Home बीड दिव्यांग बांधवांची दिव्य सागरी मोहीम

दिव्यांग बांधवांची दिव्य सागरी मोहीम

211

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.5मार्च):-दर महिन्याला किमान एक तरी दुर्ग भटकंती झाली पाहिजे ,असा चंग बांधूनच आमचं शिवुर्जा प्रतिष्ठान तसं नियोजन करत असतं.दरवर्षीप्रमाणे या वर्षीची नव वर्ष स्वागत ऊर्जा देणारी कळसुआई शिखर मोहीम पार पडल्यानंतर तेव्हाच यापुढची मोहीम सागरी मोहीम राबवू असं ठरलं होतं.आमचे मार्गदर्शक तथा शिवुर्जा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजीआण्णा गाडे यांनी सागरी मोहिमेचा आराखडा मांडला व चर्चेअंती तीन दिवशीय सागरी मोहिमेत दहा जलदुर्ग पाहण्याचे मुक्ररर केले.मोहीमेचे दिवस ठरले 26/27/28 फेब्रुवारी.अन् भटकंतीसाठी किल्ले ठरविले.

स्वतः शिवरायांनी निर्मिलेले खांदेरी ,उंदेरी ,कासा पद्मदुर्ग ,खुबलढा ,कुलाबा,प्राचीन असा रेवदंडा, स्वराज्यासाठी दुस्वप्न राहिलेला जंजिरा ,डोंगरावर बसून सागराकडे पाहणारा बिरवाडीगड,सामराज दुर्ग ,पोर्तुगीजांचा राखणदार कोरलाई .नियोजित दहा किल्ल्यांची भटकंती ठरवून ही भटकंती फक्त अठरा ते वीस लोकांना सोबत घेऊन करू असं ठरवलं होतं पण यापूर्वीच्या तीस पस्तीस मोहिमांतून जोडलेल्या दिव्यांग दुर्ग भटक्यांनी इतका भरभरून प्रतिसाद दिला की मोहीम जाहीर होताच अवघ्या दोनच दिवसात वीस लोकांनी नावनोंदणी केली.चारपाच जवळचे लोक मागे राहिले होते ,त्यांना सामावून घेण्यासाठी आणखी दुसरी वीस लोकांची गाडी करायची ठरवली व तीसुद्धा दोनच दिवसात आरक्षित झाली.या स्नेहाचे व विश्वासाचे सारे श्रेय शिवुर्जा प्रतिष्ठान माध्यमातून राबविलेल्या आनंददायी अनोख्या व विश्वासपूर्ण यशस्वी मोहीमांना जाते.

मोहीमपूर्व नियोजन : कोणत्याही यशाचे मर्म पूर्व नियोजनात असते.मोहीमेत सहभागी कसे व्हावे ? काय पाहणार ? मोहीमेचा आरंभ व शेवट,नोंदणीशुल्क ,सोबतचे साहित्य,सविस्तर सूचना यादी सुस्पष्टपणे सर्वांना पोहच केली होती.भरभरून प्रतिसादातून चक्क चाळीस दिव्यांगांनी झटपट नोंदणी केली होती.पूर्व नियोजनासाठी शिवाजीआण्णा गाडे यांनी आठ दिवसापूर्वीच अलिबागला भेट देऊन भोवतालचे दहा किल्ले व त्या अनुषंगाने बोट प्रवास ,निवास ,भोजन व्यवस्था याबाबत सुयोग्य नियोजन केले होते.प्रत्यक्ष मोहीम 26 फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता थळ बंदरातून सुरू होणार होती.स्वतःचे गाव ते अलिबाग हा प्रवास ज्याने त्याने स्वतः करायचा होता.

