



🔸विभागात ३१ भरारी पथक तैनात
✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114
बीड(दि.3मार्च):-कोरोनामुळे मागील वर्षी बारावीची परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला होता. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा – महाविद्यालये नियमित सुरू झाली आहेत. त्यामुळे बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. शुक्रवारी (ता. चार) पहिला पेपर होणार असून सात एप्रिलपर्यंत बारावीची परीक्षा सुरू राहणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला, तरी कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करूनच परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे यंदा प्रथमच विद्यार्थ्यांना अर्धा तास वाढीव दिला आहे.
औरंगाबाद विभागातील जालना, औरंगाबाद, परभणी, बीड आणि हिंगोली या पाच जिल्ह्यातून बारावीचे १ लाख ६९ हजार २८९ परीक्षार्थी आहेत. विभागातील ४०८ मुख्य केंद्रासह १३६० उपकेंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेच्या नियोजनाची विभागीय मंडळाने पूर्ण तयारी केली आहे. कोरोनाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत परीक्षा उपकेंद्र सुरू केले आहे. या प्रत्येक केंद्रातील परीक्षा हॉलमध्ये २५ विद्यार्थ्यांची व्यवस्था झिगझॅग पद्धतीने केली आहे. या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा पूर्वीप्रमाणेच होणार आहे.
विभागात ३१ भरारी पथक तैनात
प्रत्येक जिल्ह्यात शिक्षण विभागाने एकूण सहा पथके स्थापन केलेली आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात सात भरारी पथके असतील. त्याचबरोबर प्रत्येक तालुकापातळीवर महसूल विभागाचे पथक राहणार असून, ही पथके परीक्षा केंद्रांना भेटी देऊन गैरप्रकार रोखणार आहेत.
१५ पेक्षा जास्त पटाच्या शाळेत परीक्षा केंद्र
कोरोनामुळे प्रत्येक शाळेत उपकेंद्र सुरू केले आहे. १५ पेक्षा जास्त विद्यार्थी असणाऱ्या शाळांत उपकेंद्रे सुरू केली आहेत. ज्या शाळेची विद्यार्थी संख्या १५च्या आत आहे, अशा शाळांना जवळील उपकेंद्रावर परीक्षेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. परीक्षा केंद्र व उपकेंद्रांवर कोरोना नियमावलीचे पालन करून परीक्षा घेतल्या जाणार आहेत. परीक्षा काळात आजारी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. ज्यांना आजारपणामुळे परीक्षा देणे शक्य नाही. त्यांना जुलैमध्ये फेरपरीक्षेची सुविधा आहे.
परीक्षा वेळेत बदल
दरवर्षी बोर्डाकडून पहिला पेपर सकाळी ११ वाजता सुरू होतो. यंदा मात्र सकाळी १०.३० वाजताच पेपर सुरू होणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना एक तास आधी केंद्रावर हजर राहावे लागेल. विद्यार्थ्यांनी परीक्षेला येताना तोंडाला मास्क, सॅनिटायझर, कंपास, पेन, पट्टी व पाण्याची बाटली आणावी.
जिल्हानिहाय विद्यार्थी संख्या
जिल्हा शाळा/ कॉलेज मुख्य परीक्षा केंद्र विद्यार्थी संख्या
औरंगाबाद ४७० १५३ ५८३४७
बीड २९८ ९९ ३८१४३
जालना २३९ ६९ ३१३७६
परभणी २३३ ५५ २४४७१
हिंगोली १२० ३२ १३४७२
एकूण परिरक्षक केंद्रे ः ५८
बारावीची एकूण विद्यार्थी संख्या ः १,६९,२८९


