Home Education जागतिक महिला दिन

जागतिक महिला दिन

100

जागतिक महिला दिन हा महिलांच्या सन्मानाचा दिवस आहे. म्हणजे जगाच्या निम्म्या लोकसंख्येचा दिवस आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. ज्या लोकसंख्येचा हा दिवस आहे ती लोकसंख्या उपेक्षित लोकसंख्या आहे. एवढे सांगितल्यास या दिवसाचे महत्त्व लक्षात येईल. पण त्यातल्या त्यात महत्त्वाची गोष्ट अशी की, ही लोकसंख्या तिच्यात कर्तबगारीची धमक असूनसुध्दा उपेक्षित आहे. या महिलांना हा समाज संधीच देत नाही. त्यामुळे तिची तिच्या आत सूप्त राहिलेली कर्तबगारी ही प्रकटच होत नाही. मात्र असा एखादा दिवस नेमून देऊन तिच्या क्षमतांवर विचार केला आणि तिला संधी दिली तर ती महिला काय करू शकते हे लक्षात येते. परंपरेने, धर्माने, रूढीने आणि समाजाच्या पुरुषप्रधान वागणुकीमुळे निम्मी मानवता अशी उपेक्षित राहिलेली आहे. तरीही मानवप्राणी स्वतःला प्रगत समजतो. ही खरी दुर्दैवाची बाब आहे. आपण आपल्या आसपास पाहिल्यावर असे लक्षात येते की, महिलांना ज्या ज्या क्षेत्रात संधी मिळाली त्या त्या सगळ्या क्षेत्रात आपले वेगळेपण सिध्द करून दाखविले आहे.

महिलांमध्ये मुळातच जीवनाचे गांभिर्य जास्त असते. समान वयाचा मुलगा आणि मुलगी यांचे बारकाईने निरीक्षण केल्यास मुलगी अधिक परिपक्व असते हे लक्षात येते. मुले हे चंचल असतात आणि मुलींना लहानपणापासून जीवनाकडे गंभीरपणे बघण्याचे आणि जबाबदारीच्या जाणीवेने वागण्याचे शिक्षण दिलेले असते. मुलगी ही उद्याची माता असते. म्हणून तिला तुझ्या हाती पाळण्याची दोरी आहे हे विसरू नकोस असे सांगितले जाते. त्यामुळे आपल्याला पुढे चालून कुटुंबाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडायची आहे अशी एक सूक्ष्म जाणीव प्रत्येक मुलीमध्ये असते आणि या जाणीवेमुळेच तिच्यात आपोआपच चांगले व्यवस्थापन कौशल्य विकसित झालेले असते. जगातल्या अनेक उद्योगांमध्ये पुरुष आणि महिलांमधला फरक अनेकांनी अनुभवलेला आहे. महिलांचे व्यवस्थापन कौशल्य पुरुषांपेक्षा सरस असते हे विशेषत्त्वाने पुरुषांनी मान्य केलेले आहे. ती सगळ्याच गोष्टींकडे गांभिर्याने पहात असल्यामुळे ते गांभिर्य पुढच्या पिढीत उतरवण्याचे दायित्व आपल्यावर आहे ही जाणीव तिच्या मनामध्ये सतत असते.

अशा सगळ्या गुणांनी संपन्न असलेल्या महिलांकडे आणि मुलींकडे पुरुष मात्र हीनत्वाच्या भावनेने बघत असतात. त्यांचा हा दृष्टिकोन सुधारावा आणि त्यांच्या मनात स्त्री जातीविषयी विश्‍वास निर्माण व्हावा यासाठी सार्‍या जगात आज जागतिक महिला दिन साजरा केला जातो.
आपल्या देशात तर अलीकडच्या काळात महिलांचे हे गुण फार प्रकर्षाने जाणवायला लागले आहेत. दहावी आणि बारावी सारख्या परीक्षांचे निकाल जाहीर होतात तेंव्हा तर मुलींच्या पास होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त असल्याचे दिसून येते. समान परिस्थितीतील मुले, शिक्षणही समान परंतु लिंगभेदामुळे येणारे गांभिर्य इतके भिन्न असते की मुली घरकामात लक्ष घालूनही मुलांपेक्षा अधिक गुण मिळवतात. हे सारे दिसत असूनही समाजातले पुरुष मुलींकडे किंवा महिलांकडे आदराने तर सोडूनच द्या पण समानतेच्या भावनेनेसुध्दा बघायला तयार नाहीत. एखाद्या मुलाचा एखाद्या मुलीशी विवाह होतो तेंव्हा आजवर रूढ असलेल्या पध्दतीनुसार मुलगी मुलाच्या घरी जाते हा प्रवाह उलटा करण्याची हिम्मत अजून तरी कोणत्याही देशात दाखवली गेलेली नाही. सगळ्या जगात, सगळ्या जातींमध्ये आणि सगळ्या धर्मांमध्ये मुलगी विवाहानंतर मुलाच्या घरी नांदायला जाते. हा व्यवहार म्हणून मान्य करू परंतु आपल्या भाषेमध्ये या नातेसंबंधाविषयी बोलताना अमक्याची मुलगी तमक्याच्या मुलाला दिली, अशी भाषा वापरली जाते. तिच्यातूनच समाजाची मानसिकता प्रकट होते.