मोहिमेचा पहिला दिवस :

मोहिमेची सुरूवात जरी 26 तारखेला होणार असली तरी एस.टी.बस संपामुळे रात्रीचा प्रवास अवघड झाला आहे.ज्या दोन शहरात सरासरी दर अर्ध्या तासाला एक बस असे ,तिथं आता संपूर्ण दिवसभरात एक दोनच बस उपलब्ध आहेत.मोहीम अगदी वेळेला सुरू व्हावी व नियोजनाप्रमाणे वेळेत दहा किल्ले व्हावेत यासाठी 25 तारखेलाच अलिबाग जवळील थळ येथे मुक्कामी येण्यासाठी सर्वांना सूचित केले होते.मुंबई,नाशिक,अहमदनगर,सांगली,सोलापूर,औरंगाबाद,वर्धा,बुलढाणा ,बीड अशा दूरवरून प्रवास करणा-या दिव्यांग बांधवांना प्रवासाचा थकवा निघून जावून ,आराम मिळावा म्हणून सर्वांसाठी थळ येथे वर्तक यांचा बंगला निवासासाठी घेतला होता.थळ गावात अनेक जणांकडे घरगुती निवासाची सोय आहे.घरमालक खाली राहतात व वरचा मजला पर्यटकांना निवासासाठी दिला जातो.

आम्ही वर्तकांचा बंगला आरक्षित केला होता.तसं पाहू जाता सुपारी नारळांच्या बागांनी वेढलेली कोकणी घरे खूप टुमदार ,खानदानी सौंदर्याचा बाज मिरवणारी आहेत.बरेच दिव्यांग बांधव पंचवीस तारखेलाच पोहचले होते.कोणत्याही मोहीमेत नव्या जुन्या मित्रांचा समावेश असतो.एकमेकांचा परिचय करून देताना कळत न कळत थोडी लाईफस्टोरी सांगण्यात येते व अनोळखी आकृतीमागची जडणघडण कळून जाते.मी व बीडहून मोहिमेत पहिल्यांदाच सहभागी होणारे माझे मित्र पांडुरंग उनवणे ,कल्याण घोलप बीडहून पंचवीस तारखेस उशीरा निघाल्यामुळे आम्हाला परिचय कार्यक्रमातील दिव्यांग बांधवांचे अनुभव ऐकायला मिळाले नाहीत.ओम तारू या स्वमग्न मुलाचा वाढदिवस साजरा केला ,त्या वाढदिवसासही उपस्थित राहता आले नाही.रात्रभर प्रवास झालेला असला तरी नाममात्र झोप घेऊन सकाळी उठावेच लागणार होते.वर्तकांच्या बंगल्यातील दोन रूम महिलांसाठी केलेल्या होत्या.पुरूष मंडळी बाहेरच्या व्हरांड्यात आपापली सतरंजी टाकून झोपले होते.

आहे ती सुविधा स्वीकारून फक्त मोहीमेचा आनंद घ्यायचा हा आमचा धडा आहे अन् तोच आम्ही स्वखुशीने गिरवत असतो.अवघ्या दोनशे मीटर अंतरावर असलेला समुद्र मस्त गर्जत होता.सुपारी नारळाच्या बागेतून सूर्याने डोके वर काढले व आमचा दिवस सुरू झाला.चहा घेऊन आम्ही मऊ मऊ वाळूतून थळच्या बोट स्टँडजवळ आलो.चाळीसच्या चाळीस दिव्यांग समुद्र किनाऱ्यावर जमले होते.मच्छीमार कोळी लोक ,बोटीवाले आम्हा दिव्यांगाना कुतुहलाने पाहत होते.आमच्यातीलच मग कुणी तरी त्यांच्याशी बोलत आमच्या नियोजित प्रवासाची माहिती देत होता अन् ऐकणारा आश्चर्यजनक दाद देऊन आम्हा दिव्यांगाचे कौतुक करत होता.थळ धक्क्यावर आम्ही उभे होतो ,समुद्राच्या लाटा पायांना स्पर्श करत होत्या.बोटही तयार होती.समोर समुद्रात उंदेरी किल्ला दिसत होता.उंदेरीच्या पुढे खांदेरी आहे.सर्वांच्या चेह-यावर प्रचंड आनंद होता.एक एक जण पटपट बोटीत जाऊन बसला पण स्वमग्न दिव्यांग असलेला ओम बोटीत बसण्यास धजावेना.बोटीत पाय टाकण्यासाठी थोडा पाय उचलायचा व पुन्हा माघार घ्यायचा.ओमच्या आईने समजुत घालत ,खाणाखुणांची भाषा करत त्याला बोटीत बसविले.यावेळी दिव्यांग मुलाच्या आईची अगतिकता,तिचे कष्ट सा-यांनी पाहिले.भर समुद्रात आमची बोट निघाली खांदेरी उंदेरीकडे.

