Home बीड माजलगावमध्ये परप्रांतीय महिलेची अँम्बुलन्समध्येच प्रसूती; माता, नवजात बाळ सुखरूप

माजलगावमध्ये परप्रांतीय महिलेची अँम्बुलन्समध्येच प्रसूती; माता, नवजात बाळ सुखरूप

86

🔸ॲम्बुलन्समध्ये प्रसंगावधान राखत उपचार व सुरक्षित प्रसूती केल्याबद्दल डॉ.परिक्षीत हेलवाडे व चालक अर्जुन राठोड यांचे अभिनंदन होत आहे

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.25फेब्रुवारी):-उपजीविकेसाठी परप्रांतातून माजलगाव येथे आलेल्या एका महिलेला प्रसूतीसाठी बीड जिल्ह्यातील माजलगाव ग्रामीण शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिची तब्येत नाजूक असल्याने तिला बीड जिल्हा रुग्णालयात नेण्यात येत असताना तालखेडजवळ अॅम्बुलन्समध्येच तिला प्रसूतीकळा सुरू झाल्या. वाहनचालक व अॅम्ब्युलन्समधील डॉक्टरांनी प्रसंगावधान राखत तातडीने उपचार करत तिची प्रसूती केली. नवजात बाळ आणि बाळंतीण सुखरूप आहेत.

माजलगाव येथे काही महिन्यांपूर्वी आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी उत्तरप्रदेशातील बलहपूर जि. बिघनोर येथील जिलपुकार धोबी यांचे 6 जणांचे कुटुंब आले आहे. हे कुटुंब तालुक्यातील सिद्धेश्वरनगर येथील उसाच्या गुऱ्हाळावर मजुरीची कामे करून उदरनिर्वाह करतात. या कुटुंबापैकी जिलपुकार याची पत्नी आलिया (वय 21) यांना गरोदर राहहून आठ महिने झाले असल्याने तपासणीसाठी त्यांनी गुरुवारी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. त्यांना पोट दुखीचा त्रास होत असल्याने तेथे डॉ. सुभाष बडे यांनी तपासणी केली.

त्या महिलेची प्रकृती नाजूक असल्याने महिलेला तातडीने जिल्हा रुग्णालयात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. 108 क्रमांकाच्या अॅम्बुलन्सने त्यांना दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात नेण्यात येत होते. तालखेडजवळ पोटदुखीचा जास्त वाढल्याने चालक अर्जुन राठोड व डॉ.परिक्षीत हेलवाडे यांनी तातडीने वाहन बाजूला थांबवत महिलेवर उपचार करत तिची प्रसूती केली. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. या प्रसूतीनंतर बाळाचे वजन दिड किलो भरल्याने त्याला देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. ॲम्बुलन्समध्ये प्रसंगावधान राखत उपचार व सुरक्षित प्रसूती केल्याबद्दल डॉ.परिक्षीत हेलवाडे व चालक अर्जुन राठोड यांचे अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here