सध्या तर मुली मोठ्या प्रमाणावर शिकत आहेत आणि भारतात हळूहळू शाळांमध्ये प्रवेश घेण्याचे मुलींचे प्रमाण मुलांच्या बरोबर व्हायला लागले आहे. निदान या पातळीवर तरी, मुलीच्या जातीला शिकून करायचेय काय? असा प्रश्‍न विचारण्याचे प्रमाण जवळजवळ शून्य झाले आहे. परंतु या शिक्षणाच्या समान संधीचा अर्थ लोकांच्या मनात मुलींविषयी समानतेची भावना निर्माण झाली आहे असा काढू लागलो तर ती चूक ठरेल.आपल्या समाजामध्ये अस्पृश्यता, रोटी व्यवहार अशा रूढींचा त्याग केला गेला आहे. परंतु त्यामागे सामाजिक जाणीव आहे असे म्हणता येत नाही. नाईलाज म्हणून, निरुपाय म्हणून आणि आता गत्यंतरच नाही म्हणून या रूढींचा आपण त्याग केलेला आहे. तीच गोष्ट मुलींच्या शिक्षणाला लागू आहे. मुलगा आणि मुलगी यांच्याकडे समानतेच्या भावनेतून बघण्याची वृत्ती वाढली म्हणून मुली शाळेत जात आहेत असे नाही. तर शिकल्याशिवाय मुलींचे लग्न ठरू शकणार नाही या निरुपायापोटीच मुलींना शाळेत पाठवले जात आहे. त्यामुळे मुलींचे शिक्षण वाढत असले तरी मुलींकडे समानतेच्या भावनेने बघण्याची प्रवृत्ती वाढली आहे असे काही नाही. तेंव्हा समाजामध्ये मुलींकडे समानतेच्या भावनेने पाहण्याची प्रवृत्ती वाढवली गेली पाहिजे.

स्त्री म्हणजे शक्ती, पुरुष म्हणजे सहन शक्ती. हा जोक ऐकल्यावर हसू येतही असेल कदाचित, पुरुषांना तर नक्कीच आणि अनेक स्त्रियांनाही. कारण स्त्रियांनी आपल्यावर शोषण, आरोप करण्याचे अधिकार अनेक काळापासूनच पुरुषांना दिलेले आहेत. हसत अपमान सहन करणे, प्रत्येकजागी आधी पुरुषांना मान देणे हे स्त्रीने सहजपणे आपल्या स्वभावात सामील करून घेतले आहे किंवा लहानपणापासून तिला ही शिकवण मिळाली असावी आणि ही शिकवण एकूण स्वत:चे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी हे गरजेचं होतं. असो, स्त्रियांना पुरुषांनी समजून घेतलं पाहिजे ही इच्छा असली तरी याहून अधिक गरज आहे स्त्रियांनी स्त्रियांना समजून घेण्याची. ज्या दिवशी हा बदल घडेल त्या दिवशी स्त्री कमजोर नाही तर देवाने निर्मित केलेली सर्वात सुंदर कृती आहे याची जाणीव होईल. सर्व महिला माता – भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

✒️राजेंद्र लाड(शिक्षक,आष्टी,जि.बीड)मो:-९४२३१७०८८५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here