थळच्या किनाऱ्यावरून उंदेरी किल्ला स्पष्ट दिसतो.उंदेरीच्या बराच पाठीमागे खांदेरी आहे.जमीनीवर जसे दोन जोड गावे असतात तशी खांदेरी उंदेरी ही समुद्रातली दोन जोडनावे असलेली पण स्वतंत्र अशी दोन किल्ले.जंजिरा व मुंबई यांना मधोमध असणारी ही दोन बेटे.मुंबई बेट पोर्तुगीजांनी इंग्रजांना आंदण दिलेले पण खांदेरी उंदेरी मुंबई बेटापासून स्वतंत्र असल्यामुळे इंग्रज व पोर्तुगीज दोन्ही सत्ताधीश त्यावर आपला हक्क सांगत असत.महाराजांनी इंग्रज,पोर्तुगीज ,सिद्दी या तीनही परकीय सत्तांना झुगारत त्यांनाच शह देण्यासाठी खांदेरी उंदेरी जलदुर्ग उभे केले.मायनाक भंडारीच्या नेतृत्वात स्वराज्यासाठी दोन जलदुर्ग उभे केले.चारशे वर्षापासून समुद्राच्या लाटांचे तडाखे खात मजबुतपणे ते उभे आहेत.छत्रपती शिवरायांची अकल्पित सोच समजून घेताना आपण चाट पडतो.अर्धा तास बोटीतून प्रवास केला तेव्हा मग आम्ही खांदेरीला पोहचलो.किल्ल्यावर वेताळबाबाचे मंदीर,चर्च,दीपगृह आहे.समुद्राकडे रोखून ठेवलेल्या मोठमोठ्या तोफाही किल्ल्यावर आहेत.तटबंदीवरून चालत चालत समोरचा अथांग समुद्र पाहणं म्हणजे प्रचंड आनंद.समुद्राकडे पाहताना दोन ठिकाणी उसळणा-या लाटांचा आपल्याला आनंद घेता येतो.एक म्हणजे समुद्रातल्या लाटा व दुसरं म्हणजे मनातल्या लाटा.मजबुत चिरेबंदी बांधकाम पाहताना माणुस आश्चर्यजनक भावाने किल्ला पाहत राहतो.खांदेरी किल्ल्यावर एके ठिकाणी प्रचंड मोठी शिळा आहे.त्या दगडावर दगड आपटला की नेहमीसारखाचा आवाज न येता धातुवर धातु आपटल्यासारखा आवाज येतो.सर्वांनी या कुतुहलाचा आनंद घेतला.तटबंदीवरील अनेक दगडावर मुला मुलींची नावे आहेत.ही एक प्रचंड मोठी विकृती आहे.साधारण दीड तास किल्ला फिरून घेतला व आलेल्या बोटीतून परतीकडे निघालो.खांदेरी किल्ला मागे पडत असताना त्याला शेवटपर्यंत पाहत होतो.सिद्दी व इंग्रजांना अस्वस्थ करून सोडणारी महाराजांची निर्मिती पाहताना मन उचंबळून येते.जाताना व येताना उंदेरीला वळसा घालून आलो.उंदेरीच्या भोवताली प्रचंड मोठा खडक आहे.त्यामुळे तिथं मोठी बोट लागत नाही.त्यामुळे उंदेरीवर प्रत्यक्ष जाता आले नाही पण त्याची भव्य तटबंदी व अवशेष जवळून पाहता आले.दुपार झाली तेव्हा आम्ही थळ बंदरात पोहचलो.ओहोटीची वेळ असल्यामुळे जिथून आम्ही बसलो होतो त्यापेक्षा बरेच मागे उतरावे लागले.ओहोटीची खुण स्वतःला अनुभवायाला मिळाली.थळ बंदर हे प्राचीन बंदर असून अलिबागपासून खूप जवळ आहे.सामरिकदृष्टीनेही थळ खूप महत्वाचे आहे.थळ बंदरात एक किल्ला आहे.त्याचे नाव खुबलढा.खांदेरी उंदेरीचे बांधकाम चालू असताना खुबलढा किल्ल्याची खूप मदत झाली होती.आज या किल्ल्याचे क्वचित अवशेष शिल्लक आहेत.दुपारी दोन वाजेपर्यंत तीन सागरी दुर्ग पाहून आमचा दिव्य ताफा अलिबागच्या दिशेने रवाना झाला.

