



🔸जमशेदजी नसरवानजी टाटा यांच्या जन्म ३ मार्च १८३ व्या जयंती निमित्याने विशेष लेख
सांगा आम्हाला बिर्ला, बाटा, टाटा, कुठं हाय हो!
सांगा धनाचा साठा न् आमचा वाटा कुठं हाय हो!
लोकशाहीर वामनदादा कर्डक यांचे गाणे खूप अर्थपूर्ण आहे.त्यांनी हे लिहतांना किती वाचन अभ्यास केला असेल माहिती नाही. पुरोगामी महाराष्ट्रातील चळवळीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना हे प्रेरणा देणारे गीत मात्र निश्चित आहे.भारतीय उद्योगक्षेत्राचे जनक जमशेदजी टाटा हे भारत देशाचे देशभक्त आणि भारतीय नागरीकासाठी रोजगार निर्मितीसाठी अन्नदाते होते असे लिहले तर चुकीचे ठरणार नाही.अनेकांना त्यांची प्रशिक्षण देऊन कुशल कारागीर,समाज सेवक (MSW) बनविले.मी १९८२ साली भांडूप नाक्यावर बिगारी होतो. आता २०२१ ला टाटा पॉवर कंपनीतून कुशल कारागीर सुपरवायझर म्हणून सेवा निवृत्त झालो. असो. जमशेदजी नसरवानजी टाटा यांना भारतीय उद्योगक्षेत्राचे जनक का म्हटले जाते.
जमशेदजी नसरवानजी टाटा (जन्म ३ मार्च१८३९,मृत्यू १९ मे १९०४) पारशी अल्पसंख्याक समाजचे होते. भारतातल्या आघाडीच्या टाटा उद्योगसमूहाचे ते संस्थापक अध्यक्ष चेयरमेन होते.त्यांचा जन्म गुजरातमध्ये नवसारी येथे झाला. त्यांना दोराबजी आणि रतनजी अशी दोन अपत्ये होती.जमशेदपूर येथील पोलाद कारखाना,मुंबईचे ताजमहाल हॉटेल,प्रत्येक देशाच्या विमानतळाच्या शेजारी टाटाची ताजमहाल हॉटेल आहे.त्याचा इतिहास ही खूप मोठा प्रेरणादायी आहे.बंगळूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अशा अनेक संस्थांची त्यांनी स्थापना केली होती. त्या संस्था आज ही देशाच्या सामाजिक,शैक्षणिक,आर्थिक विकासाच्या अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका पार पडतांना दिसतात.टाटा अल्पसंख्याक पारशी समाजाचे नसते तर या देशातील उच्चवर्णीयांनी त्यांना खूप डोक्यावर घेतले असते.
जमशेदजी नसरवानजी टाटा यांनी अनेक उद्योग धंद्याची निर्मिती केली.म्हणजेच जन्म दिला.कोण्या संता सारखे प्रगट होऊन त्यांनी उद्योग समूह तयार केला नाही.खूप अभ्यास करून उद्योग निर्माण केला आणि त्याचा टाटा समूह उद्योगाची स्थापना केली. म्हणूनच त्यांना “भारतीय उद्योगाचे जनक” म्हटल्या जाते. देशात आणि परदेशात आज त्यांच्या योगदानामुळे वेगळी ओळख निर्माण झाली आहे. ज्यावेळी भारत आर्थिक संकटांशी झगडत होता त्या वेळी त्यांनी चपळतेने टाटा ग्रुप आणि कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचा दुरदुष्टीकोन खूप वेगळा होता म्हणूनच त्यांचे असे मत होते की आम्ही सरळ कोणतेच मोठे काम करू शकत नाही, कोणतेही मोठे काम करण्यासाठी आधी छोटी-छोटी कामे करण्याची आवश्यकता असते.हे करतच ते यशस्वी उद्योगपती क्षेत्राचे जनक झाले.
जमशेदजी नसरवानजी टाटा यांचा जन्म ३ मार्च १८३९ रोजी दक्षिण गुजरातमधील नवसारी शहरात झाला. त्यांचे वडील नसरवानजी व आई जीवनबाई टाटा हे त्यांच्या पारशी कुटुंबातील पहिले व्यापारी होते. कुटुंबाची परंपरा तोडून त्यांनी मुंबईत निर्यात व्यापार संस्था सुरू केली. जमशेदजी टाटा १४ व्या वर्षी मुंबईत आपल्या वडिलांकडे आले. आणि त्यांनी एलफिन्स्टन महाविद्यालयातून आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले. तेथे ते कॉलेजातील एक हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते. त्यांची बुद्धिमत्ता पाहून काॅलेजच्या प्रिन्सिपाॅलांनी त्यांची डिग्री समाप्त होई पर्यंतची पूर्ण फी परत केली. जमशेदजीनी १६ वर्षाचे असताना १० वर्षाच्या हीराबाई दबू हिच्याशी विवाह केला.
