी टिळकांची जमानत घेतली. याच खटल्यात जेव्हा टिळक-आगरकरांना 4 महिन्यांची शिक्षा झाली आणि 26 डिसेंम्बर 1882 रोजी मुंबई च्या डोंगरी कारागृहातून त्यांची सुटका झाली तेव्हा पुणे येथे ज्योतिबांनी टिळक-आगरकरांचा जाहीर सत्कार घेतला.

विष्णुशास्त्री चिपळूणकर हे शेवटपर्यंत ज्योतिबांचे अत्यंत कडवे विरोधक. चिपळूणकरांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या अंत्ययात्रेला परवानगी मिळत नव्हती. त्यावेळी ज्योतिरावांच्या सांगण्यावरून डॉ.घोले यांनी चिपळूनकरांच्या मृत्यूबद्दल साक्ष दिली आणि चिपळूनकरांचे डॉक्टर मित्रसुद्धा मृत्यूचा दाखला देण्यास तयार नसतांना फरासखाण्यात स्वहस्ताक्षरात चिपळूनकरांच्या मृत्यूचा दाखला देऊन ब्रिटिश आणि फरासण्याकडून त्यांच्या अंत्यविधीला परवानगी मिळवून देणारे महात्मा ज्योतिबा फुले हे ब्राम्हणद्वेषी कसे असू शकतात? ब्रह्मणांसह कुठल्याच जातीतील स्त्रीला शिक्षणाचा अधिकार नव्हता परावलंबित्व, अंधश्रद्धा, वाईट रूढी-परंपरा हे तेव्हाच्या स्त्रियांचे मुख्य प्रश्न आहेत हे ओळखून आणि आई शिकली तर संपूर्ण कुटुंब शिक्षित होते हे जाणून सर्वच जातीधर्मातील स्त्रियांसाठी शाळा काढणारे, त्यात ब्राम्हण स्त्रियांनाही शिक्षण देणारे, सर्वच जाती धर्मातील स्त्रियांच्या सक्तीच्या प्राथमिक शिक्षणावर भर देणारे ज्योतिबा- सावित्रीमाई ब्राम्हण द्वेषी की दुरदर्शी? पण राज्यपाल महोदयांना ह्यांच्या वयात लग्न झाल्यानंतर काय करत असतील याची काळजी अधिक.

ज्योतिबा आणि सावित्रीआई बद्दल बोलतांना राज्यपालांनी प्रकर्षाने सांगायला पाहिजे होते की, ह्या फुले दाम्पत्याने ब्राम्हण विधवा असलेल्या काशीबाई यांच्या मुलाला दत्तक घेतले (जेव्हाकी त्यावेळी इतरही अनेक जातीचे मुलं भेटले असते) त्याच्या नावे आपली सगळी चल-अचल संपत्ती करून त्याला चांगले शिक्षण देऊन डॉक्टर बनवले. ज्यांनी सावित्रीमाईंच्या अंगावर शेण-दगड फेकले त्याच जातीच्या मुलाला दत्तक घेऊन ह्या दाम्पत्याने कुणाचाही द्वेष करत नसल्याचे सिद्ध केले. ह्या सावित्रीमाई आणि ज्योतिबा लोंकांपर्यंत ह्यांना पोहोचूच द्यायचे नाहीत. महात्मा फुले म्हणजे एक सामाजिक परिवर्तनकारी, शिक्षक, नगरपालिका सदस्य, उद्योगपती, शैक्षणिक तज्ञ, शेतकरी अभ्यासक, कामगार नेते, संघटक, कवी- लेखक असे त्यांनी ज्या ज्या क्षेत्रात कार्य केले ते सर्वोत्तमच केले. त्यांनी जेही कार्य केले ते संपूर्ण समाजासाठी केले. कार्य करतांना कधीच कुणाची जात-धर्म बघितला नाही. त्यांनी कायम कोण वाईट हे न सांगता समाजाला काय वाईट हे सांगितले. द्वेषाचे निर्मूलन द्वेषाने होत नसते हे त्यांनी ओळखले होते. ब्राम्हण समाजाने तुमच्यावर अत्याचार केले म्हणून तुम्ही त्यांच्यावर अत्याचार करा असे ते कधीच बोलले नाहीत. उलट जर सामाजिक धार्मिक सांस्कृतिक समानता येणार असेल तर पिढ्यानपिढ्या झालेले अत्याचार आम्ही विसरायला तयार आहोत ही भूमिका घेणारे ज्योतिराव अतुलनीय उंचीचे महात्मा होते. ह्या अशा माहात्म्याबद्दल आक्षेपार्ह बोलतांना संवैधानिक पदावरील व्यक्तीला व ते ऐकतांना माझ्यासारख्या प्रत्येकाला लाज वाटली पाहिजे.महात्मा फुले व सावित्रीआई फुलेंबद्दल इतक्या सगळ्या प्रेरणादायी गोष्टी सांगण्यासारख्या असतांना अतिशय विकृतपणे ह्या महापुरुषांची बदनामी करण्यामागील डाव आपण ओळखला पाहिजे. ह्यांची रेष मोठी होऊ शकत नाही म्हणून हे आपली रेष खोडून कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यांच्याबद्दल जे सांगायचं ते न सांगता महान उंचीच्या महापुरुषांबद्दल अत्यंत योजनापूर्वक अशी वक्तव्ये करून त्यातून विकृत आनंद मिळविणाऱ्या ह्या जमातीला सत्य समोर आणत चोख प्रत्युत्तर मिळायलाच पाहिजे.

✒️चंद्रकांत झटाले(अकोला)मो:-९८२२९९२६६६

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here