लगेच अलिबागचा कुलाबा जलदुर्ग करायचा होता पण भरतीची वेळ सुरू झाली होती म्हणून कुलाबा तुर्तास टाळला.बघण्यासारखं खूप काही होतं तोपर्यंत पोटात उठलेल्या भुकेच्या लाटा तेवढ्या जाणवत नव्हत्या.पण आता दुपारचे दोन वाजले होते व तीन किल्ले पाहून झाले होते.जमीनीवर आल्यामुळे भुकेच्या लाटा थडाथड उसळून मनाच्या किनाऱ्यावर आपटत होते.या लाटांचा प्रतिबंध करण्यासाठी अन्नाचा पहाड पोटात तटबंदी म्हणून उभा करावा लागणार होता.दत्तकृपा व अराध्या अशा दोन भोजनालयात आमच्या जेवणाची सोय केली होती.भरपेट जेवण उरकून आम्ही कुलाबा किल्ला न करता रेवदंडाच्या दिशेने रवाना झालो.कुंडलिका नदीच्या उत्तरेला रेवदंडा किल्ला आहे.रेवदंडा क्षेत्राचा प्राचीन इतिहासात ,धार्मिक ग्रंथात उल्लेख आहे.स्वराज्याच्या दृष्टीने विचार करता हा किल्ला त्यावेळी पोर्तुगीज सत्तेकडे होता.अहमदनगरची निजामशाही रेवदंडा ,कुरलाई किल्ल्यापर्यंत होती पण पुढे हे दोन्ही किल्ले पोर्तुगीजांनी आपल्या ताब्यात घेतले होते.रेवदंड्याला पोर्तुगीज सत्तेचा रखवालादार म्हणत असते.सातखानी इमारतीची भव्य उंचीची मध्यवर्ती इमारत पाहिली की त्याची भव्यता मनाला मोहीत करून जाते.समुद्राच्या लाटा झेलणारी त्याची भव्य तटबंदी ,तटबंदीतला काळा,जांभळा दगड पाहतच राहावं वाटतं.रेवदंडा किल्ला हा कुंडलिका नदीच्या मुखाशी आहे.मुखाशी म्हणजे उगम नव्हे तर जिथं नदी समुद्राला मिळते ती जागा.

