



✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114
बीड(दि.7मार्च):-महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी बीडमध्ये त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग सांगून बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं केलं. बीडमध्ये सध्या कुणाचा धाक राहिलेला नाही. गुंडगिरी प्रचंड प्रमाणात वाढली आहे, अशी टीका करत त्यांनी एक गंभीर घटना सांगितली.आठवडाभरापूर्वी काही दारु प्यायलेल्या लोकांनी माझ्यासोबत फोटो काढायचे म्हणून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. एक आमदार असून माझ्याबाबतीत असं घडतंय, तर सामान्य महिलांच्या सुरक्षितेतचं काय होत असेल, असा प्रश्न त्यांनी विचारला.
बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध दारु विक्री सुरु असून त्यावर कुणाचाही धाक राहिलेला नाही, असा आरोप करत नमिता मुंदडा यांनी अप्रत्यक्षपणे बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. विधीमंडळाच्या अधिवेशनात देखील बीडमधील कायदा व सुव्यवस्थेवरून लक्षवेधी सूचना मांडण्यात आल्या.
*काय घडलं त्या दिवशी?*
आमदार नमिता मुंदडा यांनी आज मुंबईत बोलताना बीडच्या सुरक्षा व्यवस्थेवर ताशेरे ओढले. त्या म्हणाल्या, ‘बीड जिल्ह्यात पोलिसांचा धाक राहिलेला नाही. बीड जिल्ह्यात जे अवैध धंदे सुरु आहेत दारुविक्री, मटका व्यवसाय त्यात पोलिसांचा पूर्णपणे सहभाग आहे.
उद्या महिला दिन आहे. एक आठवडा आधी, मी माझ्या घरासमोर असलेल्या रसवंती गृहात माझ्या दोन वर्षांच्या लहान बाळासह रस प्यायला गेले होते. त्याच्या समोर एक ढाबा आहे, तिथे ओपन दारुविक्री सुरु होती. तिथून रस्ता क्रॉस करुन तिघे जण आले आणि त्यांनी माझ्यासोबत फोटो काढायचा आग्रह धरला. तिथे दारुच्या बाटल्या दिसत होत्या.
मी माझ्या मुलीसोबत आहे, मला फोटो काढायचा नाही असं सांगितलं. तर त्यांनी ढकलाढकली केली, मोठा गोंधळ घातला. माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मी पोलिसात तक्रार केली, तर ते एक तासाने आले. पण त्यांनी आरोपींना पकडलंही नाही. आम्ही आमच्या गाड्यांमध्ये त्यांना टाकून पोलिस स्टेशनला नेलं. आतापर्यंत एसपींनी मला फोन केला नाही, माझ्या फोनला उत्तर दिलं नाही.डीवायएसपी अंबाजोगाई यांनी लक्ष घातलं नाही. मी महिला आमदार असून सुरक्षित नाही, मग बीडच्या महिला कशा सुरक्षित राहतील, मी लक्षवेधी मांडली तेव्हा पोलिसांवर कारवाई करण्यात आली, अशा अनुभव नमिता मुंदडा यांनी सांगितला.


