Home बीड वाळू माफियांवर कारवाई केली तर तुम्ही फोन करू नका – गृहमंत्री दिलीप...

वाळू माफियांवर कारवाई केली तर तुम्ही फोन करू नका – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

91

🔺पोलीस निरीक्षक निलंबित

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.8मार्च):-राज्यात वाळू माफियांचा प्रश्न गंभीर होत आहे. वाळू माफियांच्या विरोधात कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या जातील. संबंधितांच्या विरोधात कडक कारवाई होईलच, अशी ग्वाही देताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी विधानसभेत पण वाळू माफियांवर कारवाई केली तर तुम्ही फोन करू नका, असे आवाहन लोकप्रतिनिधींना केले. बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नांबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक घेतली जाईल. जिल्हा पोलीस अधीक्षकांना रजेवर पाठवण्यात येईल. तसेच बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी, महिलांवरील अत्याचार, वाळू माफिया याबाबत चौकशी करून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून १५ दिवसात अहवाल मागवून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही वळसे पाटील यांनी दिले.

बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सत्तारुढ राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके आदी आमदारांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे. चोरी, दरोडे आदी गुन्हे दुप्पटीने वाढले आहेत. परंतु गुन्हेगारांवर कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. पोलिसांचा गुन्हेगारांना पाठिंबा आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात गोळीबार झाली असून त्याची चौकशी करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली. त्यावर बोलताना वळसे पाटील यांनी, जिल्हाधिकारी कार्यालयात जमिनीच्या नोंदणीचे काम सुरू होते. तेव्हा वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून गोळीबार झाला. ज्यांनी गोळीबार केला त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती दिली.

वळसे पाटील यांच्या उत्तराला प्रकाश सोळंके यांनी आक्षेप घेतला. ज्याने गोळीबार केला त्याच्यावर गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. पण ज्यांच्यावर गोळीबार केला त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांची कृती धक्कादायक आहे, असा आरोप सोळंके यांनी केला. पोलिस बदल्यात भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे पोलिस अधीक्षकांच्या कारभाराची चौकशी करा, अशी मागणी त्यांनी केली.

पोलीस निरीक्षक निलंबित

बीड जिल्ह्यातील केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनी त्यांच्याबाबत घडलेल्या घटनेला वाचा फोडली. काही दारू पीत असलेल्या गुंडांनी माझ्यासोबत फोटो काढण्याचा आग्रह धरला होता. परंतु मी नकार दिला. ऊस रसाची विक्री होत असलेल्या ठिकाणी दारूची विक्री होत आहे. मी याबाबत तक्रार केली तरी पोलिसांनी गुन्हा नोंदवला नाही. पोलिस अधीक्षकांनी फोन ही घेतला नाही, अशी कैफियत मुंदडा यांनी मांडली. तेव्हा सत्तारुढ आणि विरोधी बाजूच्या सदस्यांनी बीडच्या पोलीस अधिक्षक यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी केली. तेव्हा ज्या भागात सदर घटना घडली तेथील पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा गृहमंत्री पाटील यांनी केली. तसेच ताबडतोब गुन्हा दाखल करण्यात येईल, असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here