Home गडचिरोली ऐतिहासिक श्रीमंत राजघराण्याच्या स्त्री संत!

ऐतिहासिक श्रीमंत राजघराण्याच्या स्त्री संत!

187

[संत मिराबाई पुण्यतिथी विशेष]

संतश्रेष्ठ गुरुदेव रविदासजी महाराजांना मिराबाईंनी आपले गुरू मानले होते. श्रीकृष्णभक्तीत तल्लिन झालेल्या ललिता या गोपिकेचा आपण पुनर्जन्म आहोत, असे संत मिराबाईंना वाटू लागले होते. उत्तर भारतात सर्वदूर संत मिराबाई श्रीकृष्णभक्तीचा प्रसार-प्रचार करीत त्यांची भजने गात फिरल्या. त्यांच्या पावन भक्तिमय स्मृती ‘अलककार’- श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी यांनी या लेखातून जागविल्या आहेत… श्रीकृष्णभक्त संत मिराबाई उर्फ मीराबाई रत्नसिंह राठोड या राजस्थान मधील उच्चकुलीन हिंदु परीवारातील वैष्णव पंथातील एक महत्वाच्या संतकवयित्री होत. त्यांची श्रीकृष्णभक्ती एवढी प्रसिध्द आहे, की त्यांच्या इतके श्रीकृष्णावर प्रेम करणारे क्वचितच कुणी असेल. श्रीकृष्णावर निस्सीम प्रेम करण्याकरीताच त्यांचा जन्म झाला होता, असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही. जवळपास १२०० ते १३०० श्रीकृष्णाला उद्देशून लिहीलेल्या रचना आजही त्यांच्या भगवद्भक्तिची साक्ष देतात-

“पायो जी म्हें तो राम रतन धन पायो।
वस्तु अमोलक दी म्हारे सतगुरु, किरपा कर अपनायो॥
जनम-जनम की पूँजी पाई, जग में सभी खोवायो।
खरच न खूटै चोर न लूटै, दिन-दिन बढ़त सवायो॥
सत की नाँव खेवटिया सतगुरु, भवसागर तर आयो।
‘मीरा’ के प्रभु गिरिधर नागर, हरख-हरख जस पायो॥”

राजस्थानमधील नागौर जिल्ह्यात कुडकी नामक गावात सुमारे १४९८ साली संतशिरोमणी मिराबाईंचा जन्म झाला. लहान वयातच मातृवियोगामुळे लहानग्या मीराजी राव दुधाजी या त्यांच्या आजोबांच्या छत्रछायेखाली वाढल्या. त्यांचे वडील रतनसिंह हे मेडतिया जहागिरीचे राठोड होते. एकदा घरासमोरून जात असलेल्या लग्नाच्या वरातीकडे कुतूहलाने पहात मीराबाईंनी आपल्या आईला ’माझा वर कोण?’ असे विचारले असता आई तिला देवघरात घेऊन गेली व भगवान श्रीकृष्णाच्या मुर्तीकडे बोट दाखवत ’हा तुझा वर’ असे सांगितले. छोट्याशा मीराबाईंवर या गोष्टीचा एवढा प्रभाव पडला, की त्यांचे जीवनच श्रीकृष्णमय झाले. अजाणत्या वयापासुनच त्या श्रीकृष्णप्रेमात बुडाल्या. त्यांना जळी, स्थळी, काष्ठी वा पाषाणीही गोवर्धन गिरीधारी भगवान श्रीकृष्ण दिसू लागले-

“अन्न नहीं भावे नींद न आवे विरह सतावे मोय।
घायल ज्यूं घूमूं खड़ी रे म्हारो दर्द न जाने कोय।।
जो मैं ऐसा जानती रे, प्रीत कियाँ दुख होय।
नगर ढुंढेरौ पीटती रे, प्रीत न करियो कोय।।
पंथ निहारूँ डगर भुवारूँ, ऊभी मारग जोय।
मीरा के प्रभु कब रे मिलोगे, तुम मिलयां सुख होय।।”

एका साधुकडून मिळालेली श्रीकृष्णमूर्ती संतकवयित्री मीराबाई सतत आपल्या जवळ ठेवत असत. त्यांनी त्या मूर्तीसमवेत स्वतःचे लग्न देखील लावले. श्रीकृष्णप्रेमात त्या इतक्या बुडाल्या होत्या, की जीवनातील सर्व गोष्टी त्यांना श्रीकृष्णापुढे नश्वर वाटत असत. चित्तोड येथील राणा संगा यांचे चिरंजीव भोजराज यांच्याशी संतश्रेष्ठ मिराबाईचा विवाह लहान वयातच करून देण्यात आला. स्वतःचा विवाह श्रीकृष्णांशी झाला असल्याने त्यांना भोजराजशी झालेला विवाह मान्य नव्हता. तरी देखील कुटुंबाच्या मानमरातब- मर्यादेकरता त्यांनी तो स्विकारला. घरात त्या श्रीकृष्णभक्तिशिवाय आणखी इतर कोणत्याही देवतेची पूजा मान्य करीत नसत-

