



✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114
बीड(दि.7मार्च):- जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार नमिता मुंदडा यांनी काही गंभीर मुद्दे उपस्थित केले होते. यावर उत्तर देत असताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना रजेवर पाठवण्याचा कडक निर्णय विधानसभेत जाहीर केला.
दरम्यानच्या काळात बीड जिल्ह्यातील विविध प्रकरणांची चौकशी करुन कारवाई करण्यात येईल. तसेच बीड जिल्ह्याच्या सर्वपक्षीय आमदारांची बैठक 15 दिवसांत घेऊन त्यांच्या भावना जाणून घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश दिले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून बीड जिल्हाधिकारी कार्यालयात गोळीबार झाल्याचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, ‘कौटुंबिक जमिनीच्या वादातून जिल्हाधिकारी कार्यालयात गोळीबार करण्यात आला. ज्यांनी गोळीबार केला त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सुरु आहे, जशी स्पष्टता येईल तशी आणखी कारवाई करण्यात येईल.’
केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनीही त्यांच्यावर उद्भवलेल्या प्रसंगाचे कथन केले. स्थानिक पोलिसांनी त्यांची तक्रारही दाखल करुन घेतली नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आमदारांची तक्रार दाखल करुन घेतली नसेल तर संबंधित पीआयवर निलंबनाची कारवाई करु, असे आश्वासन दिले.
तसेच बीड जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या वाळू माफियांच्या गुंडगिरीबद्दल अनेक सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. काँग्रेसचे नेते, आमदार नाना पटोले यांनी देखील वाळू माफियांवर कारवाई करण्याची विनंती केली. यावर उत्तर देताना गृहमंत्री म्हणाले की, ‘वाळूचे अवैध उत्खनन हा संपूर्ण राज्याचा विषय आहे. वाळू माफियांवर निर्बंध आणण्याच्या दृष्टीकोनातून गृहखाते गंभीर असून कठोर कारवाई करण्यात येईल.’


