



✒️रोशन मदनकर(उप संपादक)
गडचिरोली(दि.८मार्च):- ध्यानी मनी नसताना आजी अहिल्यामाई गुरनूले या सहजच गडचिरोली येथे नातवाकडे आल्या. नातू दुर्वांकूर निकोडे यांनी पावन आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या औचित्याने भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला.आज संपूर्ण जगभरात महिला दिन उत्साहात साजरा होत आहे, याची पुसटशीही कल्पना अहिल्यामाई तुळशिराम गुरनूले यांना नव्हती. मागील वर्षी कोरोना काळात गडचिरोली येथील त्यांची मुलगी मरण पावली. जावई व नातू अर्थात बापलेक यांची काळजी घेण्याच्या हेतूने त्या नेहमी ८-१५ दिवसांनी इकडे येत असतात. येथे येऊन त्या दोन दिवस राहतात व मळलेले कपडे-लत्ते, अंथरूण-पांघरूण, भांडी-कुंडी आदी स्वच्छ करून जातात.
आजी आपली छोटीमोठी, बारीकसारीक कामे करण्यासाठी व आपली काळजी घेण्यासाठी नेहमी येत असते, याची जाणीव दुर्वांकूर कृष्णकुमार निकोडे यांना होती. त्यांनी आजीसाठी छानशी भेटवस्तू खरेदी करून ठेवली होती. आज पावन जागतिक महिला दिनाच्या औचित्याने अचानक तो योग जुळून आला. त्यांनी पुष्पगुच्छ व ती भेटवस्तू आजी अहिल्यामाईंना देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला.सत्काराच्या वेळी वडील कृष्णकुमार निकोडे, आजोबा तुळशिराम गुरनूले आदी उपस्थित होते. यावेळी आई मॄतक आशाताई कृष्णकुमार निकोडे यांच्या आठवणीने संपूर्ण वातावरण भावूक झाले होते, हे विशेष!