“हरि तुम हरो जन की भीर।
द्रोपदी की लाज राखी, तुम बढायो चीर॥
बूडते गजराज राखे, कियो बाहर नीर।
दासि ‘मीरा लाल गिरिधर, दु:ख जहाँ तहँ पीर॥”

सन १५२७ला झालेल्या लढाईत भोजराज मारले गेल्याने तसेच आजोबा, वडिल आणि सासरे यांचा एकामागोमाग झालेल्या मृत्यूने संत मिराबाईंनी या अशाश्वत आणि नश्वर जीवनाकडे पाठ फिरविली. आता त्यांनी श्रीकृष्णभक्तीत स्वतःला झोकून दिले होते. या दरम्यान अनेक भजने आणि रचनांची निर्मीती संत मिराबाईंकडुन झाली. विरह आणि विरक्तीने भरलेल्या त्यांच्या अनेक रचना आजही आपल्याला पहायला आणि ऐकायला मिळतात.

“हे री मैं तो प्रेमदिवानी मेरो दरद न जाणै कोय।
घायल की गति घायल जाणै, जो कोई घायल होय।
दरद की मारी बन बन डोलूँ बैद मिल्या नहिं कोय।
मीरा की प्रभु पीर मिटेगी, जद बैद सांवरिया होय।।”

सुरूवातीला संत मिराबाईंची श्रीकृष्णभक्ती ही त्यांची वैयक्तिक बाब होती; पण पुढे पुढे त्या कृष्णभक्तीत तल्लीन होत रस्त्यांवर नाचू लागल्या. ही बाब त्यांचा सावत्र दिर विक्रमादित्य याला मुळीच आवडत नसे. तो चित्तोडचा त्यावेळी नव्यानेच राजा झाला होता. त्याने संत मिराबाईंना संपविण्याचे अनेक प्रयत्न केले. प्रसादात विष कालवले, फुलांमधे साप पाठविला, बिछान्यावर खिळे रोवले… परंतु प्रत्येक संकटातून श्रीकृष्णकृपेने त्या सहीसलामत सुटून वाचत राहिल्या. विषप्रयोग केलेल्या दुधाचा नैवैद्य ज्यावेळी त्यांनी श्रीकृष्णाला दाखवला आणि प्रसाद म्हणून ते दूध ग्रहण केले, त्यावेळी श्रीकृष्णाची मूर्ती विषामुळे हिरवी झाली. परंतु संत मिराबाईंना काहीही बाधा झाली नाही. हे पाहून त्यांना खुप वाईट वाटले. त्यांनी भगवान श्रीकृष्णाला पूर्ववत होण्यास प्रार्थना केली. भगवान पूर्ववत मूर्ती रूपात प्रकट झाले. त्यांचा प्रसिद्ध भजन-

“पग घूँघरू बाँध मीरा नाची रे!
मैं तो मेरे नारायण की आपहि हो गई दासी रे!!
लोग कहै मीरा भई बावरी न्यात कहै कुलनासी रे!
विष का प्याला राणाजी भेज्या पीवत मीरा हाँसी रे!!
‘मीरा’ के प्रभु गिरिधर नागर सहज मिले अविनासी रे!!”

संतश्रेष्ठ गुरुदेव रविदासजी महाराजांना मिराबाईंनी आपले गुरू मानले होते. श्रीकृष्णभक्तीत तल्लिन झालेल्या ललिता या गोपिकेचा आपण पुनर्जन्म आहोत, असे संत मिराबाईंना वाटू लागले होते. उत्तर भारतात सर्वदूर संत मिराबाई श्रीकृष्णभक्तीचा प्रसार-प्रचार करीत त्यांची भजने गात फिरल्या. इ.स.१५३८च्या सुमारास त्या वृंदावनात आल्या असाव्यात, असा अनेक अभ्यासकांचा अंदाज आहे. आपल्या आयुष्यातील शेवटच्या वर्षांत त्या द्वारका येथे वास्तव्यास होत्या. येथेच श्रीकृष्णाच्या चरणी त्या कायमच्या लीन झाल्या. गोवर्धन गिरीधारी गोपाळ श्रीकृष्णाच्या मूर्तीत त्या दि.२ मार्च १५६८ रोजी लुप्त झाल्या, असे सुद्धा अनेक इतिहास अभ्यासक सांगतात.

!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे स्मृतिदिनी त्यांना व त्यांच्या ईशभक्तीला दंडवत प्रणाम !!

✒️संकलन व लेखन:-‘अलककार’- श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी(म.रा. डि.शै. दै.रयतेचा कैवारीचे लेख विभाग प्रमुख तथा जिल्हा प्रतिनिधी)मु. पो. ता. जि. गडचिरोली,व्हा. नं. ९४२३७१४८८३.
इमेल- [email protected]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here