समुद्र व नदीचा संगम ही जागा खाडी म्हणून ओळखले जाते पण इथला जल संचय पाहता खाडीसुद्धा समुद्रच वाटते.रेवदंडाची पश्चिम बाजू खाडीची आहे.विशाल समुद्र व समुद्राकडून रेवदंडाकडे पाहताना किल्ल्याची मजबुत तटबंदी पाहता येते.दिवस मावळायला बराच अवकाश होता पण आता सूर्य कोवळा झाला होता.लालचुटुक फळ समुद्राच्या पाण्यात पाहणं प्रचंड विलोभनीय.विलोभनीयतेचा मोह आवरून मुक्कामाच्या दिशेने रवाना झाला.आज आमचा मुक्काम बोर्ली गावात होणार होता.बोर्ली हे गाव रेवदंडाहून खूप जवळ समुद्राच्या काठी आहे.मुक्कामाची सोय श्री.नरेंद्र यांच्या दुमजली इमारतीत केली होती.कोकणात निवास व भोजन यांचे दर वाजवी नाहीत.ते खिशाला चाट देणारेच आहेत पण कोकणवासियांच्या उत्पन्नाचे साधनही पर्यटकावर अवलंबून असल्यामुळे त्यांचे दर त्यांच्या दृष्टीने योग्य आहेत.पण तरीही सुबोध जायपाटील या बोर्ली येथील शिवप्रेमीने आमची वाजवी दरात व्यवस्था केली.हे सुबोधदादा म्हणजे फेसबुकवरून मिळालेला शिवप्रेमी मावळा.ज्या ठिकाणी थांबलो ,ती इमारतही खूप छान होती.अंगणात थोडी फरशी ,उरलेल्या जागेत जास्वंद गुलाबाची झाडे.जिन्याजवळ पहिल्या मजल्याच्या उंचीला मागे टाकणारी केळीची झाडे होती.हिरवाई संगतीला असली की इमारत तरूण वाटते.थकलेली नव्हे पण दिवसभर हुंदडलेली चाळीस दिव्यांग मुक्कामाच्या ठिकाणी छान स्थिरावली.काहीजण गावात फिरून आली.तर काही जण बीचवर जाऊन आली.दिवसभर समुद्राचा किनारा पाहिला होता,अजून दोन दिवस समुद्र काठाने फिरायाचे होते पण समुद्र प्रचंड मोहमयी आहे.अनेकजण बीचवर जाऊन आलेच.मी व शिवाजीआण्णा सुबोध जायपाटील यांच्या घरी गेलो.सुबोधदादाचा आग्रह खूप होतो त्यामुळे जाऊन आलो.

बोर्ली या गावातून अरूंद रस्त्याने गाडी चालवण्याची मौज अनुभवली.सुबोधच्या दारातून समुद्र दिसतो.चहा व चहासोबत गप्पा झाल्यावर पुन्हा समुद्रकिनारी गेलो.एव्हाना सूर्य सागराच्या पोटात गडप होणारच होता ,मी साक्षीला येईपर्यंत तो थांबला असावा.मी समुद्रकिनारी आलो व त्याला म्हणालो लवकर झोपा ,लवकर उठा.अन् काय आश्चर्य तो वरच्या वर बुडाला.सुबोधदादा त्याचे बालपण ,कोकणी जीवन ,समुद्र कथा सांगत होता.ऐकायला सारं नवं असल्यामुळे मी त्यात खोल बुडालो होतो.चांगला अंधार पडल्यावर आम्ही मुक्कामी आलो.रात्री साडेआठला जेवण आले.समोरच्या पटांगणात समोरासमोर रांगेत सर्व दिव्यांग जेवायला बसली.सुबोधदादा ,त्यांचा मुलगा आर्य ,सौ.दीप्तीताई जायपाटील व आमच्या सोबत असलेले डॉ.बटुले व भोयर सर्वांना आग्रहाने वाढत होते.वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले वेगवेगळ्या प्रकारचे दिव्यांग एक कुटुंब होऊन छान जेवण करत होते.कोकणातली शाकाहारी रूचकर मेजवानी खूप छान जमली होती.सागरी मोहिमेचा पहिला दिवस सागराप्रमाणेच अमर्याद आनंदात सरला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here