१८५८ मध्ये जमशेदजींनी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली आणि आपल्या वडिलांच्या व्यवसायामध्ये प्रवेश घेतला. १८५७ सालचे भारतीय बंड ब्रिटिश शासनाने दडपून काढले होते. ब्रिटिश सरकारच्या विरुद्धचा विद्रोह त्यावेळी नवीनच होता. मात्र टाटांनी अशा परिस्थितीतही आपल्या व्यापारास शिखरावर घेऊन जाण्याचा निश्चय केला. आपल्या वडिलांच्या व्यवसायाच्या शाखा स्थापन करण्यासाठी टाटा यांनी इंग्लंड, अमेरिका, युरोप, चीन आणि जपान सारख्या परदेशांत अनेकदा प्रवास केला.
१८६८ पर्यंत टाटा आपल्या वडिलांच्या कंपनीत काम करत होते. त्यावर्षी त्यांनी एका स्वतंत्र कंपनीची स्थापना केली. १८९६ मध्ये चिंचपोकळी येथील एक दिवाळखोर तेल गिरणी विकत घेतली आणि तिची एका कापडाच्या गिरणीत रूपांतर केले. या गिरणीचे नाव त्यांनी अलेक्झांड्रा मिल असे ठेवले. पुढे दोन वर्षांनंतर नफा मिळवण्यासाठी ती मिल टाटांनी विकली आणि १८७४ मध्ये नागपूरला एका स्पिनिंग मिलची स्थापना केली, १ जानेवारी १८७७ रोजी त्यांनी एम्प्रेस मिलची स्थापना केली.त्यांच्या जीवनात चार ध्येये होती. एक पोलाद कंपनी, एक जागतिक दर्जाची शिक्षण संस्था, एक अद्वितीय हॉटेल आणि एक हायड्रो-इलेक्ट्रिक वीजनिर्मिती कंपनी. ३ डिसेंबर १९०३ रोजी मुंबईतील कुलाबा वॉटरफ्रंट येथील ताजमहल हॉटेलचेया उद्घाटन झाले. त्यावेळी भारतात स्वतःची वीज असणारे ते एकमेव हॉटेल होते.
टाटा स्टील (पूर्वी टिस्को – टाटा आयर्न आणि स्टील कंपनी लिमिटेड) ही आशियातील पहिली आणि भारतातील सर्वात मोठी स्टील कंपनी आहे. तिच्या कोरस ग्रुपने दरवर्षी २,८ कोटी टन स्टीलचे उत्पादन केल्यानंतर ती जगातील पाचव्या क्रमांकाची स्टील कंपनी ठरली.बंगलोरची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, विज्ञान आणि अभियांत्रिकी यांमधील संशोधन आणि शिक्षणासाठी प्रख्यात भारतीय संस्था आहे.सामाजिक,शैक्षणिक आर्थिक विकासासाठी काम करणाऱ्या वर्ड सोशल फोरम मध्ये मनाचे स्थान भूषविणारे याच संस्थेतून गेले आहेत.टाटा हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर सप्लाय कंपनी नंतर तिचे नामांतर झाले टाटा पॉवर कंपनी झाले.ही भारतातील ८००० मेगावॅटपेक्षा जास्त क्षमतेच्या स्थापित क्षमतेची सर्वात मोठी खाजगी वीज कंपनी.टाटा उद्योग समूहात ३ मार्च हा स्थापना दिवस म्हणून मोठ्या उत्साहत साजरा केला जातो.
टाटा उद्योगसमूहाने विविध संशोधन,शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांच्या उभारणीमध्ये आर्थिक योगदान दिले आहे.उद्योग समूहाच्या लोकोपकारी कार्याची दाखल घेऊन २००७ साली समूहाला कार्नेज पदकाने गौरविण्यात आले. टाटा उद्योग समूहाने स्थापन केलेल्या काही संस्थांची जागतिक पातळीवर महत्वपूर्ण समजल्या जातात.टाटा मुलभूत संशोधन संस्था,भारतीय विज्ञान संस्था,टाटा व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्र,टाटा फुटबॉल अकादमी,टाटा क्रिकेट अकादमी,टाटा मेमोरिअल हॉस्पिटल असे लक्षवेधी रचनात्मक कार्य भारतीय उद्योगक्षेत्राचे जनक जमशेदजी नसरवानजी टाटा यांनी करून ठेवले आहे त्याचा लाभ देशातील सर्वांनाच मिळत आहे.जमशेदजी नसरवानजी टाटा यांच्या (जन्म ३ मार्च) १८३ व्या जयंती निमित्याने त्यांच्या दूरदृष्टी जीद्धीला त्रिवार विनम्र अभिवादन आणि देशातील कामगार,कर्मचारी अधिकारी समाज सेवक,यांना हार्दिक शुभेच्छा.
✒️सागर रामभाऊ तायडे(टाटा पावर कंपनी,सेवा निवृत्त कर्मचारी)मो:-९९२००३८५९


