



✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114
बीड(दि.2मार्च):-बीडमध्ये एका शाळकरी मुलाने बनवलेल्या अनोख्या चाकूची चांगलीच चर्चा रंगलीय. कांदा चिरताना आपल्या आईच्या डोळ्यातून येणारे पाणी पहावले नाही म्हणून, एका सातवीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांने, आपल्या कल्पक बुद्धीने स्मार्ट चाकू तयार केलाय. बीडच्या कुर्ला गावच्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत, विज्ञानाचे धडे गिरवणाऱ्या ओंकार शिंदे या विद्यार्थ्याची चर्चा सध्या पंचक्रोशीत होऊ लागलीय. त्याला कारणही तसंच आहे. “कांदा चिरताना आईच्या डोळ्यातील अश्रू पाहिले आणि इथून त्याला कल्पना सुचली. आपल्या कल्पक बुद्धीने ओंकारने एका अनोख्या चाकूची निर्मिती केलीय.
7 दिवसात ओंकारने हा स्मार्ट चाकू बनवलाय, आपल्या आईच्या डोळ्यातील पाणी पाहून अनोखा चाकू तयार करणाऱ्या, ओंकार शिंदे याचे आई वडील, हे दोघेही शेतमजुरी करून कुटुंबाचा गाडा चालवतात. आपल्याला शिकता आलं नाही म्हणून, हे शिंदे दाम्पत्य शेतात राबून ओंकारचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत आहेत. अखेर मुलाची पंचक्रोशीत होणारी चर्चा पाहून ओमकारच्या शेतकरी आई-वडिलांना देखील आनंद होतोय.


