Home गडचिरोली भारतीय शास्त्रीय संगीताचे प्राध्यापक!

भारतीय शास्त्रीय संगीताचे प्राध्यापक!

304

[उस्ताद झाकीर हुसेन जन्मदिन विशेष]

उस्ताद झाकीर हुसेन हे भारतीय तबलावादक, संगीत दिग्दर्शक आणि तालवाद्यवादक होत. झाकीरजी हे तबलावादक उस्ताद अल्लारखाँ यांचे सर्वात मोठे सुपुत्र होत. त्यांना सन १९८८ साली भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार आणि सन २००२ साली पद्मभूषण पुरस्कार राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या हस्ते मिळाला. त्यांना सन १९९० साली संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित केले गेले. त्यांच्याविषयी ‘केजीएन’- श्री के. जी. निकोडे यांनी दिलेली ही रोचक माहिती… झाकीरजी यांच्या सांगीतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारचा पद्मश्री, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, इंडो-अमेरिकन ॲवॉर्ड, नॅशनल हेरिटेज फेलोशिप, अमेरिका, पद्मभूषण, मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान, ग्रॅमी ॲवॉर्ड, कोनार्क नाट्यमंडप- ओडिशा यांच्यातर्फे जीवनगौरव पुरस्कार आदी मानसन्मान त्यांना लाभले आहेत. तसेच विविध संगीत महोत्सवांतून जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म दि.९ मार्च १९५१ रोजी मुंबई येथे राहणाऱ्या पंजाबी कुटुंबात झाला. हुसेन यांची आई बावी बेगम आणि वडील सुप्रसिद्ध तबलावादक उस्ताद अल्लारखाँ आहेत. त्यांच्या कुटुंबाचे अडनाव कुरेशी असले तरीही झाकीर यांना हुसेन हे आडनाव देण्यात आले. त्यांनी माहीम येथील सेंट माईकल्स हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतले आणि थोड्या काळासाठी त्यांनी सेंट झेवियर कॉलेज, मुंबई येथे देखील शिक्षण घेतले. त्यांच्या वडीलांनी त्यांच्या वयाच्या तिसऱ्या वर्षापासून पखवाज शिकवायला सुरुवात केली. अल्लारखाँ हे पंजाबमधील तबलावादनाच्या परंपरेतील होते. झाकीरजींना दोन भाऊ आहेत- उस्ताद तौफिक कुरेशी हे तालवाद्य वादक आहेत आणि उस्ताद फझल कुरेशी हे तबला वादक आहेत. प्रसिद्ध इटालियन-अमेरिकन कथ्थक नृत्यांगना आंतोनिआ मिनेकोला हिच्याशी सन १९७८ मध्ये त्यांनी विवाह केला. त्यांना दोन सुविद्य मुली आहेत. हुसेनजी यांनी वयाच्या सातव्या वर्षी पहिली मैफिल सादर केली. ते वयाच्या अकराव्या वर्षापासून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तबलावादन करायला सुरुवात केली. ते सन १९७० साली सतारवादक पं.रवीशंकर यांना तबल्याची साथ करण्यासाठी अमेरिकेला गेले. झाकीरजींनी लहान वयापासूनच हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील सुप्रसिद्ध वादकांबरोबर साथसंगत करायला सुरुवात केली.

त्यांनी पंडित रवीशंकर, उस्ताद विलायत खान, उस्ताद अली अकबर खान, पंडित हरिप्रसाद चौरासिया, पंडित शिवकुमार शर्मा, पंडित व्ही.जे.जोग, पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज अशा अनेक गायक आणि वादक यांना त्यांनी तबल्याची साथ केली.
झाकीर हुसेनजींनी आपल्या तबला वादनातील आंतरराष्ट्रीय कारकिर्दीस सन १९७०मध्ये प्रारंभ केला. त्या एका वर्षात सुमारे १५० तबलावादनाचे कार्यक्रम त्यांनी भारतासह विविध देशांत सादर केले. त्यांनी सामूहिक तबला वादनासाठी विख्यात सरोद वादक आशीष खान यांच्यासोबत ‘शांतिगट’ पुढे इंग्रज गिटार वादक जॉन मॅक्लॉफ्लिन व व्हायोलिन वादक एल्.शंकर यांच्यासोबत ‘शक्तिगट’ स्थापन केले. शिवाय ते स्वतंत्र- सोलो तबला वादनाच्या रंगतदार मैफली करत. त्यांनी तबला या वाद्याला प्रतिष्ठा मिळवून दिली. परंपरा आणि नावीन्य यांचे सुंदर मिश्रण त्यांच्या वादनशैलीत आढळते. भारतीय आणि पाश्चात्त्य संगीताचे ते भोक्ते आहेत. तबलावादनातील त्यांचा जोश, बोटांची किमया आणि बेभानपणा ठळकपणे जाणवतो. सुरांचा अनुनय करताना त्यांनी लाखो रसिकांना आपल्या तालावर नाचविले. सन १९९६मध्ये अटलांटा- अमेरिका येथील उन्हाळी ऑलिंपिक क्रीडा-सामन्यांच्या उद्घाटनाची संगीतरचना त्यांनी केली. तबला वादनास त्यांनी दिलेले मोहक रूप मैफलीचे आकर्षण ठरले.

गुरु-शिष्य परंपरेला ते महत्त्व देतात. तबला वादनातील मेरुमणी ठरलेल्या झाकिर हुसेन यांनी अली अकबरखाँ, बिरजू महाराज, रवि शंकर, शिवकुमार शर्मा आदी अनेक श्रेष्ठ गायक, वादक, नर्तक यांना तबला वादनाची साथ दिली आहे. शिवाय त्यांचा स्वतःचा मोठा शिष्यपरिवार आहे. त्यांच्या असंख्य ध्वनिमुद्रिका व ध्वनिफिती आहेत. त्यांनी अनेक हिंदी-इंग्रजी चित्रपटांतून तबला वादनाची साथ दिली आहे. ते स्टॅन्फर्ड विद्यापीठात भारतीय शास्त्रीय संगीताचे प्राध्यापक आणि  प्राध्यापक होते. इ.स.२००७ साली भारताच्या स्वातंत्र्याला साठ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्याकडे केंद्र शासनाने राष्ट्रगीताची संगीतरचना सुपूर्द केली, हे विशेष

!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे त्यांना जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

✒️संकलक:-‘केजीएन’- श्री के. जी. निकोडे, से.नि.प्रा.शिक्षक(मराठी साहित्यिक, महाराष्ट्र राज्य)मु. पो. ता. जि. गडचिरोली.भ्रमणध्वनी- ७४१४९८३३३९.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here